१. संत तुकाराम महाराज यांचा अभंग नसतांना त्यातून हिंदुद्वेष उघड करणारे पुरो(अधो)गामी !
‘तीर्थयात्रा करून पुण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आई-वडिलांना सांभाळणे हेच खरे पुण्य आहे. काशी तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर जेवढे पुण्य मिळते, त्यापेक्षा जास्त पुण्य आई-वडिलांची सेवा केल्यानंतर मिळते’, असे संत तुकाराम महाराजांचे मत आहे’, असे पुरोगामी सामाजिक माध्यमांवर प्रसारित करत आहेत. त्यासाठी . . .
मायबापे अवघी काशी । तेणे न भजावे तीर्थाशी ॥
तुका म्हणे मायबापे । अवघी देवाचीच रूपे ॥
अर्थ : तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दगडधोंड्यांची पूजा करण्यापेक्षा कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण, मुलं, पत्नी यांचा आदर- सन्मान करा.
(प्रत्यक्षात हा अभंग ‘संत तुकाराम गाथा’ किंवा संत तुकाराम महाराज यांच्या अन्य साहित्यात कुठेही आढळत नाही; पण त्यांच्या नावाने अभंग प्रसारित करून पुरो(अधो)गामी मात्र स्वतःचा कंड शमवत आहेत आणि स्वतःचा हिंदु धर्मद्वेष उघड करत आहेत. – संपादक)

२. पुरो(अधो)गामी यांनी संत तुकाराम महाराज यांच्या ३ वेगवेगळ्या अभंगांना जोडून तीर्थयात्रेविषयी केलेली टीका !
जाऊनिया तीर्था काय तुवा केले । चर्म प्रक्षाळीले वरी वरी ॥
तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी ॥
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥
अर्थ : तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्ही अंग स्वच्छ कराल; पण अंतःकरण स्वच्छ करणारा साबण आहे का ? पाणी स्वच्छ नसेल, तर महागडे साबणही उपयुक्त ठरणार नाहीत. अंतःकरण स्वच्छ करणारे साबण अजून आलेले नाहीत. सज्जन लोक हे तीर्थक्षेत्रापेक्षा आणि साबणापेक्षा श्रेष्ठ असतात, असे संत तुकाराम महाराज यांचे विचार आहेत.
२ अ. संत तुकाराम महाराजांचे प्रत्यक्ष अभंग आणि त्यांना अभिप्रेत भावार्थ
तीर्था जाउनियां काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीवरी ॥ १ ॥
अंतरींचें शुद्ध कासयानें झालें । भूषण त्वां केलें आपणालागीं ॥ २ ॥
वृंदावन फळ घोळिलें शर्करा । भितरील थारा मोडेचिना ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया फुंदा तुम्ही ॥ ४ ॥
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥ १ ॥
मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ ध्रु. ॥
तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥ २ ॥
तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥ ३ ॥ – संत तुकाराम गाथा, अभंग ८९
अर्थ : सर्व तीर्थक्षेत्रांवर दगडाचा देव आणि तीर्थाचे पाणी दिसते; पण संत तुकाराम महाराजांना संतसज्जनांमधे देव दिसतो. अशा संतांचा सहवास मिळाला, तर तिथे देहही अर्पण करावा. तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही. जर मनामध्ये भक्तीभाव असेल, तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते, म्हणून संत-सज्जन नास्तिक लोकांना आपल्या संगतीत पालटतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘संतसज्जनांमध्ये राहून एकदा पाप गेले की, मग जीवनातील त्रिविध ताप नाहीसे झाले, हे ठाऊक होते.’
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥ १ ॥
तैसे चित्तशुद्धी नाहीं । तेथें बोध करील काई ॥ ध्रु.॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥ २ ॥
वांझा न होती लेकुरें । काय करावें भ्रातारें ॥ ३ ॥ – संत तुकाराम गाथा, अभंग ४०४
३. कुंभमेळ्यावरील संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा संदर्भ देऊन टीका करणारे पुरोगामी !
आली सिंहस्थ पर्वणी । न्हाव्या भटा झाली धनी ॥
अंतरी पापाची कोडी । वरी वरी बोडी दाढी ॥
बोडीले ते निघाले । नाही पालटले अवगुण ॥
पाप गेल्याची काय खूण । तुका म्हणे अवघा शीण ॥ – संत तुकाराम गाथा, अभंग २८६०
३ अ. कर्मकांडावर टीका करणार्यांना जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचे चोख प्रत्युत्तर !
तप, तीर्थ, व्रत, दान यांपासून कुणी परावृत्त करत असेल, तर त्याला ब्रह्म हत्येचे पाप लागते !
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥
कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥
आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥
व्हावें साह्य तया न घलावें भय । फुकासाठी पाहे लाभ घात ॥
तुका म्हणे हित माना या वचना । सुख दुःख जाणा साधे फुका ॥ – संत तुकाराम गाथा, अभंग ९९६
अर्थ : जर कुणी तप, तीर्थ, व्रत, दान यांचे आचरण करत असेल, तर त्याला त्यापासून परावृत्त करू नये; कारण हे सर्व साधना करणार्याचे अनेक पूर्वज त्यांचा उद्धार व्हावा म्हणून वाट पहात असतात आणि जे हे कुणी करत असेल, त्याला कुणी परावृत्त करत असेल, तर त्याला ब्रह्महत्येचे पाप लागते. आपल्याला आपल्या पापांपासून सुटका करून घेता येत नाही, मग हे असले पाप केव्हा दूर होणार; म्हणून असे कर्म करणार्यांना साहाय्य करावे. त्यांना कुठलेही भय घालू नये; कारण असे केल्याने तुमचाही लाभ होईल आणि असे न केल्यास तुम्हाला फुकट त्रास होईल. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मी जे काही तुम्हाला सांगत आहे, यातच तुमचे हित समजा आणि कोणतेही चांगले कर्म करणार्यांना परावृत्त केले, तर तुम्हाला दुःख होईल, हे मात्र नक्की !’
यावरून पुरो(अधो)गामी, साम्यवादी, खोटे कथानक रचणारे बुद्धीप्रामाण्यवादी आणि ब्रिगेडी वृत्तीचे लोक केवळ संत तुकाराम महाराजच नव्हे, तर अन्य संतांचे अभंग यांची तोडमोड करून टीका करण्याचे पाप करत आहेत. जेणेकरून हिंदूंमध्ये कर्मकांड, सण-उत्सव यांवरून भेद करता येईल आणि द्वेष पसरवता येईल. संतांनी जे अशा प्रकारचे अभंग लिहिले, ते त्या त्या काळात जी दुष्प्रवृत्ती वाढली, ती दाखवण्यासाठी आणि ती मोडून सन्मार्गाला लावण्यासाठीच ! त्या अभंगातील भावार्थ समजून न घेता टीका करणारे पुरो(अधो)गाम्यांना ते कधीही कळणारे नाही, त्यांना तो भावार्थ कळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
– श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (१५.२.२०२५)
संपादकीय भूमिकाहिंदूंमध्ये कर्मकांड, सण-उत्सव यांवरून भेद निर्माण करणार्या आणि द्वेष पसवणार्या पुरो(अधो)गाम्यांचे षड्यंत्र वेळीच ओळखा ! |