२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा प्रसंग जगभरातील कोट्यवधी लोकांनी बघितला. ‘ऑनलाईन’ बघण्याचे सारे विश्वविक्रम मोडले गेले. आसेतू हिमाचल, भारतातील सर्व शहरांमध्ये आणि ६ लाखांहून अधिक गावांमध्ये हा दिवस कोणत्या उत्सवापेक्षाही पुष्कळ उत्साहाने साजरा झाला. हे सारे अद्भुत आहे. अभूतपूर्व आहे. कल्पनेच्याही पलीकडचे आहे. भारताच्या सहस्रो वर्षांच्या इतिहासात सारा देश एका दिलाने, एका स्वरात हुंकार भरतो, हे घडलेले नव्हते, ते २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या पुनर्बांधणीच्या रूपाने घडले आणि म्हणूनच ते सर्वार्थाने ऐतिहासिक आहे. या श्रीराममंदिराच्या निमित्ताने सारा देश एकाच भावनेने बोलू लागला, हे महत्त्वाचे आहे. जाती-पंथांचे सर्व अडथळे मोडून काढत, उत्तर – दक्षिणसारखे भौगोलिक भेदाभेद बाजूला ठेवत, या देशाने आपल्या जबरदस्त एकजुटीचे दर्शन घडवले आहे. सारे जग भारताच्या या एकत्रित शक्तीला, या प्रस्फुटित झालेल्या तेजाला, स्तिमित होऊन बघत राहिला आहे.
श्री. प्रशांत पोळ, राष्ट्रचिंतक, अभियंता आणि लेखक, जबलपूर, मध्यप्रदेश
१. श्रीराममंदिरासाठी दिलेला लढा
जगाला कोड पडले की, विभाजनवादी मानसिकतेत अडकलेला हा देश अचानक कसा काय पालटला ? हे सर्व अचानक झालेले नाही. यामागे श्रीरामाच्या मंदिरासाठी केलेला ५५० वर्षांचा रक्तरंजित संघर्षाचा इतिहास आहे. वास्तविक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी हे व्हायला हवे होते. श्रीराम या देशाचे आराध्य आणि राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या जन्मस्थानावरचे त्यांचे मंदिर इस्लामी आक्रमकांनी पाडले होते. त्याची पुनर्बांधणी करायला हवी होती. त्या निमित्ताने या देशाला स्वतःचा असा सूर गवसला असता; पण ते झाले नाही, होणारही नव्हते. पराकोटीच्या तुष्टीकरणावर विश्वास ठेवणारे शासनकर्ते देहलीत बसले होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही श्रीराममंदिरासाठीचा लढा चालूच राहिला. राज्यघटनेच्या चौकटीला ईश्वरासमान मानणार्या भारतियांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. पुढे न्यायालयात ‘रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर होते’, हे सिद्ध झाले अन् मंदिराच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा झाला; मात्र हा प्रवास सोपा नव्हता.
२. श्रीराममंदिर उभारणीपूर्वीची स्थिती
या संपूर्ण प्रवासात भारतियांचे ‘स्वत्व’ जागृत झाले आणि हेच फार महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या ‘स्व’ला विसरलो होतो. आधी आलेले इस्लामी आक्रमक आणि नंतर इंग्रज यांच्यामुळे आम्हाला आमचा धर्म, परंपरा आणि आमची जीवनशैली त्याज्य वाटू लागली. आम्ही आमचीच भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा उपहास करायला लागलो. याचा परिणाम होणारच होता. ज्या देशाला आपली भाषा, संस्कृती आणि जीवनशैली यांचा अभिमान नसतो, त्याला जगसुद्धा किंमत देत नाही. भारताची वैश्विक पातळीवर सतत उपेक्षा आणि अवहेलना होत गेली. जागतिक पटलावर भारताचा विकासदर इतका कमी होता की, त्याला ‘हिंदु ग्रोथ रेट’ (हिंदूंचा विकासदर) म्हणून उपहासाने संबोधले गेले.
३. देशात आक्रमक येण्यापूर्वी भारत मोठी आर्थिक शक्ती असणे
अर्थात् आपण असे नव्हतो. हे आक्रमक भारतात येईपर्यंत आपण जगातील सर्वांत मोठी आर्थिक शक्ती होतो. सर्वांत समृद्ध आणि वैभवशाली देश होतो. प्रा. अंगस मेडिसन या जागतिक कीर्तीच्या अर्थशास्त्रातील तज्ञाने अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील ‘वर्ल्ड हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये त्यांनी पुराव्यासह वेगवेगळ्या देशांची आणि वेगवेगळ्या कालखंडात जागतिक व्यापारातील टक्केवारी दिली आहे. प्रा. अंगस मेडिसन यांनी लिहिल्याप्रमाणे ‘पहिल्या शतकात जगात होणार्या व्यापाराचा एकूण ३२.८ टक्के व्यापार एकटा भारत करत होता. आपण जगातील सर्वांत मोठे निर्यातक होतो. दहाव्या शतकातही जागतिक व्यापारात आपला वाटा हा ३२ टक्के होता.’ एकूणच काय, तर भारताला स्वतःच्याच क्षमतेचा, शक्तीचा आणि कर्तृत्वाचा विसर पडला होता. श्रीराममंदिर आंदोलनाच्या निमित्ताने तो परत गवसला गेला. २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या रूपात आपल्याला दिसले ते या ‘स्व’चे विराट स्वरूप !
