संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची तीर्थयात्रा

आज ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान’ आहे. त्या निमित्ताने…

संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज

‘कार्तिक शुक्ल एकादशी, शके ११९२ या दिवशी पंढरपुरात दामाशेटी आणि गोणाई या दांपत्याच्या पोटी संत नामदेवरायांचा जन्म झाला. त्यानंतर ५ वर्षांनी आपेगाव येथे विठ्ठलपंत कुळकर्णी आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७, गोकुळाष्टमी या दिवशी संत ज्ञानदेवांचा जन्म झाला. संत नामदेवास बालपणापासूनच पांडुरंगाच्या सगुण रूपाचे आणि भक्तीचे वेड, तर संत ज्ञानदेव हे नाथसंप्रदायी योगमार्गाचे निर्गुण भक्तीचे उपासक होते. संत ज्ञानदेवांनी निर्गुण, ज्ञानोत्तर भक्तीचा पुरस्कार केला असला, तरी संत नामदेवाच्या सगुण भक्तीबद्दल त्यांच्या मनात तितकाच आदर होता. साहजिकच या दोघांच्या मनात परस्परांविषयी निरंतर प्रेमभावना दाटली होती. संत ज्ञानदेवांनी महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया घातला, तर संत नामदेवांनी त्यावर भक्तीमार्गाचे मंदिर उभारून भागवत संप्रदायाचा थेट पंजाबपर्यंत विस्तार आणि प्रसार केला.

शके १२१२ मध्ये संत ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ची रचना पूर्ण केली. श्री गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून ‘अमृतानुभव’ या स्वतंत्र ग्रंथाची रचना केली. योगिराज चांगदेवांकडून आलेल्या कोर्‍या पत्रावर ६५ ओव्यांचे उत्तर पाठवून ‘चांगदेव पासष्टी’ पूर्ण केली. हरिपाठाचे अभंग, गवळणी, विरहिणी इत्यादींची रचना पूर्ण झाल्यावर आपले जीवितकार्य पूर्ण झाल्याचे त्यांना जाणवले. तथापि, जीवनमुक्त झालो, तरी त्याला ज्ञानांध लोकांप्रती काही कर्तव्य उरते, हे जाणून त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले.

‘या यात्रेत सोबती म्हणून संत नामदेवास समवेत घ्यावे’, या हेतूने संत ज्ञानदेव पंढरपुरास आले आणि नामदेवांच्या बिर्‍हाडी दाखल झाले. त्यांच्या भेटीत दोघांत झालेला संवाद, पंढरपुरातून बाहेर पडण्यास नामदेवाची नाखुषी, जिवलग भक्ताच्या अनुपस्थितीत प्रत्यक्ष पांडुरंगाला वाटणारी खंती, तीर्थावळीहून परत आल्यावर तीर्थयात्रेचे उद्यापन करण्यात पांडुरंग, रखुमाई, सत्यभामा यांनी घेतलेला पुढाकार आणि दाखवलेला उत्साह, या प्रसंगी पांडुरंगास घ्यावे लागलेले प्रायश्चित्त या सार्‍या प्रसंगाचे अत्यंत हृद्य वर्णन संत नामदेवरायांच्या तीर्थावळीच्या अभंगांतून साकार झालेले आहे. तेव्हा संत ज्ञानदेव-संत नामदेवांच्या तीर्थावळीचे हे वर्णन प्रस्तुत लेखात केले आहे.

भक्त शिरोमणी संत नामदेव !

सखा ज्ञानेश्वर मला भेटण्यासाठी मुद्दाम आल्याचे पाहून नामदेवांना हर्ष झाला. त्यांनी संत ज्ञानदेवांपुढे लोटांगण घातले आणि प्रेमाने आलिंगन देऊन त्यांची विधीवत् पाद्यपूजा केली. त्यानंतर ज्ञानदेवांनी त्यांच्या येण्याचा हेतू स्पष्ट करण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘‘नामदेवा, जन्मापासून केशवराजाच्या अनन्य भक्तीने स्वत:चा संसार देशोधडीला लावून तू त्याचे भक्तीप्रेम संपादन केलेस. खरोखर तू धन्य आहेस. भूतळीची तीर्थे पहात पहात तुझ्या संगतीने सुखी व्हावे, एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा माझे हे आर्त पुरवण्यासाठी तू प्रयाणाचा मुहूर्त करावास हे उत्तम !’’ हे ऐकताच संत नामदेव मोठ्याच संकटात सापडले. ‘पंढरी सोडून तीर्थावळीस जाण्याचे कसे टाळावे ?’ याचा विचार करून ते ज्ञानदेवांना म्हणाले, ‘‘हे ज्ञानदेवा, पांडुरंगाच्या चरणी मला काय उणे आहे ? ज्यासाठी सर्व सुखे सोडून मी त्याचे चरणी भिकारी होऊन पडलो आहे. काया-वाचा-मने ज्याला विकला गेलो आहे, ज्याने माझे पालन-पोषण केले आहे. तिथेच मी त्याच्या महाद्वारी पडून राहीन. मला चारही मुक्तींची मुळीच चाड नाही. तथापि तू विठोबास विचार, त्याने आज्ञा केली, तर ती शिरसावंद्य मानून मी तुझ्या समवेत येईन.’’

नामदेवांचे हे बोलणे ऐकल्यावर दोघे भक्त राऊळात जाऊन पांडुरंगासमोर उभे राहिले. संत ज्ञानदेवांनी आपले आर्त संत नामदेवांच्या समक्ष देवास कथन केले. संत नामदेवांना ज्ञानदेवांसमवेत तीर्थावळीस जाण्याची आज्ञा देतांना संत ज्ञानदेवांना देव म्हणाले, ‘‘हे ज्ञानदेवा, माझ्या भक्तीपायी वेडा झालेल्या नाम्याची तहान-भूक जाणून त्याला सांभाळून परत आण; कारण मला त्याची फारच काळजी वाटते. रानावनात किंवा जनात त्याला सोडू नकोस. केवळ तुझ्या मनीचे आर्त पाहूनच मी त्याला तुझ्या संगती पाठवत आहे, हे लक्षात ठेव.’’

इतके झाल्यावर दोघा भक्तांनी पांडुरंगाच्या चरणांवर डोके ठेवले. चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेऊन ते भीमेच्या पैलतीरी पोचून वाट चालू लागले. केवळ नामा (संत नामदेव) केविलवाण्या चेहर्‍याने पुनःपुन्हा मागे वळून कळसाचे दर्शन घेत होता. पंढरीचा आणि पांडुरंगाचा वियोग त्याला सहन होत नव्हता.

संत ज्ञानदेवांनी संत नामदेवांची केलेली समजा‌वणी !

प्रवासात चालता चालता ज्ञानदेव संत नाम्याची समजूत घालू लागले. ते म्हणाले, ‘‘नामदेवा, तुझ्या हृदयात पांडुरंगाबद्दल प्रेमाचा जिव्हाळा नित्य वसत असतांना तू अशी खंती का करतोस ?’’ एवढ्याने संत नामयाचे समाधान काही होईना. संत नामदेव म्हणू लागले, ‘‘मला माझा विठ्ठल डोळ्यांना दाखवा. इतरांशी मला काय करणे आहे ? तो पहावा, तो भेटावा, एवढीच माझी आस आहे.’’ यावर संत ज्ञानदेव पुढे म्हणतात, ‘‘अरे नामदेवा, तू पंढरीरायाचा प्रेमभांडारी आहेस. तुझ्यावर माझा पूर्ण भरवसा आहे; म्हणून मी तुझा संग धरला आहे. सागराहून खोल असलेले तुझे बोल ऐकवून मजसारख्या याचकाची आशा पूर्ण कर.’’

सगुण, निर्गुण दोन्ही विलक्षण !

अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारका आणि प्रभास इत्यादी तीर्थांना भे‌टी देत दोघेही मार्गक्रमण करत होते. प्रत्येक तीर्थात स्नान आणि पापक्षालन करून ते पुढे निघाले. वाटेत संत नामदेवांना तहान लागली. तेव्हा जवळ कुठे पाणी आहे का ? हे ते पाहू लागले. तोच त्यांना एक विहीर दिसली. विहिरीतील पाणी पुष्कळ खोलवर गेले होते आणि आत उतरण्यास विहिरीला पायर्‍याही नव्हत्या. ज्ञानदेव हे योगमार्गी असल्याने लघिमा सिद्धीचा वापर करून लघुरूप घेऊन विहिरीतून पाणी पिऊन आले. संत नामदेवांचे काय ? ते तर सगुणभक्त ! त्यांनी सरळ विठोबाचा धावा चालू केला.

तिकडे विठोबाचा डावा डोळा लवू लागला. डावा बाहू स्फुरण पावू लागला. तेव्हा ‘नामदेवावर काहीतरी संकट आले असावे’, असे त्यास वाटू लागले. संत नामदेवांचा धावा ऐकून देवाने किमया केली. ते सत्वर धावून गेले आणि विहिरीतील पाणी उचंबळून वरपर्यंत आले. नामदेवाची तहान भागली ! हा चमत्कार पाहून ज्ञानदेवही थक्क झाले. ‘याने तर देवाला कायमचे ऋणी करून ठेवले आहे’, एवढेच उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले.

तीर्थावळीची सांगता !

