संशयाची सुई अंनिसवाल्यांच्या दिशेने …
२० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या झाल्यावर त्या वेळी झाडून सर्व प्रसिद्धीमाध्यमांनी सनातन संस्थेच्या विरोधात गरळओक करण्यास चालू केले. दाभोलकर यांच्या हत्येनंतर पुढील ३-४ महिने प्रसारमाध्यमांनी सनातनच्या विरोधात मिडिया ट्रायल (माध्यमांनी न्यायाधिशाच्या भूमिकेत राहून वार्तांकन करणे) चालू ठेवले. अन्वेषण पूर्ण झाले नसतांनाही आणि महत्त्वाचे म्हणजे सनातनच्या विरोधात कोणताही पुरावा नसतांना सनातनला लक्ष्य केले गेले; मात्र त्या काळात सनातनची बाजू घेऊन सनातनद्वेष्ट्यांवर ज्यांनी आसूड ओढले, त्यांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर होय. त्या वेळी कै. रामतीर्थकर यांनी दाभोलकरांच्या ‘खुनाचे खरे लाभर्थी कोण होते आणि अन्वेषण यंत्रणांचा तपास कसा भरकटला ?’, हे परखडपणे मांडले. या खटल्याचा निकाल लागला. तपासातील अनेक गंभीर त्रुटी पहाता कै. रामतीर्थकर यांनी ११ वर्षांपूर्वी मांडलेले विचार किती योग्य होते, हे आपल्या लक्षात येईल.
१० नोव्हेंबर २०१३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचकांसाठी मुद्दामहून पुनर्मुद्रित करत आहोत.
२० ऑगस्टला सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि लागेचच या हत्येसाठी सनातन संस्थेला उत्तरदायी ठरवत समाजवाद्यांनी आणि तथाकथित पुरोगाम्यांनी आरोप चालू केले. त्यानंतर सनातनच्या अनेक साधकांच्या चौकशा पोलिसांनी केल्या; मात्र आज हत्येला अडीच महिने उलटून गेल्यानंतरही दाभोलकर यांचे मारेकरी पोलिसांना सापडलेले नाही. त्यामुळे आता पोलिसांचा तपास चुकीचा होता, असे म्हटले जात आहे, तर आता योग्य तपास कोणता असला पाहिजे, हे या लेखातून मांडण्यात आले आहे.
– कै. अरुण रामतीर्थकर, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर.
‘साधना’ आणि ओंकारेश्वर !
नक्कीच तुमचा गोंधळ उडणार ! कारण साधना म्हणजे मोक्ष, सद्गती किंवा एखादी विद्या प्राप्त करण्यासाठी जे कष्ट उपसावे लागतात, त्याला ‘साधना’ म्हणतात. काही जणांना राजकुमार चित्रपटाची नटी ‘साधना’ आठवेल; पण मला अभिप्रेत ‘साधना’ तुम्हाला नक्की आठवणार नाही. ‘साधना’ म्हणजे पांडुरंग सदाशिव साने उपाख्य सानेगुरुजी यांनी त्यांच्या हयातीत चालू केलेले साप्ताहिक ! योगायोग म्हणजे ‘साधना’च्या समोरच विसावा मारुति आहे. पूर्वी ओंकारेश्वरावर स्मशान होते. सर्व प्रेतयात्रा विसावा मारुति समोरून जात. लांबून आलेले लोक दमलेले असत. तिरडी खाली ठेवता येत नसे. या मारुतीला कट्टा होता. तेथे तिरडी ठेवणे शास्त्रसंमत होते. दमलेले लोक तेथे तिरडी ठेवून तेथे विसावा घेत; म्हणून त्या मारुतीचे नाव विसावा मारुति ! मृत्यूपंथाला लागलेल्या, रडत खडत चालू असलेल्या या ‘साधना’ला ओंकारेश्वर जवळ होते. आता ते लांब वैकुंठावर गेले आहे. ‘साधना’ची वाट किती पाहणार ?
‘साधना’ची भंपकता !
‘साधना’ समाजवादी विचाराचे ! मुळात समाजवादी हेच राजकारणात भरकटलेले, वैचारिक अधिष्ठान नसलेले आता मुलायम, अखिलेश, आझमखान हेच लोक समाजवादी आहेत. साने गुरुजींचे हे वारस, नेते आणि कार्यकर्ते एकाहून एक भंपक निघाल्याने ‘साधना’ला तेच रूप आले. त्यांच्या भंपकपणाचा एक नमुना सांगतो.
