राज्‍यघटना आणि देश यांविरोधी शक्‍तींना रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र आवश्‍यक ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

  • २४ ते ३० जून या कालावधीत गोव्‍यात ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ !

  • हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते रमेश शिंदे यांची स्‍पष्‍टोक्‍ती !

डाव्‍या बाजूने श्री. रमेश शिंदे, सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, श्री. चेतन राजहंस आणि श्री. जयेश थळी

पणजी (गोवा) – आपल्‍या देशातील लोकशाही व्‍यवस्‍थेनुसार निवडून येणारे लोकप्रतिनिधी संसदेत बसून देशातील जनतेच्‍या हितांचे रक्षण करणारे, तसेच जनतेला सुरक्षा देणारे कायदे बनवतात; मात्र ज्‍यांना भारताची राज्‍यघटना, सार्वभौमता आणि कायदेच मान्‍य नाहीत, असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्‍चितच भविष्‍यात या राज्‍यघटनेला धोका निर्माण होऊ शकतो. त्‍यामुळेच राज्‍यघटना आणि देश यांविरोधी शक्‍तींना रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र आवश्‍यक आहे, अशी स्‍पष्‍टोक्‍ती हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते रमेश शिंदे यांनी येथे केली. ते येथील हॉटेल ‘मनोशांती’मध्‍ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रतीवर्षीप्रमाणे हिंदु जनजागृती समितीने यंदाही १२ वे ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन केले आहे. हा महोत्‍सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्‍थान’, फोंडा, गोवा येथे संपन्‍न होणार आहे, अशी माहिती श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी दिली. या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस आणि ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे गोवा राज्‍य सचिव श्री. जयेश थळी हे उपस्‍थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली सूत्रे

श्री. रमेश शिंदे

१. या लोकसभा निवडणुकीत पाकिस्‍तानच्‍या आय.एस्.आय.शी संबंध असल्‍याचा आरोप असणारा खलिस्‍तानवादी नेता अमृतपाल सिंह आणि काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्‍याच्‍या आरोपावरून अटकेत असणारा ‘रशीद इंजिनियर’ यांच्‍यासारखे देशविरोधी, तसेच फुटीरतावादी कारागृहातून निवडून आले आहेत. दुसरीकडे ‘गोव्‍यातील जनतेवर राज्‍यघटना बलपूर्वक लादली गेली’, असे म्‍हणून गोमंतकाला मुक्‍त करण्‍यासाठी लढणार्‍या क्रांतीकारकांचा अपमान करणारे विरियातो फर्नांडिस खासदार म्‍हणून निवडून येणे हे एकप्रकारे भारतीय लोकशाहीचे अपयश म्‍हणावे लागेल.

२. देशाच्‍या सुरक्षिततेचा विचार केला असता, काश्‍मीरमधील आतंकवाद आता हळूहळू हिंदुबहुल जम्‍मूच्‍या दिशेने सरकत आहे, हे माता वैष्‍णोदेवीला जाणार्‍या भक्‍तांच्‍या बसवरील आतंकवादी आक्रमणावरून समोर आले.

३. पंजाबमधील खलिस्‍तानवादी चळवळीसह राष्‍ट्रविरोधी आणि विदेशी शक्‍ती भारताला अस्‍थिर करण्‍यासाठी जोमाने सक्रीय झाल्‍या आहेत. भारतासह जगभरातील हिंदूंवरील आक्रमणे वाढली आहेत. जयपूरमधून मुसलमानबहुल क्षेत्रांतून सहस्रो हिंदूंचे पलायन होत आहे. बंगालमध्‍येही हिंदू आणि मंदिरे यांच्‍यावर आक्रमणे वाढली आहेत.

४. जागतिक स्‍तरावर विविध देशांमधील युद्धे आणि अस्‍थिरता पहाता अनेक देश भारताकडे आशेने पाहत आहेत; कारण हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो विश्‍वबंधुत्‍वाची आणि ‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’ची संकल्‍पना मांडून सर्व समाजाला जोडू शकतो अन् एकसंघ ठेवू शकतो.

‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’ यावर चर्चा करणार ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

सनातन धर्मावर होत असलेल्‍या टीकेला उत्तर देण्‍यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्‍यासाठी’ ‘सनातन धर्मरक्षण अभियान’ राबवण्‍यात आले. या अधिवेशनात ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’ यावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्‍यात येणार आहे.

मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचे अभियान अधिक व्‍यापक करणार ! – जयेश थळी, गोवा राज्‍य सचिव, गोमंतक मंदिर महासंघ

श्री. जयेश थळी

‘गोमंतक मंदिर महासंघा’चे गोवा राज्‍य सचिव श्री. जयेश थळी म्‍हणाले की, हिंदु राष्‍ट्र अधिवेशनामध्‍ये ठरलेल्‍या ‘मंदिर संस्‍कृती रक्षणा’चे धोरणानुसार ‘मंदिर महासंघा’च्‍या वतीने महाराष्‍ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्‍यांत ७१० हून अधिक मंदिरांनी वस्‍त्रसंहिता लागू केली आहे. हे अभियान आणखी व्‍यापक करण्‍यात येईल. तसेच मंदिर संस्‍कृती रक्षणासाठी दिशा ठरवण्‍यात येईल.

भारताला पुन्‍हा ‘विश्‍वगुरु’ बनवण्‍याचे ध्‍येय ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

‘हिंदु राष्‍ट्र’ हे सूत्र केवळ भारताच्‍या स्‍तरावर नव्‍हे, तर विश्‍वपटलावर चर्चिले जात आहे. गेल्‍या १०-१२ वर्षांतील देशातील वातावरण पहाता विविध देश भारताची हिंदु राष्‍ट्राकडे वाटचाल चालू असल्‍याचे सूतोवाच करत आहेत. अमेरिकी प्रसिद्धीमाध्‍यमांनी श्रीरामजन्‍मभूमीत श्रीरामलल्लाच्‍या प्राणप्रतिष्‍ठापणेला ‘न्‍यू डिवाइन इंडिया’ (नव दैवी भारत) म्‍हटले. ‘नमस्‍ते’ म्‍हणणे, ‘योग’ करणे आदी भारतीय वैशिष्‍ट्यांचे अनुसरण विदेशी करत आहे. आता ‘भारतला विश्‍वगुरु बनवणे’ हे आमचे ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे या वर्षीचे ध्‍येय आहे. त्‍यामुळे ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ खर्‍या अर्थाने ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ झाला आहे. या अधिवेशनाला अमेरिका येथून नीलेश नीलकंठ ओक, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून स्‍वामी ब्रह्मस्‍वरुपानंद महाराज, घाना येथून श्रीनिवास दास, नेपाळमधून श्री. शंकर खराल, श्री. त्रिलोक ज्‍योती श्रेस्‍ता, श्री. जगन्‍नाथ कोईराला, श्री. लक्ष्मण पंथी, श्री. संतोष शहा आणि इंडोनेशिया येथून श्री. धर्म यशा येणार आहेत.

अधिवेशनात चर्चा करण्‍यात येणारे विषय

या अधिवेशनात वर्षभरात हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी ‘समान कृती कार्यक्रम’ निश्‍चित केले जाणार आहेत.

अ. २७ जूनला ‘हिंदु राष्‍ट्र विचारमंथन महोत्‍सव’ संपन्‍न होणार आहे. यामध्‍ये देशभरातील हिंदुत्‍वनिष्‍ठ विचारवंत, लेखक, व्‍याख्‍याते, जे वैचारिक स्‍तरावर हिंदु राष्‍ट्राविषयी जागृती करत आहेत, त्‍यांचा सहभाग असणार आहे.

आ. २८ जूनला ‘मंदिर संस्‍कृती परिषद’ आयोजित करण्‍यात आली आहे. यामध्‍ये देशभरातील मंदिरांचे विश्‍वस्‍त, पुजारी एकत्रित येणार आहेत. मंदिर-संस्‍कृतीचे जतन, संवर्धन आणि रक्षण याविषयांवर तज्ञ मंडळींची भाषणे आणि परिसंवाद यांचे आयोजन
असेल.

इ. २९ ते ३० जून या कालावधीत ‘अधिवक्‍ता संमेलन’ आयोजित  करण्‍यात येणार आहे.  यामध्‍ये हिंदु संघटना, कार्यकर्ते यांच्‍यावर होणार्‍या अत्‍याचारांच्‍या संदर्भात न्‍यायालयीन साहाय्‍य करणारे, विविध आघातांच्‍या विरोधात न्‍यायालयीन लढा देणारे अधिवक्‍ते या संमेलनात सहभागी होणार आहेत.

अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्‍थळ ‘HinduJagruti.org’ याद्वारे, तसेच समितीच्‍या ‘HinduJagruti’ या ‘यू-ट्यूब’ चॅनेल आणि ‘facebook.comhjshindi1’ या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्‍वनिष्‍ठांनी या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चा लाभ घ्‍यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने करण्‍यात आले.

‘राज्‍यघटना आमच्‍यावर थोपवली’, असे म्‍हणणारे खासदार बनणे, हे लोकशाहीचे अपयश !

दक्षिण गोव्‍याचे काँग्रेसचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी ‘गोव्‍यातील जनतेवर भारतीय राज्‍यघटना लादली गेली’, असे वक्‍तव्‍य करून गोमंतकाला मुक्‍त करण्‍यासाठी लढणार्‍या क्रांतीकारकांचा अपमान केला. वास्‍तविक स्‍वातंत्र्यसैनिकांनी गोवा स्‍वतंत्र करण्‍यासाठी क्रांती केली कि स्‍वतंत्र गोवा निर्माण करण्‍यासाठी क्रांती केली ? या दोन्‍हींमधील भेद आपण समजून घेतला पाहिजे. गोवा १९६१ मध्‍ये स्‍वतंत्र झाला आणि सिक्‍किम वर्ष १९७४ मध्‍ये स्‍वतंत्र झाला; म्‍हणून सिक्‍किमच्‍या लोकांनी ‘राज्‍यघटना आमच्‍यावर थोपवली’, असे म्‍हणायचे का ? भारताची राज्‍यघटना वर्ष १९५० मध्‍ये अस्‍तित्‍वात आली आणि इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७६ मध्‍ये आणीबाणीच्‍या काळात कुणाचेही मत जाणून न घेता ‘सेक्‍युलर’ शब्‍द राज्‍यघटनेत घुसडला, मग देशातील सर्व हिंदूंनी ‘सेक्‍युलर’ राज्‍यघटना आमच्‍यावर थोपवली, असे म्‍हणायचे का ? ‘राज्‍यघटना आमच्‍या थोपवली’, असे म्‍हणणारे खासदार निवडून येणे, हे एक प्रकारे भारतीय लोकशाहीचे अपयशच आहे.

(क्लिक करा ↑)

पणजी येथील पत्रकार परिषदेतील प्रश्‍नोत्तरे

१. पत्रकार :  कारागृहात राहून निवडणूक लढवणे अयोग्‍य आहे का ?

श्री. रमेश शिंदे : कारागृहात राहून निवडणूक लढवणे, हा अधिकार राज्‍यघटनेने दिला आहे आणि यासंबंधी अडचण असू शकत नाही; मात्र पाकिस्‍तानच्‍या ‘आय.एस्.आय.’ या गुप्‍तचर संस्‍थेशी संबंध असलेले कारागृहात राहून निवडणूक जिंकतात, हे चुकीचे आहे. राज्‍यघटना न मानणारे आणि राज्‍यघटनेच्‍या विरोधात काम करणारे संसेदचे रक्षण करणार का ? हे खासदार संसदेत राज्‍यघटनेवर हात ठेवून शपथ घेणार आहेत का ? आतंकवाद आणि खलिस्‍तानी चळवळ यांना समर्थन देणारे खासदार देश अखंड कसा ठेवणार ?

२. पत्रकार : गोवा सरकारने हिंदुत्‍वनिष्‍ठ प्रमोद मुतालिक यांच्‍यावर गोव्‍यात प्रवेशबंदी घातली आहे. यावर हिंदु जनजागृती समितीचे मत काय आहे?

श्री. रमेश शिंदे – श्री. प्रमोद मुतालिक यांच्‍यावरील प्रवेशबंदी २ कारणांमुळे बेकायदेशीर आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या ७ सदस्‍यीय खंडपिठाने ‘भारतातील कोणत्‍याही नागरिकाला कुठेही जाण्‍यापासून रोखू शकत नाही’, असा निर्णय एका खटल्‍यात दिला आहे. दुसरे म्‍हणजे श्री. मुतालिक यांच्‍या संघटनेने एका ‘पब’वर (मद्यालयावर) आक्रमण केल्‍याने त्‍यांच्‍यावर गोव्‍यात प्रवेशबंदी घालण्‍यात आली; मात्र या प्रकरणी न्‍यायालयाचा निर्णय आलेला असून यामध्‍ये प्रमोद मुतालिक यांना निर्दोष घोषित करण्‍यात आले आहे. या कारणामुळे प्रमोद मुतालिक यांच्‍यावरील प्रवेशबंदी बेकायदेशीर आहे. या प्रकरणी न्‍याय मिळण्‍यासाठी आवश्‍यकता भासल्‍यास पुन्‍हा गोवा सरकार आणि सर्वोच्‍च न्‍यायालय यांच्‍याकडे जाणार आहे. वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात होणार्‍या अधिवक्‍ता संमेलनात या विषयावर चर्चा करण्‍यात येणार आहे. कोणतीही शासकीय कागदपत्रे नसलेले रोहिंग्‍या आणि बांगलादेशी येऊन गोव्‍यात वास्‍तव्‍य करतात; मात्र प्रमोद मुतालिक या एका व्‍यक्‍तीमुळे गोव्‍यातील शांतता कशी बिघडते ? गोमंतकियांनीही अशा बेकायदेशीर कृतीला समर्थन देऊ नये.