प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
आजच्या काळात जन्माधिष्ठित जातीव्यवस्था विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येणे, हे फार सोपे आहे. विज्ञानातील अनुवंशशास्त्र (जेनिटिक्स) या शाखेचे अध्ययन केल्यानंतर एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणांचे संक्रमण कसे होते, हे स्पष्ट झालेले आहे. आज दुर्दैवाने कुणी स्वच्छ दृष्टीने गंभीरपणे विचार करायला सिद्ध नाही.
१. प्राण्यांमध्ये विविध जाती असणे
समाजधारणेसाठी अनेक प्रकारचे सद्गुण आणि क्षमता यांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ विचार करू, शेतकर्याला बैलांची आवश्यकता अनेक प्रकारे असते. निरनिराळ्या कामांसाठी वेगवेगळ्या जातीचे बैल उपयोगी असतात. बैलगाडीसाठी, नांगरण्यासाठी वेगळ्या जातीचे बैल असतात. काळी आणि सपाट भूमी नांगरण्यासाठीचे बैल डोंगराळ किंवा माळरानावर उपयोगी नसतात. त्यासाठी वेगळ्या जातीचे बैल लागतात. घोड्यांचा विचार केला, तर टांगा, शर्यत, लष्करी वापर, पोलोसारखा खेळ किंवा वरातीपुढे नाचणारे-शोभेचे असे वेगवेगळ्या विशिष्ट जातीचे घोडे असतात. टांग्याचे घोडे शर्यतीसाठी आणि शर्यतीचे घोडे पोलोसाठी उपयोगी पडत नाहीत. स्फोटके, अमली पदार्थ यांचा शोध घेणारी, वासावरून माग काढणारी इत्यादी विशेष कामे करणारी पोलिसांची कुत्री ही विशिष्ट प्रजातीचीच असतात. ‘जन्मतः पूर्वजांकडून मिळालेले विशेष गुणधर्म जाणीवपूर्वक जोपासले, वाढवले, तर ते अधिक प्रभावी होतात’, हे प्राणीसृष्टीमध्ये पूर्वीच सिद्ध झालेले आहे. वरील उल्लेखांवरून ते लक्षात येईल. त्यासाठी त्या त्या प्राण्यांच्या नर-मादींच्या प्रजातींची काळजीपूर्वक जोपासना केली जाते.
२. प्रारंभी गुणकर्मानुसार असलेली व्यवस्था पालटून पुढे ‘जन्माधिष्ठित’ व्यवस्था होणे
प्राण्यांपेक्षा मानवी जीवन हे श्रेष्ठ दर्जाचे आहे, असे आपण मानतो. मग मानवासाठी अनुवंशाची काळजी घेतली गेली पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. धर्मशास्त्रात या विशेष शुद्ध गुणांची योग्य जोपासना करण्यासाठी वर्ण-जातीव्यवस्था आणि त्याचे विविध आचारधर्म निर्माण केले. ज्या वेळेस समाजधारणेसाठी आवश्यक असणारे ज्ञान, संरक्षण, व्यवहार आणि सेवाकार्ये (अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ४ वर्ण) या ४ गोष्टी एक व्यक्ती योग्य प्रकारे करू शकत होती, त्या सत्ययुगात वर्ण नव्हते.
आजही सप्तद्वीपात्मक भूलोकांपैकी आपण या पृथ्वीवर, म्हणजे जंबुद्वीपावर रहातो. या ७ द्वीपांपैकी पुष्करद्वीपामध्ये आजही वर्णव्यवस्थाही नाही. पुढे मानवाची ही क्षमता न्यून झाली. समाजधारणेच्या या ४ कार्यशक्तींची विभागणी केली, तर मोठी सोय होईल, या अनुभवाने ४ वर्ण केले गेले. आधी ते ‘गुणकर्मविभागशः’ होते. प्रत्येक व्यक्ती तिच्या आवड आणि क्षमतेप्रमाणे उचित वर्ण स्वीकारत असे. काही काळानंतरही व्यवस्था पालटून ‘जन्माधिष्ठित’ व्यवस्था स्वीकारली गेली. त्या पाठीमागे अनेक शास्त्रीय प्रयोगांची बैठक आहे. हे पालट करतांना या सगळ्याच्या मागे राष्ट्रधारणा, मानवाची क्षमता आणि अनुवंश यांचा शुद्ध शास्त्रीय विचारच आहे.
३. जन्माधिष्ठित व्यवस्था मानण्याचे लाभ
जन्माधिष्ठित व्यवस्था मानण्याचेही अनेक लाभ असतात. बेकारी, उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही, अशी अवस्था उरत नाही. उदाहरणार्थ विचार केला, तर जर अधिवक्त्याचा मुलगा अधिवक्ता झाला, तर त्याला त्याच्या व्यवसायासाठीच्या सर्व कायद्याची पुस्तके अशा प्रकारच्या सुविधा, अशिलांची उपलब्धी, आपत्कालीन परिस्थितीत तज्ञ वडिलांचे अनुभवी मार्गदर्शन या गोष्टी सहज उपलब्ध असतात. लहानपणापासून त्या व्यावसायिक नीतीचे उचित संस्कार त्या मुलावर नकळत झालेले असतात, त्यामुळे त्याचा स्वभावधर्म त्यानुसार बनत जातो. हाच प्रकार आधुनिक वैद्याचा (डॉक्टरचा) मुलगा आधुनिक वैद्य होण्यात असतो. यात जर उलटे झाले, म्हणजे आधुनिक वैद्याचा मुलगा अधिवक्ता आणि अधिवक्त्याचा मुलगा आधुनिक वैद्य, तर दोघांनाही वर उल्लेख केलेल्या किमान गोष्टींकरता पुष्कळ व्यय अन् संघर्ष करावा लागतो.
४. जातीव्यवस्थेची सद्यःस्थिती
आज आपल्याकडे एकीकडे केवळ स्वार्थासाठी जातीव्यवस्थेला कलंकीत करून तिच्या निर्मूलनाच्या घोषणा करणे चालू आहे. दुसरीकडे तीच मंडळी या ना त्या निमित्ताने जातीजातींचे संकुचित आग्रह वाढवत आहेत. ‘धर्मशास्त्राप्रमाणे भोजन आणि विवाह या दोन प्रसंगी जातीचा विचार करावा, इतरत्र नाही’, असे म्हटले आहे. आज ‘जातीनिर्मूलनाच्या नावाखाली या दोनच प्रसंगी जात विचारात घेऊ नये’, असे म्हटले जाते. इतरत्र अधिक बारकाईने अगदी पोटजातींचाही विचार केला जातो, अशी विपरित परिस्थिती दिसते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)