५० वर्षांपूर्वी पुण्यात एका ब्राह्मण तरुणीने एका मुसलमान युवकाशी प्रेमविवाह केला. पुण्यात खळबळ उडाली. अशा वेळी संपादक ना.ग. गोरे यांनी ‘साधना’ कचेरीत त्या दोघांचा सत्कार ठेवला. हे समाजवादी कसे रोगट आहेत, ते आधी सांगतो. याच ‘साधना’चे पिल्लू म्हणजे हमीद दलवाईंचा ‘मुस्लिम सत्यशोधक समाज’ ! या संघटनेचे कार्यालय मुसलमान वस्तीत हवे. आजचे तर सोडा ४० वर्षांपूर्वीही त्यांना मुसलमान वस्तीत कार्यालय घेता आले नाही. मुसलमान प्रबोधनाचे काम १०० टक्के ब्राह्मण वस्ती असलेल्या शनिवारपेठेत ! अशा या समाजवाद्यांना कोकणस्थ मुलगी मुसलमान झाल्याचा कोण आनंद झाला; मात्र ‘साधना’ कचेरीच्या दोन्ही बाजूला शेकडो लोक जमले, पोलीस होतेच. त्यांनी परिस्थिती पाहून गोरेंना सत्कार रहित करायला सांगितला. गोरेंनी खूप वाद घातला; पण ऐकावे लागले.
हत्येचा पुरावाच नाही !
‘साधना’ गाजले ते साने गुरुजींचे म्हणून नव्हे, तर अशा आचरट गोष्टींमुळे ! असा आचरटपणा पैसे देऊन कोण वाचणार ? मात्र संपूर्ण महाराष्ट्रात वर्गणीदार होते. साने गुरुजींना मानणारा वर्ग होता. त्यामुळे चालले, ती पिढी संपली. अनेक समाजवाद्यांची मुले संघात किंवा शिवसेनेत आहेत. समाजवाद्यांचे राष्ट्र सेवा दल उपाख्य ‘सोशॅलिस्ट मॅरेज ब्युरो’ जसे आता शेवटच्या घटका मोजत आहे, तीच अवस्था साप्ताहिक साधनाची आहे. देहांतापूर्वी नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक होते. २० ऑगस्टला त्यांचा खून झाला. सीसीटीव्हीचे फुटेज, प्रत्यक्षदर्शी, आधीपासूनची नाकाबंदी असे अनुकूल घटक असूनही अद्याप तपास १ टक्काही झालेला नाही. अनेक साधकांची चौकशी झाली. कारागृहातून सुटलेल्या शार्पशूटर लोकांची चौकशी झाली. ८-८ वेगवेगळी पथके स्थापन केली. मोठे पारितोषिक लावले; पण दोन मासांनंतर पुराव्याचा तुकडाही सापडला नाही. यामुळे ‘या खुनाच्या तपासाची दिशा प्रथमपासूनच चुकली’, असे आता म्हणणे भाग पडते. खुनाचा आरोप हिंदुत्ववाद्यांवर होणे, हेच मुळात हास्यास्पद आणि तपासाची दिशा चुकवणारे होते.
खुनाचा उत्तरार्ध !
तो काळा (जादूटोणाविरोधी) कायदा अनेक वर्षे लटकला होता. वर्ष २०१३ च्या पावसाळी अधिवेशनात तो आणणार, असे स्वतः अजित पवार ढोल बडवून सांगत होते; पण अधिवेशन संपले. काळा कायदा बारगळलाच होता. डिसेंबरमधील इवल्याशा हिवाळी अधिवेशनापर्यंत काळजी मिटली होती. त्या अधिवेशनातही ऊस, कापूस असे प्रश्न आले, तर कायदा लटकणारच होता. पावसाळी अधिवेशनात कायदा झाला असता आणि मग खून झाला असता, तर एकवेळ हिंदुत्ववाद्यांवर आरोप होऊ शकत होता. दाभोलकर खुनाने हिंदुत्ववाद्यांची हानी आणि समाजवाद्यांचा लाभ झाला आहे. समाजवादी हे नेहमीच हिंदुद्वेष्टे राहिले आहेत. हा काळा कायदा हिंदु धर्मावर आणि फक्त हिंदु धर्मावरच आघात करणारा असल्याने तमाम समाजवाद्यांना तो हवाच होता. पावसाळी अधिवेशन संपल्यावर ते निराश झाले होते. खुनामुळे एखादी हिंदुत्ववादी संघटना गोत्यात आणायची आणि खुनाच्या पार्श्वभूमीवर कायदा करण्यास भाग पाडायचे, असे ठरले असेल. त्यातील उत्तरार्ध यशस्वी झाला.
