नवी देहली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ‘इंडि’ आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने ही घोषणा केली. यानंतर काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे राहुल गांधी हे गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य असतील. याआधी त्यांचे वडील राजीव गांधी यांनी वर्ष १९८९-९० मध्ये, तर आई सोनिया गांधी यांनी वर्ष १९९९ ते २००४ पर्यंत हे पद भूषवले होते. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षांपासून हे पद रिक्त होते. वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये कोणत्याच विरोधी पक्षाकडे आवश्यक असणारे १० टक्के सदस्य नव्हते. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणत्याही पक्षाकडे एकूण ५४३ पैकी ५५ सदस्य असावे लागतात.