कोल्हापूर, ७ जून (वार्ता.) – नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात २४ उमेदवार उभे होते, त्यापैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. ही रक्कम ४ लाख ३७ सहस्र ५०० रुपये इतकी आहे. हातकणंगले मतदारसंघात २७ उमेदवार उभे होते, त्यापैकी २५ जणांची अनामत रक्कम जप्त झाली असून ती ७ लाख ७५ सहस्र रुपये इतकी आहे. राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात झाले, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘आचारसंहिता संपल्याचे अधिकृत पत्र अद्याप निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले नाही; मात्र आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना त्यासाठी कोणतीही अडचण नाही. आलमट्टी धरणात पाणीपातळी साठा हा १५ ऑगस्टपर्यंत ५१७.५ मीटर इतका असावा, असे गेल्या वेळी झालेल्या बैठकीत ठरले आहे. या संदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या संयुक्त बैठका नियमित होत आहेत आणि यापुढेही होतील. तेथे समन्वय ठेवण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचे एक अधिकारी आलमट्टीशी नेहमी समन्वय ठेवतात.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात ग्रामीण पातळीवर शुद्धीकरणाच्या प्रकल्पाची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील क्षमताही वाढवण्यात आली असून अन्य प्रदूषण करणार्या घटकांवर कारवाई करण्यात येत आहे. गर्भलिंग निदान प्रकरणात पडताळणी कुणी करत असेल, तर त्यासाठी आम्ही कठोर कारवाई करू.’’
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्याच्या संदर्भात व्यापार्यांनी मांडलेल्या सूचनेप्रमाणे आराखड्यात पालट करून शासनास सादर करण्यात येईल !
राज्यशासनाच्या प्रस्तावित श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्याचे त्या परिसरातील नागरिक आणि व्यापारी यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले होते. या संदर्भाने तेथील नागरिक-व्यापारी यांनी ज्या सूचना केल्या होत्या, त्या सूचनांचा अंतर्भाव करून, त्यात योग्य तो पालट करून तो शासनास सादर करण्यात येईल. हा आराखडा शासनाकडून अंतिम झाल्यावर त्याचे काम चालू होईल, अशी माहिती जिल्हाधिकार्यांनी पत्रकारांना दिली.