औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे अनुक्रमे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’च !
मुंबई – औरंगाबाद जिल्ह्याचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय राज्यशासन, तसेच केंद्रशासन यांच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाला या जिल्ह्यांतील काही नागरिकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली होती. ४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुनावणीनंतर न्यायाधिशांनी त्यांचा निकाल राखीव ठेवला होता; मात्र ८ मे या दिवशी हा निकाल घोषित करण्यात आला असून नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या संबंधी प्रविष्ट करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयाला अनेक याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले होते, या सर्व याचिका फेटाळल्या आहेत.
राज्यशासनाने घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही !
राज्यशासनाचा हा निर्णय बेकायदेशीर नाही. ही याचिका फेटाळतांना या निर्णयामुळे कुणालाही फरक पडणार नाही, तसेच कोणताही आर्थिक दंड लावणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ जिल्हा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातही त्याला संमती देण्यात आली होती; मात्र नंतर पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर असे जिल्ह्याचे नामकरण केले. त्याला केंद्रशासनानेही संमती दिली.
नामांतराचा इतिहास काय ?
औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा निर्णय शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात वर्ष १९९७ मध्ये झाला होता. सर्व प्रक्रिया पूर्ण करून अधिसूचना जारी करण्यात आली होती; पण राज्यशासनाच्या त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. राज्यात वर्ष १९९९ मध्ये सत्तापालट झाल्यावर औरंगाबादच्या नामांतराची अधिसूचना तत्कालीन विलासराव देशमुख सरकारने मागे घेतली होती. परिणामी गेली २५ वर्षे निर्णय होऊनही प्रत्यक्ष ‘संभाजीनगर’ असे नामकरण झाले नव्हते.
अहमदनगर जिल्ह्याचेही नामांतर होणार !
अहमदनगर जिल्ह्याचे नावही ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या संबंधीची शिफारस राज्यशासनाने केंद्र सरकारकडे केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने करणार असल्याचे घोषित केले आहे.
संपादकीय भूमिका
|