नुकताच अभिनेते रणदीप हुडा यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिला. लहानपणापासून सावरकर यांच्याविषयीचे लेखन पुष्कळ वेळा वाचलेले असले आणि त्यांचा सारा जीवनपट आपल्या समोर असला, तरी ‘कुणी तरी नव्याने त्यांच्यावर आधारीत कलाकृती बनवते’, हे समजल्यापासून मन या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते हे तीनही महत्त्वाचे उत्तरदायित्व पेलणारे अभिनेते रणदीप हुडा यांनी एक चांगला चित्रपट बनवला, त्यासाठी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे. अमराठी माणसाने सावरकर समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्यावर चित्रपट बनवून त्यात सावरकर यांची भूमिका करणे, हे अजिबात सोपे नाही. एका मुलाखतीत रणदीप यांनी या चित्रपटासाठी त्यांना त्यांचे घर गहाण ठेवावे लागल्याचे सांगितले आहे.
१. अंदमानच्या कारागृहातील सश्रम कारावासाचे उत्तम चित्रण
सावरकर यांचा जीवनपट केवळ ३ घंट्यांत पडद्यावर दाखवणे कठीण आहे; पण रणदीप यांनी स्वतःचे कसब पणाला लावून हे आव्हान स्वीकारले आहे आणि सावरकर यांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाची बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सावरकर यांनी आयुष्यात अनुमाने १४ वर्षांचा प्रत्यक्ष सश्रम कारावास आणि १३ वर्षे नजरकैद भोगली. अंदमानच्या कारागृहातील सश्रम कारावास कसा होता ? याचे चित्रण प्रत्येक भारतियाने बघणे आवश्यक आहे. मी स्वत: अंदमानमधील सावरकर यांची कोठडी आणि तेव्हा देण्यात येणार्या शिक्षांची प्रारूपे प्रत्यक्ष पाहिली आहेत. तिथे सावरकर यांनी ११ वर्षे छळ सोसला, त्यांनी कोलू ओढला, त्यांनी हाताने नारळ सोलले आणि त्यांना ‘कमला’ काव्यसंग्रह स्फुरला होता. त्यांनी देशासाठी हालअपेष्टा भोगल्या, म्हणजे नक्की काय काय सहन केले असेल, याची जाणीव या चित्रपटातून होते.
२. सावरकर यांनी कारागृहात असतांना इंग्रज आणि धर्मांतर यांच्या विरोधी उभारलेली चळवळ
एका प्रसंगात उपोषणाला बसलेल्या बंदीवानाशी चर्चा करतांना सावरकर म्हणतात, ‘अरे, तुझ्या उपाशी मरण्याने कुणाला कसलाही फरक पडणार नाही. क्रांतीची ज्वाला पेटती ठेवण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करून जिवंत रहाणे अन् इथून (कारागृहातून) बाहेर पडणे आणि परत इंग्रजांविरुद्ध जोमाने लढणे, हे आपले ध्येय असले पाहिजे.’ दुसर्या प्रसंगात अंदमानमधील मुसलमान वॉर्डन छळकपटाने आणि धाकदपटशाने हिंदु बंदीवानांना बाटवणे अन् त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार करी. यामुळे दु:खी झालेल्या हिंदु बंदीवानाला समजवतांना सावरकर म्हणतात, ‘मुसलमान का खाना क्या, पुरा मुसलमान खाओगे फिर भी मुसलमान नहीं बनोगे !’
३. गांधींच्या अहिंसेच्या तकलादू तत्त्वज्ञानावर प्रकाश
गांधी हत्येनंतर संपूर्ण देशात जी ब्राह्मणविरोधी दंगल झाली, ज्यात अनेक ब्राह्मणांना मारण्यात आले, त्यांची घरदारे लुटली गेली, त्यातच विनायकरावांचे धाकटे बंधू नारायणराव यांचीही हत्या झाली, हेही चित्रपटात दाखवून अहिंसेचे तत्त्वज्ञान त्या काळातही किती तकलादू होते, यावर प्रकाश टाकला आहे.
४. सावरकर यांचे ऐकले असते तर…
सावरकर यांचे ‘हिंदुत्व’ हे केवळ हिंदूंसाठी नसून सर्वसमावेशक होते. देशाची फाळणी कुठल्या परिस्थितीत झाली ? त्यामागे कुणाचे हट्ट होते ? फाळणीनंतर भारताने पाकला ५५ कोटी रुपये का दिले ? लाहोर ते ढाका असा रस्ता बनवायला कोण उत्सुक होते ? हे आणि असे अनेक प्रसंग, तसेच आपल्याला आपले स्वातंत्र्य मिळतांना किती चुका केल्या ? आणि सावरकर यांचे ऐकले असते, तर त्या टाळत्या आल्या असत्या, याची जाणीव करून देतात.
५. द्रष्टे सावरकर
जी व्यक्ती देश स्वतंत्र झाल्यावर देशाची पंतप्रधान व्हायला हवी होती, त्यांना देहलीत झालेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळाले नाही. तेव्हापासून आजपर्यंत सावरकर यांना या देशात सरकारी पातळीवर उपेक्षितच ठेवले गेले. त्यांच्यावर नको नको ते आरोप आजही केले जातात. त्यांनी अंगिकारलेल्या विविध धोरणांवर टीका केली जाते; पण सावरकर किती द्रष्टे होते, याची जाणीवही काळच आपल्याला करून देतो. त्यांची ‘तरुणांना सक्तीचे सैनिकी शिक्षण देण्याची कल्पना किती आवश्यक होती ?’, हे आपल्याला वर्ष १९६२ मध्ये चीनकडून मानहानीकारक पराभव स्वीकारल्यावर झाली. ‘देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात, चरख्यावरच्या सूताने नाही’, हे त्यांचे लिखाण किती महत्त्वपूर्ण होते आणि आपण किती दुर्लक्षित केले, ते आज देशाच्या सीमा पाहून लक्षात येते. दुर्दैवाने आज आपली एकही सीमा सुरक्षित नाही. शासनकर्ते काळाच्या पुढे विचार करणार्या सावरकर यांचे ऐकत नाहीत आणि त्याचे परिणाम देशाला आणि देशातील सामान्य जनतेला भोगावे लागतात.
६. स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग लक्षात ठेवून त्याविषयी सदैव कृतज्ञ रहायला हवे !
राजकीय दरबारी कायम उपेक्षित राहिलेले हे तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्व समाजमनामध्ये मात्र कायम जागृत राहिले पाहिजे अन् ते दायित्व आपल्या सर्वांचे आहे. समाजमनाच्या दबावापुढे कुठलीही सत्ता झुकू शकते आणि समाजमन घडवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. रणदीप हुडा यांनी चित्रपटाच्या निमित्ताने जो प्रयत्न केला आहे, त्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. हा चित्रपट घरातील लहान-मोठ्या सगळ्या सदस्यांसह बघून त्यावर घरी चर्चा केली पाहिजे. सकाळी उठल्यापासून आपल्याला हव्या त्या कृती आज आपण सहजपणे करतो; कारण आज आपण स्वतंत्र आहोत; पण त्या स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढीने किती भीषण दिवस काढले आहेत ? केवढा संघर्ष आणि पराकोटीचा त्याग केला आहे, याची जाणीव ठेवून त्याविषयी सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे.
७. गांधी आणि सावरकर यांच्याविषयीच्या दोन विसंगती
चित्रपटातील ‘कधीच कुठल्या काँग्रेस सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ?’, हा सावरकर यांचा प्रश्न आणि आयुष्यभर अहिंसेचे तत्त्वज्ञान सांगणार्या गांधींची हत्या गोळी घालून होते. आयुष्यभर सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करणारे सावरकर मात्र प्रायोपवेशन (मृत्यू येईपर्यंत उपोषण) करून देह त्याग करतात. या दोन विसंगती आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
– श्री. अनिकेत विलास शेटे, चिंचवड, जिल्हा पुणे. (३०.३.२०२४)