तीर्थावळी पूर्ण करून, दोघे भक्त पंढरीत दाखल झाले. विठोबाला पहाताच नाम्याचा कंठ दाटून आला. देवाच्या चरणांवर डोके ठेवून तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला. हे अश्रू देवाच्या पुनर्भेटीचे होते. नामा भेटल्यामुळे विठोबासही भरून आले. देव म्हणाले, ‘‘नाम्या, तू जवळ नसल्यामुळे तुझ्या काळजीने मला निद्रा येत नव्हती. उदास वाटत होते. क्षणभरही तुझा विसर पडत नव्हता. अरे, तुला माझी आणि मला तुझी सतत आठवण येत होती. तुझी माझी आवडी म्हणजे गुळाची गोडीच होय.’’ इतके म्हणून देवाने नाम्याला आलिंगन दिले. त्याची हनुवटी वर करून त्यास कुरवाळले आणि आपल्या कंठातील तुळशीमाळा त्याच्या गळ्यात घातली. रखुमाई आरती घेऊन आली आणि तिने ज्ञानदेव अन् नामदेव यांचे औक्षण केले. कौतुकाने नाम्याची हनुवटी धरून कृपादृष्टीने ती पुनःपुन्हा त्याच्याकडे पाहू लागली.

तीर्थावळीचे उद्यापन !

नाम्याचे कौतुक करतांना देव म्हणाले, ‘‘नाम्या, तू खरोखर धन्य आहेस. सार्‍या तीर्थांचे दर्शन घेऊन प्रत्येक क्षेत्रात पापक्षालन करून तू सुखरूप परत आलास. जन्माला येऊन तू सार्थक केलेस. शोक, मोह आणि दु:ख यांचे निवारण करून स्वहित साधलेस. आता तीर्थयात्रेचे मावंदे (उद्यापन) केलेस, म्हणजे तीर्थावळी सुफळ, संपूर्ण होईल. आता तू पंढरीतील सर्व ब्राह्मणांना ब्राह्मणभोजन घालून तीर्थावळीचे उद्यापन कर.’’ देवांचे असे बोलणे होत आहे, इतक्यात रखुमाई देवांना म्हणाली, ‘देवा, तुमच्याविना याला दुसरे सगे-सोयरे कुणीतरी आहेत का ? तुमचे चरण दृढपणे धरून तो राहिला आहे. जन्माला येऊन त्याने जे जे जोडले, ते ते सर्व त्याने तुमच्या पायी वाहिले आहे. आता आपणच पुढाकार घेऊन उद्यापनाचा सोहळा साजरा केला पाहिजे.’’ रुक्मिणीचे बोलणे पूर्ण होताच स्वत: पांडुरंग नाम्याचा हात धरून ब्राह्मणांना भोजनाचे आमंत्रण देण्यास निघाले. ते स्वतःच उद्यापनाच्या कार्यक्रमाचे यजमान झाले होते !

भोजनाचा थाट !

ठरलेल्या दि‍वशी पंढरीतील ब्राह्मण उद्यापनाला उपस्थित झाले. पाटावर बसलेल्या द्विजांना कस्तुरीचे ‌टिळे लावण्यात आले. दिव्य चंदनाची उटी लावून त्यांच्या गळ्यात तुळशीमाळा घालण्यात आल्या. धुपाचा सुवास दरवळू लागला. यजमान म्हणून वावरणार्‍या पंढरीरायांनी संत नामदेवांच्या हस्ते संकल्प सोडला. ‘राई-रखुमाबाई’ (पांडुरंगाची पहिली पत्नी ‘रुक्मिणी’ आणि दुसरी पत्नी ‘राई’) आग्रह करून पंगतीत ‍वाढू लागल्या. इतका वेळ नामा महाद्वारात उभा होता. विठोबाने धावत जाऊन त्याला आलिंगन देऊन ताटावर बसवले आणि स्वतः त्याला घास भरवू लागले. इतके दिवस नाम्याच्या विरहाने खंतावलेल्या पंढरीनाथांनी त्याला प्रेमपान्हा पाजला.

पंढरीनाथांचे प्रायश्चित्त !

नाम्याचे उच्छिष्ट पंढरीनाथांनी भक्षण केले. हे पाहून पंगतीतील कर्मठ विप्र भडकले. श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली, हे त्यातील कथेकर्‍यांना काय ठाऊक नव्हते ? तरीही, ‘देवाने सर्व क्रियाकर्म पायदळी तुडवले’, असा आरोप ते करू लागले. ‘एका शिंप्याचे उच्छिष्ट भक्षण करून देवाने पाप केले आहे. त्याच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा’, असे ते म्हणू लागले. देवाने विधीवत प्रायश्चित्त घेतले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. देवाने स्पष्टीकरण दिले, ‘‘आपण सांगाल, ते प्रायश्चित्त घेण्यास मी सिद्ध आहे.’’ तेव्हा ‘चंद्रभागेत स्नान करून शुद्ध व्हावे आणि ब्राह्मणांना प्रदक्षिणा घालून हेमदान करून सत्त्वशुद्धी करावी’, असा निर्णय झाला. भगवंतांनी हे प्रायश्चित्त तर घेतलेच; परंतु ते देव ब्राह्मणांना एवढेच म्हणाले, ‘‘नामयासाठी द्विज सांगतील, ते करावयास पंढरीनाथ सिद्ध आहे.’’

– डॉ. एच्.वाय. कुळकर्णी (साभार : मासिक ‘श्रीक्षेत्र पावस’, १५.१२.२०२३)