तणावमुक्त जीवनासाठी व्यक्तीमत्त्वातील दोष दूर करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

मध्यप्रदेशातील ‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’ येथे ‘तणावमुक्ती’ विषयावर प्रवचनाचे आयोजन

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ

सिंगरोली (मध्यप्रदेश) – एका सर्वेक्षणानुसार ‘कार्पाेरेट’ क्षेत्रातील ७९ टक्के कर्मचार्‍यांना प्रतिदिन तणाव असतो. या तणावामुळे ७६ टक्के लोकांच्या कामावर दुष्परिणाम होतो. आपल्यात परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्याचा अभाव असतो. त्यामुळे व्यक्ती तणावग्रस्त बनते. हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपल्या व्यक्तीमत्त्वात असलेले स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’चे अधिकारी आणि कर्मचारी यांना केले.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’चे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी स्थानिक निगाही आनंदम् सभागृहामध्ये ‘तणावमुक्ती कशी करावी ?’, या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी ‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’चे अध्यक्ष सहव्यवस्थापकीय निदेशक (संचालक) बी. साई राम, निदेशक (कार्मिक) मनीष कुमार, निदेशक (वित्त) रजनीश नारायण, तांत्रिक निदेशक जितेंद्र मलिक, निदेशक सुनील प्रसाद सिंह, मुख्य सतर्कता अधिकारी रवींद्र प्रसाद, स्वतंत्र निदेशक सुबीना बंसल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांना कार्यक्रम अतिशय आवडला. असे कार्यक्रम परत आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

सद्गुरु सिंगबाळ पुढे म्हणाले, ‘‘तणाव न्यून करण्यासाठी मनाला स्वयंसूचना देणे, हा एक प्रभावी मार्ग आहे. स्वयंसूचना ही आपल्या बुद्धीने आंतरिक मनाला दोषांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिलेली सूचना असते. स्वयंसूचना आपल्याला आपले विचार आणि भावना पालटण्यास साहाय्य करते. याचा लाभ सहस्रो लोकांना होत आहे. नामस्मरण केल्याने मानसिक दुर्बलता न्यून होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे आपण कठीण परिस्थितीतही स्थिर राहू शकतो.’’

क्षणचित्रे 

१.  सभागृहात सनातन संस्थेच्या विविध आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. शेवटी अनेक जिज्ञासूंनी सत्संगात नियमित सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

२. ‘नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड’चे तांत्रिक संचालक जितेंद्र मलिक यांनी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन आश्रमाला भेट दिली होती. त्यांनी आश्रमातील अत्यंत शांतता अनुभवली होती. या प्रकारचा लाभ त्यांच्या कर्मचार्‍यांनाही मिळायला हवा. या उद्देशाने त्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता.

३. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक जिज्ञासू साधनेविषयीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बराच वेळ थांबले होते. ‘हा विषय महत्त्वाचा असून अनेकांसाठी तो आवश्यक आहे’, असे अनेक कुटुंबियांनी सांगितले.

४. ‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’चे अध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक श्री. बी. साईराम थोड्या वेळासाठी कार्यक्रमाला उपस्थित रहाणार होते; पण कार्यक्रमाला आल्यावर त्यांनी शेवटपर्यंत थांबून कार्यक्रमाचा लाभ घेतला.