महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील पिंपरी-चिंचवड शहरात रहाणार्या एका संशयित आतंकवादी चिनी महिलेस पुणे महापालिकेच्या वानवडी क्षेत्रीय कार्यालयाने कागदपत्रे अपूर्ण असतांनाही विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले असल्याचे लक्षात आले आहे. आता पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आतंकवादविरोधी शाखेकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मोशीतील रहिवासी एका चिनी महिलेने बिबवेवाडीमधील निवासी पत्ता असलेल्या एका भारतीय व्यक्तीसमवेत विवाह केल्याचे भासवले. त्यानुसार या महिलेने येरवडा येथील ‘ऑनलाइन मॅरेज ब्युरो’च्या वतीने विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. संबंधित महिला दलालाने पुणे येथील वानवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र काढून देण्याची सिद्धता दर्शवली.
काय आहे प्रकरण ?
१. या दलालाने रक्कम निश्चित करून क्षेत्रीय कार्यालयाकडे विवाह नोंदणीसाठी अर्ज केला; मात्र संबंधित चिनी महिलेकडे कागदपत्रे नव्हती. त्यामुळे संबंधित दलालाने प्रमाणपत्र देण्यास असमर्थता दर्शवली. यासंबंधीची माहिती समजल्यावर या दलाल महिलेच्या भावाने जादा रकमेची मागणी करून प्रमाणपत्र देण्याची सिद्धता दर्शवली. चिनी महिलेने ते दिल्यानंतर एजंट महिलेच्या भावाने वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्यांच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र मिळवून दिले.
२. चिनी महिला संशयित आतंकवादी असून तिची पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चौकशी चालू आहे. या चौकशीत तिच्याकडे हे प्रमाणपत्र आढळून आले. त्यानुसार आता पिंपरी-चिंचवडच्या आतंकवादविरोधी शाखेने याविषयी पुणे महापालिकेकडून माहिती मागवली असून या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे.
३. संबंधित चिनी महिलेने विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी विवाहाचे ‘फोटोशॉप’ केलेले एक छायाचित्र दिले, तसेच जे चिनी पारपत्र आणि अन्य कागदपत्रे दिली, त्याचे भाषांतर करण्यात आलेले नव्हते. विशेष म्हणजे व्हिसा नसतांना या महिलेला महापालिकेने नोंदणी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
(‘फोटोशॉप’ या संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये प्रतिमांचा आकार, पार्श्वभूमीचा रंग बदलू शकतो. मूळ छायाचित्रामध्ये फेरफार करता येतो.)
संपादकीय भूमिकाअशा गोष्टींमुळेच पुण्यातील आतंकवाद संपत नाही. त्यासाठी संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! |