Nasik Mahapalika Removed Dargah : नाशिक येथे २५ वर्षांपूर्वी अतिक्रमण करून बांधलेला दर्गा महानगरपालिकेने हटवला !

  • हिंदूंच्या आक्रमक पवित्र्याचा परिणाम !

  • महंत सुधीरदास महाराज पोलिसांच्या कह्यात

नाशिक येथील काठेगल्ली परिसरात अतिक्रमण करून बांधण्यात आलेला दर्गा हिंदूंच्या आक्रमक पवित्र्यामुळे हटवण्यास सुरुवात !

नाशिक : काठेगल्ली परिसरात अतिक्रमण करून दर्गा बांधण्यात आल्याने शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्याला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता. २५ वर्षे पाठपुरावा करूनही महानगरपालिका अनधिकृत दर्गा हटवत नसल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलनाची चेतावणी दिली होती. ‘सकल हिंदु समाज’ संघटनेने या अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात हिंदूंना एक होण्याचे आवाहन केले होते. २२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता साधू-संतांच्या उपस्थितीत दर्ग्याच्या ठिकाणी बजरंग बलीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हिंदूंनी एक व्हावे, असे सांगण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन  पोलिसांनी तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवला. त्या परिसराला छावणीचेच रूप प्राप्त झाले होते. परिसरातील सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. धार्मिक स्थळावरील कारवाईच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता शहरात ८०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले. द्वारका, मुंबई नाका, वडाळा नाका, नाशिक-पुणे महामार्ग या परिसरातील रस्ते दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले. परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे की, हा दर्गा अवैध असल्याने तो तोडून त्या जागी हनुमानाचे मंदिर बनवावे.

महंत सुधीरदास महाराज पोलिसांच्या कह्यात !

महंत सुधीरदास महाराज

या प्रकरणी आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांसह महंत सुधीरदास महाराज यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले. (अनधिकृत दर्गा उभारणार्‍यांवर नव्हे, तर निष्पाप हिंदू आणि महंत यांना कह्यात घेणारे पोलीस हिंदुद्वेषीच ! अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)

मान्यवरांच्या प्रतिक्रिया !

१. महंत सुधीरदास महाराज, नाशिक

नाशिक येथे लँड (भूमी) जिहाद घडत आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अतिक्रमण काढण्याच्या सूचना प्रशासानला वेळोवेळी दिल्या होत्या. आता २५ वर्षांनंतर ते काढण्यात येत आहे. यापुढे हिंदूंचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.

२. आमदार देवयानी फरांदे, भाजप

दर्ग्याच्या अतिक्रमणाविषयी नागरिकांनी पालिकेला अनेकदा सांगितले होते; पण २५ वर्षे होऊनही त्याविषयी कृती न केल्याने नागरिक अप्रसन्न झाले. हिंदूबहुल वस्तीत अतिक्रमण करून हिंदूंवर दबाव आणणे चुकीचे आहे. हे आता आम्ही चालू देणार नाही.

३. भैरव उपासक तीर्थ पुरोहित मयुरेश दीक्षित, त्र्यंबकेश्वर, नाशिक

धर्मांधांकडून केला जाणारा धार्मिक उन्माद थांबला पाहिजे. हिंदु समाज ‘एक है, तो सैफ है’ (एकत्र राहिलो, तर सुरक्षित राहू) आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागलो गेलो, तर कापले जाऊ) हे लक्षात ठेवून आहे. लोककल्याणासाठीच्या भूमींवर अतिक्रमण का केले जाते ? हे जर वेळीच थांबले नाही, तर हिंदु समाज आता रस्त्यावर उतरेल. हिंदू सक्षम आहे. हिंदूंच्या भावना समजून कारवाई केली यासाठी प्रशासनाचे आभार !

महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराज, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख

स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज

दर्ग्याच्या विरोधात २५ वर्षे पाठपुरावा घेतला, निवेदने दिली; पण कारवाई करण्यात आली नाही. शासनाच्या भूमी घशात घालून धर्मयुद्ध छेडायचे, हे योग्य नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे जिहाद खपवून घेतला जाणार नाही. सर्वत्रचीच अनधिकृत धार्मिक स्थळे उद्ध्वस्त व्हायला हवीत. प्रशासनाला जागे करण्यासाठी तेथे मंदिरे उभारली जातील, हे लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.

संपादकीय भूमिका

२५ वर्षे नाशिक महानगरपालिका प्रशासन झोपले होते का ? कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍यांवरही कठोर कारवाई करा !