बेतुल हादरले : घरांना तडे
मडगाव, २१ मार्च (वार्ता.) – नाकेरी-बेतुल येथे ‘हुज्यीस प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि.’ या आस्थापनाच्या दारूगोळा गोदामात २० मार्च या दिवशी मध्यरात्री अचानक स्फोट झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला. या स्फोटामुळे गोदाम परिसरातील काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. घटनेची नोंद घेऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस् यांनी गोदामाच्या ८०० मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. आमदार एल्टन डिकोस्टा यांनीही घटनास्थळी जाऊन पहाणी केली आहे.
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ‘हुज्यीस प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि. हे आस्थापन ‘गन पावडर’ बेतुल येथील गोदामात साठवून ठेवत होते. लहान शस्त्रे सिद्ध करण्यासाठी याचा वापर केला जात होता. २० मार्चच्या रात्री गोदामाला आग लागून १४.५ टन स्फोटके आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पेट्रोलिम अँड एस्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’ यांनी ‘हुज्यीस प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि.’ आस्थापनाला कारणे दाखवा नोटीस पाठवून ‘पुढील २१ दिवसांत आस्थापनाची स्फोटके साठवून ठेवण्याची अनुज्ञप्ती का रहित करू नये ?’, असे विचारले आहे.