NCP (Sharad Pawar) Hinduphobia Exposed ! : (म्हणे) ‘श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी म्हणजे ‘हिंदु आतंकवादी’ ! – शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना उठला हिंदुद्वेषी पोटशूळ !

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांना ‘हिंदु आतंकवादी’ म्हटले आहे. ‘सत्याग्रही’ या यूट्यूब वाहिनीवर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये असा उल्लेख करण्यात आला. त्या व्हिडिओला त्यांनी ‘धर्मांतरासाठी आमीष आणि रायगडावर तालिबानी पाठशाळा’ असे शीर्षक दिले होते. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, सद्सद्विवेकबुद्धी वापरायची नसते. त्यामुळे धारकरी हे आतंकवाद्याच्याच आवेशात असतात. गडदुर्ग मोहीम राबवण्याच्या प्रकारातून त्यांची माथी भडकवली जातात. हा हिंदु आतंकवादी बनवण्याचाच प्रकार आहे.

हिंदुत्वनिष्ठ कधी आतंकवादी होऊ शकत नाहीत ! – अनंत करमुसे, कार्यकर्ते, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

सत्तेत नसतात, तेव्हा पवारसाहेबांचे बगलबच्चे समाजात तेढ कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देऊन असतात. अशा पोकळ आरोपांकडे दुर्लक्ष करायचे असते; कारण हिंदुत्वनिष्ठ कधीही आतंकवादी होऊ शकत नाहीत. आदरणीय भिडे गुरुजींनी निर्माण केलेला धारकरी हा राष्ट्रभक्त आहे.

जनतेने निवडणुकीत झिडकारल्याने पोटदुखी ! – शंतनू खेडकर, सदस्य, राज्याभिषेक समारोह संस्था, ठाणे

वैचारिक उंची नसलेल्या विचारांच्या दबावाखाली येऊन कुठलीही माहिती नसतांना असे विधान करणे पूर्णतः निषेधार्थ आहे. लवांडे यांनी लवकरात लवकर शिव तपस्वी श्री संभाजीराव भिडेगुरुजी यांची क्षमा मागावी. महाराष्ट्रातील सर्व तरुणांना आपली जात-पात विसरून देशासाठी, धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे विचार आणि खरा इतिहास पोचवण्यासाठी ज्यांनी आयुष्याचा क्षण आणि क्षण खर्च केला, त्या शिवतपस्वी गुरुजींवर बोलायची याची लायकीच नाही. त्यांना महाराष्ट्रातील लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला; कारण जनतेने झिडकारले. याची पोटदुखी होत असल्याने अशी वक्तव्ये यांच्याकडून होत असावी.

माफी मागावी; अन्यथा योग्य समाचार घेऊ ! – अभय जगताप, कोकण प्रांत संयोजक, शिवशंभू विचार मंच

विकास लवांडे यांचा बोलविता धनी कोण आहे, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ज्यांची वैचारिक सुंता झालेली आहे, त्या दळभद्रांनी लक्षात ठेवावे की, तुम्ही शिवभक्तांना ललकारत आहात. लाखो शिवभक्तांना वंदनीय असणार्‍या भिडेगुरुजींविषयी, श्री शिवप्रितष्ठान हिंदुस्थान राबवत असलेल्या मोहिमेविषयी असभ्य भाषेत बोलाल, तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड जाईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडदुर्ग आम्हाला तीर्थक्षेत्रांसमान आहेत. तेथे मोहिमेच्या निमित्ताने जाणार्‍यांना जर ‘हिंदु आतंकवादी’ म्हणून तुम्ही संबोधित करणार असाल, तर हे खपवून घेतले जाणार नाही. दोन दिवसांत विकास लवांडे यांनी माफी मागितली नाही, तर समस्त शिवशंभू भक्त अशा प्रवृत्तीचा योग्य तो समाचार घेतील.

संपादकीय भूमिका

  • नवी देहली केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोंदीमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दच नाही. याउलट ‘इस्लामी आतंकवाद’ असा शब्द आहे, अशी माहिती ‘माहिती अधिकार’ कार्यकर्त्यांना मिळाल्याचे मध्यंतरी उघड झाले होते. असे असतांना हिंदूंवर असे उघडपणे आरोप करणार्‍या विकास लवांडे यांच्यावर कारवाईच व्हायला हवी !
  • हिंदूंना हिणवणार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हिंदूंनी घरी बसवले. तरीही या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ताळ्यावर येत नसतील, तर हिंदूंनी या पक्षाचे राजकीय अस्तित्वच संपवणे आवश्यक !