Immediate Ban On Film ‘Maharaj’ : ‘महाराज’ या ‘नेटफ्लिक्स’वरील चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी ! – हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु जनजागृती समितीची पुणे येथे आंदोलनाद्वारे मागणी

  • ‘महाराज’ या नेटफ्लिक्स चित्रपटात संतांना गुंड दाखवून अपमान करण्यात आल्याचे प्रकरण

पुणे, १२ जून (वार्ता.) : भारत ही साधू-संतांची भूमी आहे. संतांनी संपूर्ण विश्‍वामध्ये जाऊन भारतीय संस्कृती, धर्म, ज्ञान, कला, सभ्यता, सदाचार, तसेच भगवद्भक्ती शिकवून समाजाला आदर्श जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. असे असतांना अभिनेते आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान याची प्रमुख भूमिका असलेला, तसेच ‘यशराज फिल्म्स’ची निर्मिती असलेला ‘महाराज’ या ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी (या अ‍ॅप्सवरून चित्रपट अथवा अन्य कार्यक्रम पहाण्याची सुविधा असते) मंचावर प्रसारित होणार्‍या चित्रपटातून साधूसंतांना दुराचारी, गुंड दाखवून त्यांची अपकीर्ती करण्यात आली आहे.

आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी

त्यामुळे या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ जून या दिवशी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

या वेळी ७० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट १४ जून या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात साधू-संत हे दुराचारी आणि वासनांध असतात, असे दाखवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून कायदा अन् सुव्यवस्था बिघडली, तर त्याला सर्वस्वी जुनैद खान, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्स हे उत्तरदायी असतील.

त्यामुळे सरकारने या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, तसेच देवता, धर्म, संत आदींचा अवमान रोखण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ देशभरात लागू करावा, अशी मागणीही या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?

‘महाराज’ या चित्रपटातून १५० वर्षांपूर्वी इंग्रजांच्या राजवटीतील एका घटनेवरून आज पुन्हा साधू-संत आणि वल्लभ संप्रदाय यांच्याविषयी चुकीचे चित्रण उभे केले जात आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून देशभर साधूसंतांची आणि वल्लभ संप्रदायाची अपकीर्ती करण्याचे षड्यंंत्र केले जात आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधून एका हिंदु धार्मिक नेत्याची व्यक्तिरेखा नकारात्मक स्वरूपात दाखवली जात आहे.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूबहुल देशात हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येते, हे संतापजनक !
  • हिंदु संतांचा अपमान करणारे चित्रपट बनवणारे हिंदुद्वेष्टे मदरशांंमध्ये मौलवींद्वारे होणारे मुला-मुलींचे लैंगिक शोषण किंवा चर्च वा चर्चप्रणीत वसतीगृहांमध्ये ख्रिस्ती धर्मगुरूंकडून होणारे तरुणी आणि महिला यांचे शोषण या विषयावर चित्रपट बनवतील का ?
  • हिंदू अतीसहिष्णु असल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, असेच चित्रपट काढले जात आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याला विरोध करणे आवश्यक !