४. प्रभु श्रीरामापासून प्रेरणा घेऊन जनसामान्यांच्या एकजुटीतून बळकट राष्ट्र मंदिराचे निर्माण करणे, हे पुढील लक्ष्य !
पण आता पुढे काय ? श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण हा एक महत्त्वाचा टप्पा आणि मैलाचा एक दगड आहे; मात्र हे साध्य नाही. प्रवासात आलेला हा टप्पा ओलांडून अधिक क्षमतेने पुढे जायचे आहे. यासाठी आदर्श आहेत प्रभु श्रीराम ! श्रीराम हे साक्षात् श्रीविष्णूचे अंश. त्यांनी मनात आणले असते, तर चमत्कार घडवून सहजरित्या रावणाला परास्त केले असते; मात्र त्यांनी तसे केले नाही. तसे केले असते, तर आर्यावर्तातील सर्वसामान्य जनतेला वाटले असते की, पुढेही रावणासारखा एखादा आतंक समाजात पसरवू लागला, तर ईश्वर परत अवतार घेतील आणि त्या असुरी प्रवृत्तीचा विनाश करील. सर्वसामान्य नागरिक काहीच करणार नाहीत. ते निष्क्रीय होतील आणि ही परिस्थिती कोणत्याही स्वस्थ अन् सुदृढ समाजासाठी योग्य नाही; म्हणूनच श्रीरामाने सीतेचे हरण रावणाने केलेले आहे, हे निश्चित झाल्यावरही, ना अयोध्येहून साहाय्य मागितले, ना मिथिलेहून. सीता ही केवळ श्रीरामाची पत्नी नव्हती, तर ती इक्ष्वाकु कुळाची सून होती. चंडप्रतापी राजा जनकाची कन्या होती; पण अयोध्या आणि मिथिला यांच्या चतुरंग सेनेसह श्रीरामाने रावणाशी सामना करून त्याचा विनाश केला असता, तर सर्वसामान्य नागरिकांचा त्यात सहभाग राहिला नसता. त्यामुळेच श्रीरामाने वनात रहाणार्या सर्वसामान्य लोकांचे संघटन केले. त्यांची सेना उभारली, त्यांना प्रशिक्षित केले आणि या सर्वसामान्यांच्या सेनेसह रावणाशी सामना केला. ‘कितीही बलशाली आणि बलाढ्य अशी असुरी शक्ती असू देत, जर सर्वसामान्य नागरिकांची संघटित शक्ती निर्माण झाली, तर अशा दानवी शक्तींना संपवता येते’, हे श्रीरामाने सिद्ध केले. त्यामुळे आपण श्रीराममंदिराची प्रेरणा घेऊन ‘सामान्य जनतेच्या एकजुटीतून बळकट राष्ट्र मंदिराचे निर्माण’, हे पुढील लक्ष्य असले पाहिजे.
५. रामराज्य आणणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य !
नागरिक म्हणून आपण ‘कर्तव्यांशी’ बांधील आहोत. त्यानंतर ‘अधिकार’ येतात. आज मात्र आपण अधिकारांसाठी जागृत असतो; पण कर्तव्य विसरतो. रामराज्यातील नागरिक हे प्रामाणिक, साधे, सरळ आणि कष्टाळू होते. जे रामराज्य आणण्यासाठी श्रीराममंदिराचा लढा उभारला गेला, ते प्रत्यक्षात आणणे, हे नागरिकांचे कर्तव्य आहे. स्वभाषेचा आग्रह, त्यातून शिक्षणाचा आग्रह, आपल्या चांगल्या परंपरा आणि स्वधर्माचा आग्रह अगदी स्वभाषेत स्वाक्षरी करण्याचा आग्रह आदी आपण करू शकलो, प्रामाणिकपणे कष्ट करून आपले शिक्षण-व्यवसाय करू शकलो, तर आपला देश वैभवसंपन्न बनेलच; पण समाजातही रामराज्य निर्माण होईल. श्रीराममंदिर उभारणीनंतर आपल्याला बळकट राष्ट्र मंदिर उभारता येईल, हे निश्चित !
(साभार : ‘सेवावर्धिनी’ वार्षिक अहवाल २०२४ आणि श्री. पोळ यांचे फेसबूक)