फिर्यादीच गुन्हेगार आहे का ?
निखिल वागळेसारख्या भंपकाने प्रतिदिन सनातनला खुनी ठरवणे चालू केले. २० सप्टेंबरला पुण्यात निघालेल्या मोर्च्यात ‘दाभोलकरांचा खुनी सनातनी सनातनी’ अशा घोषणा दिल्या गेल्या. कटाचा पूर्वार्ध तडीस नेण्याचे प्रयत्न अजून चालू आहेत. खुनामुळे कुणाचा लाभ झाला, हे सूत्र तपासात लक्षातच घेतले गेले नाही. त्यामुळेच आजवरचा तपास व्यर्थ ठरला. अनेक प्रकरणात फिर्यादीच गुन्हेगार निघतो, हे निष्णात तपास अधिकारी कसे विसरले ?
जोशी-अभ्यंकर खून खटला आणि डॉ. दाभोलकर हत्या !
पुण्यातच १ नोव्हेंबर १९७६ ला जोशी कुटुंबातील तिघांची हत्या झाली. १ डिसेंबरला अभ्यंकर कुटुंबातील ५ जणांची हत्या झाली. सारा देश हादरला होता. जानेवारी उजाडला, तरी सुगावा लागला नाही. कडक बंदोबस्ताने १ जानेवारीला काही झाले नाही. ४ तरुणांनी गंमत म्हणून हे खून केले; मात्र पोलिसांची अब्रू जायची पाळी आली. अशा वेळी या चौघांतील सुतार नावाचा तरुण वारंवार चौकीत जाऊन सापडले का खुनी ? झोपा काढता का ? असे विचारत होता. मृतांचे नातेवाईक करत नाहीत, एवढी चौकशी हा का करतो; म्हणून त्यालाच धरल्यावर उलगडा झाला. जोशी-अभ्यंकर स्मरले अशासाठी की, सनातनवर आरोप करून शासन सनातनला घाबरवते. खुनी सापडेपर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांनी वेतन घेऊ नये, या मागण्या सुतारची आठवण करून देतात.
‘साधना’ कार्यालयातच खुनाचा सूत्रधार सापडला, तर…!
खुनी ‘साधना’ परिवारातला असे म्हणायचे आणखी एक कारण आहे. दाभोलकर कितीही मोठे असले, तरी पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल नव्हते. त्यामुळे मुंबईहून केव्हा निघणार, पुण्यात केव्हा येणार, रात्रीचा मुक्काम कोठे, मॉर्निंग वॉक किती वाजता, याची तपशीलवार माहिती बाहेरच्यांना कळणेच शक्य नव्हते. ही इत्थंभूत माहिती फक्त साधना परिवारालाच होती. त्यामुळेच दाभोलकर सकाळी ७ ला बाहेर पडणार, ते कोणत्या बाजूने जाणार (म्हणजे विरुद्ध दिशेला शनिवारवाड्याकडे नाही) हे कळून मारेकरी सकाळी ६.४५ वाजता पुलावर येऊन थांबले. दाभोलकर तर महाराष्ट्रभर भ्रमंती करत होेते. ते पुण्यातच येणार, सकाळी शनिवारवाड्याकडे, लक्ष्मी रोडकडे नव्हे, तर पुलावरून बालगंधर्वकडे जाणार, अशी नेमकी माहिती खुन्यांना गोव्यातील सनातन कार्यालयाने दिली कि पुण्यातील साधना कार्यालयातून दिली गेली ? खुन्यांना नेमकी वेळ आणि स्थळ कोणाकडून कळले, याचा तपास जोपर्यंत पोलीस करणार नाहीत, मुख्य पैलूच दुर्लक्षित ठेवतील, तोपर्यंत दाभोलकरांच्या खुनाचा तपास लागणार नाही. ‘साधना’ कार्यालयातच खुनाचा सूत्रधार सापडला, तर निखिल वागळेचे थोबाड कसे दिसेल, हे पहायला मी उत्सुक आहे.
(दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये १० नोव्हेंबर २०१३ या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख)