Attack On NIA : बंगालमध्ये एन्.आय.ए.च्या पथकावर जमावाकडून आक्रमण : २ अधिकारी घायाळ

वर्ष २०२३ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपींना कह्यात घेण्यासाठी गेलेले होते एन्.आय.ए.चे पथक

मेदिनीपूर (बंगाल) – येथे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) पथकावर ६ एप्रिलच्या पहाटे जमावाकडून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात पथकातील २ अधिकारी किरकोळ स्वरूपात घायाळ झाले. पथकावरील आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना कह्यात घेतले आहे. एन्.आय.ए.चे पथक डिसेंबर २०२२ मध्ये भूपतीनगर येथे झालेल्या बाँबस्फोटाचे अन्वेषण करण्यासाठी येथे आले असता ही घटना घडली. या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या ८ नेत्यांची चौकशी चालू  आहे. या प्रकरणात काहींना नोटिसा देण्यात आल्या होत्या; मात्र ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर एन्.आय.ए.चे पथक त्यांना कह्यात घेण्यासाठी पोचले असता वरील घटना घडली.

फेब्रुवारीमध्ये ‘ईडी’च्या पथकावरही झाले होते आक्रमण !

यापूर्वी ५ जानेवारीला बंगालमधील संदेशखाली भागात अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पथकावरही आक्रमण झाले होते. हे पथक येथे तृणमूल काँग्रेसचे तत्कालीन नेते शेख शाहजहान याला भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी पकडण्यासाठी गेले असता १०० हून अधिक लोकांच्या जमावाने पथकावर आक्रमण केले हेते. यात एक अधिकारी घायाळ झाला होता.

संपादकीय भूमिका

‘बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजून अनेक वर्षे झालेली असतांना तेथे राष्ट्रपती राजवट लागू न करणे, हा तेथील जनता अन् सुरक्षा यंत्रणा यांच्यावरील अन्यायच होय’, असे आता देशवासियांना वाटू लागले आहे !