आंदोला (कर्नाटक) येथील करूणेश्‍वर मठाचे पिठाधिपती सिद्धलिंग श्री यांच्या विरोधात जातीय निंदा केल्याचा गुन्हा नोंद !

आंदोला करूणेश्‍वर मठाचे पिठाधिपती आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धलिंग श्री

कलबुर्गी (कर्नाटक) – जेवरगी तालुक्यातील आंदोला करूणेश्‍वर मठाचे पिठाधिपती असणारे श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धलिंग श्री यांच्याविरुद्ध कलबुर्गी येथे जातीवर आधारित निंदा केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एप्रिल मासात हुब्बळ्ळी येथील नेहा हिरेमठ हिची हत्या आणि कमलापूरच्या मुगुळ नागाव येथील युवकाची आत्महत्या, या प्रकरणांचा निषेध करून कलबुर्गी येथील पटेल भागात झालेल्या नागरिक समिती आंदोलनात सहभागी झालेल्या सिद्धलिंग श्री यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली होती. ‘या टीकेमुळे आमचा समुदाय दुखावला गेला आहे’, असे सांगत सिद्धलिंग श्री. बसवनगौडा यतनाळ आणि खासदार उमेश जाधव यांच्याविरुद्ध प्रादेशिक कुरब संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेंद्रप्पा पुजारी यांनी पोलिसांत तक्रार केली होती.

सिद्धलिंग श्री म्हणाले की, जातीय निंदा केली नसतांनाही राजकीय दबावामुळे आमच्यावर खोटा आरोप करून तक्रार करण्यात आली आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात कायदेशीर लढा देऊ. कलबुर्गी येथे पोलीस, जिल्हा प्रशासन आणि प्रमुख राजकारणी एक नियम, तर सामान्य जनतेला दुसरा नियम, असे केले जात आहे. आम्ही सरकारचे हे दुटप्पी धोरण उघड करू आणि सर्व न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ.