सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी साधलेला संवाद !
सनातन संस्था गेली २५ वर्षे अनेक समाजहितकारी उपक्रम राबवत आहे. त्यामुळे समाज हळूहळू धर्माचरणी आणि श्रद्धावान बनत आहे. यामुळे नास्तिकतावादी, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनवादी, हिंदुद्वेषी, साम्यवादी, तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी यांना पोटशूळ उठला आहे. त्यांना सनातन संस्थेचा तेजस्वी प्रसार बघवत नाही; म्हणून त्यांनी गेली काही वर्षे सनातन संस्थेला ‘सोपे लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट)’ केले आहे. यामुळे सनातन संस्थेवर विविध आरोप केले जात आहेत. याविषयी सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी संवाद साधून संस्थेचे मत जाणून घेतले आहे. या संवादातून विरोधकांचे षड्यंत्र आणि सनातन संस्थेचा मानवहितकारी उद्देश लक्षात येईल.
सनातन संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास कसा होता ? सनातनचा जो उद्देश होता, तो या २५ वर्षांत सफल झाला आहे, असे वाटते का ?
उत्तर : सनातन ही समाजाची आध्यात्मिक सेवा करणारी स्वयंसेवी संस्था आहे. लोकांचे जीवन आनंदी बनवणे, लोकांना तणावमुक्त आणि व्यसनमुक्त करणे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास करणे अन् सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे त्यांची आध्यात्मिक उन्नती करून घेणे, असे समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे कार्य आम्ही करतो. याद्वारे लोकांना आध्यात्मिक अनुभूती येतात आणि त्यांचे जीवन आनंदमय होते. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे पुढे त्यांची आध्यात्मिक उन्नती होते. हे सारे अनुभव आध्यात्मिक स्तरावरील असल्याने सनातन संस्थेच्या २५ वर्षांच्या प्रवासाचे मूल्यमापन भौतिक कार्याच्या दृष्टीने करणे कठीण आहे.
सनातन संस्थेची २५ वर्षे, म्हणजे सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या निःस्वार्थ समर्पणाची २५ वर्षे आहेत. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता; कारण याच काळात सनातन संस्थेला ‘आतंकवादी संस्था’ ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न झाला. निरीश्वरवाद्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहस्रो साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. असा संघर्षाचा काळ अनुभवत संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास झाला आहे.
स्वयंसेवी संस्थांचे कार्य समाजपरिवर्तनाचे किंवा समाजहिताचे असते. हे कार्य अखंड करावे लागते; कारण समाजाची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. त्यामुळे ‘२५ वर्षांत संस्थेचे कार्य किती सफल झाले ?’, याचा विचार न करता सामाजिक संस्था म्हणून निष्काम भावनेने कार्य करत रहाणे महत्त्वाचे असते.
काही स्फोट प्रकरणांतून सनातनच्या साधकांची निर्दाेष मुक्तता झाली; पण तरीही सनातनला काही सामाजिक घटक ‘भगवे आतंकवादी’ का म्हणतात?
उत्तर : सध्या देशात ‘अजेंडा बेस्ड प्रपोगंडा’ (विचार ठरवून प्रचार करणे) चालू आहे. ‘भगवा आतंकवाद’ हा शब्दप्रयोग, म्हणजे एक प्रकारचे ‘नॅरेटिव्ह’ (कल्पित कथानक) आहे, जे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी विचारांच्या राजकीय मंडळींनी प्रचारित केले आहे. तुम्ही ‘समाजातील काही घटक असे म्हणतात’, असे म्हटले, ते योग्य आहे; कारण हा वर्ग एक तर ‘नॅरेटिव्ह’ निश्चित करणार्यांपैकी किंवा या ‘नॅरेटीव्ह’मध्ये अडकलेला आहे.
‘वर्ष २००८ पर्यंत; म्हणजे वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटांपासून संकटमोचन मंदिर (वाराणसी), अक्षरधाम मंदिर (गुजरात), मुंबईच्या रेल्वेतील साखळी बाँबस्फोट आणि मुंबईवरील आतंकवादी आक्रमण या सर्व घटनांवर कार्यवाही करणे; म्हणजे कुठेतरी अल्पसंख्यांकांच्या मतांवर परिणाम करणे होय’, असे तत्कालीन शासनकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे ‘समाजाच्या दोन्ही घटकांवर आम्ही कारवाई करतो’, असे दाखवण्यासाठी ‘भगवा आतंकवाद’ हे मिथक रचण्यात आले. याचा खुलासा केंद्रीय गृह खात्यातील तत्कालीन अपर सचिव आर.व्ही.एस्. मणी यांनी त्यांचे पुस्तक ‘दी मिथ ऑफ सॅफ्रन टेरेरिझम्’ यात केला आहे. या पुस्तकातील पृष्ठ क्र. ११४ वर ‘गोव्यातील मडगाव येथील स्फोटाला भगव्या आतंकवादाची दिशा कशी द्यायची ?’, याविषयी केंद्रीय गृह खात्यात झालेला चर्चेचा तपशील दिला आहे. न्यायालयानेही वर्ष २०१३ मध्ये मडगाव स्फोटातून सनातनच्या साधकांची निर्दाेष मुक्तता करतांना म्हटले होते, ‘घटनेचे अन्वेषण करण्याची अनुमती स्थानिक जिल्हाधिकार्यांकडून न घेता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिवांकडून घेणे, हे कार्यपद्धतीचे उल्लंघन आणि संशयास्पद होते.’ थोडक्यात तत्कालीन काँग्रेसी राजवटीत आम्हाला ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यासाठी ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले.
दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातन संस्थेचे नाव नेहमी चर्चेत येते, त्याचे काय ?
उत्तर : डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या होऊन ८-१० वर्षे झाली आहेत, तरीही प्रतिदिन या हत्यांविषयी माध्यमांमध्ये चर्चा होते. मला सांगा, भारतात प्रतिदिन शेकडो हत्या होत असतांना केवळ याच हत्यांना चर्चेत का ठेवले जाते ? नक्षलवाद्यांकडून केल्या जाणार्या हत्यांची चर्चा ५-७ दिवस होते. काश्मीरमधील हत्यांची चर्चा केवळ १ दिवस होते. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर ६५ जणांनी त्यांचे पुरस्कार परत केले. ‘पुरस्कार वापसी’ची एक चळवळ राबवण्यात आली. ही का ? याचा अर्थ इतकाच होतो की, ‘हे सगळे जण विशिष्ट व्यक्तींच्या हत्येविषयीच संवेदनशील होते आणि त्याचीच त्यांना चर्चा घडवून आणायची होती’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. खरे तर नक्षलवाद हा साम्यवादाचाच एक भाग आहे. साम्यवादात हिंसाचाराचे समर्थन आहे; पण ‘भारतात नक्षलवादी वेगळे आणि साम्यवादी वेगळे’, अशी प्रतिमा साम्यवाद्यांनी निर्माण केली आहे. हिंसाचार तर करायचा; पण त्याचे नैतिक दायित्व स्वतःवर न घेता नक्षलवाद्यांवर ढकलायचे आणि शांत राहून त्यांना छुप्या पद्धतीने साहाय्यही करायचे ! दाभोलकरांचे उदाहरण द्यायचे, तर त्यांच्या अंनिस या संघटनेचे नाव नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्या ६२ संस्थांच्या सूचीमध्ये होते. त्यांचे कार्यकर्ते गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी नक्षलवादी कारवाया करत असल्याच्या सूत्रावरून पकडले गेले होते.
थोडक्यात आजच्या काळात डॉ. दाभोलकर थोर गांधीवादी नव्हे, तर अर्बन नक्षलवादी होते. या नक्षलवादाने आजपर्यंत भारतात १४ सहस्र हत्या केल्या आहेत. त्याविषयी कुणी चर्चा का करत नाही ? डॉ. दाभोलकरांची हत्या ही हत्या आहे; पण मग नक्षलवाद्यांनी केलेल्या १४ सहस्र हत्या या हत्या नाहीत का ? नक्षलवाद्यांकडून प्रतिदिन हत्या घडवल्या जातात. त्याविषयी आपल्याला काही वाटत नाही किंवा आपल्याला वाटू दिले जात नाही. आपली मने इतकी बधीर करण्यात आली आहेत; पण मग तीच संवेदना केवळ ४ हत्यांविषयी कशी निर्माण केली जाते ? याचे कारण साम्यवाद्यांच्या तत्त्वज्ञानात आहे. रशियाचा कम्युनिस्ट (साम्यवादी) नेता जोसेफ स्टॅलिन म्हणाला होता, ‘एका माणसाचा मृत्यू ही शोकांतिका आहे. लाखो लोकांचा मृत्यू ही आकडेवारी आहे !’ हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून साम्यवाद्यांकडून विशिष्ट हत्यांच्या संदर्भात चर्चा घडवली जाते. हा साम्यवाद्यांचा वैचारिक आतंकवाद आहे. स्पष्टपणे सांगायचे, तर ‘या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांशी आमचा कुठलाही संबंध नाही. आम्ही आध्यात्मिक माणसे आहोत, आतंकवादी नाही !’
सनातन संस्था गेल्या काही वर्षांपासून हिंदु धर्माचा अत्यंत तेजस्वी प्रसार करत आहे. त्यामुळे समाज धर्माचरणी आणि श्रद्धावान बनत आहे. यामुळे नास्तिकतावादी, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनवादी, हिंदुद्वेषी यांचे व्यवसाय बंद होऊ लागले होते. धर्म न मानणार्या पुरोगाम्यांना हा तेजस्वी प्रसार बघवत नाही; म्हणून सनातन संस्थेला लक्ष्य करण्यात येते. धर्माला विरोध आणि अल्पसंख्यांकांचे राजकारण करणार्यांसाठी सनातन संस्था हे सोपे लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट) आहे. राष्ट्रविरोधी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी राजकीय पक्षांना आम्हाला लक्ष्य करून एक प्रकारे केंद्रातील सत्तेला लक्ष्य करायचे आहे अन् त्यासाठी आम्हाला ‘सॉफ्ट टार्गेट’ केले जात आहे.
अध्यात्मात दांभिकता, भोंदूगिरी, अनिष्ट प्रथा आणि रूढी असतील, तर त्याविषयी कार्य करायला नको का ?
उत्तर : धार्मिक क्षेत्रांत खोटारडेपणा, ढोंगीपणा किंवा भोंदूगिरी अशी दांभिकता नाही, असे आमचे म्हणणे नाही. ‘समाजातील दांभिकता, भोंदूगिरी, अनिष्ट प्रथा आणि अयोग्य रूढी यांचे निर्मूलन आवश्यकच आहे’, अशी सनातनची स्पष्ट भूमिका आहे. समाजात माजलेल्या दंभाचे निर्मूलन करण्यासाठी भक्तीयोगातील संतांनी केलेले अमूल्य कार्य, हे सर्वविदित आहे. अद्वैत सिद्धान्त सांगणार्या आद्य शंकराचार्यांनी प्रसंगी अघोरी प्रथांचा अवलंब करणार्या कापालिकांचा नाश करण्यासाठी संन्याशांना एकत्र केले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज या सर्वांनीच ओव्या, अभंग, भारूडे यांद्वारे समाजातील दांभिकतेवर प्रहार केले. हे सर्व सांगायचे तात्पर्य हे की, श्रद्धेचा प्रसार करणार्या संतांनाच चांगल्या प्रकारे दांभिकतेचे निर्मूलन करता येते; आज मात्र ही चळवळ दुर्दैवाने धर्म न मानणार्या लोकांच्या हाती गेली आहे. ज्यांना ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे वाटते, ज्यांना समाजात नास्तिकतावाद पसरवायचा आहे, ती मंडळी आज ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या नावाने नास्तिकवादाचा प्रसार करणारी श्रद्धाविरोधी चळवळ राबवत आहेत.
ज्या आध्यात्मिक परंपरेने श्रद्धेचा प्रसार करत दांभिकता निर्मूलन केले, त्याच परंपरेचा वारसा सनातन संस्था जपत आहे. अधर्माचरण करणारे पुजारी, पुरोहित, भोंदू संत इत्यादींमुळे समाज श्रद्धाहीन बनत असल्याने त्यांच्याविरुद्ध सनातन जागृती करते. या संदर्भात सनातन संस्थेने ‘साधू-संतांचे महत्त्व आणि कार्य’, ‘कुंभमेळ्यातील काही साधूंची भोंदूगिरी’ आणि ‘भोंदू बाबांपासून सावधान !’ हे ३ जनजागृतीपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत.
‘साधकांना संमोहित करून त्यांच्याकडून गुन्हे घडवण्यात आले’, असे शाम मानव सांगतात. खरोखर सनातनमध्ये संमोहित केले जाते का ?
उत्तर : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैद्यकीय संमोहन उपचारतज्ञ (क्लिनिकल हिप्नोथेरेपिस्ट) होते. त्यांना वैद्यकीय व्यवसाय करतांना संमोहनशास्त्राच्या मर्यादा आणि अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद केला. लोकांना आनंदी जीवन जगता यावे, यासाठी वैज्ञानिक भाषेत अध्यात्म शिकवण्यासाठी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. सनातन संस्थेमध्ये साधक केवळ साधना आणि अध्यात्म शिकण्यासाठी येतात. त्यांना ‘संमोहन म्हणजे काय ?’, याचे साधे ज्ञानही नसते. एखाद्याला संमोहित करण्यासाठी त्या क्षेत्राचे ज्ञान तर हवे ना ! मुळात प्रा. शाम मानव यांच्याकडे संमोहनशास्त्रातील कोणतेही प्रमाणपत्र नाही. ते वैद्यकीय क्षेत्रातील मानसोपचार तज्ञही नाहीत. असे असतांना स्वतःला सर्व ज्ञान असल्याप्रमाणे ‘साधकांना संमोहित करून त्यांच्याकडून गुन्हे घडवण्यात आले’, असे सांगत आहेत. ‘एका शास्त्राविषयी माहिती नसणार्या व्यक्तीने त्या शास्त्राचे नाव उच्चारून त्यातील मार्गदर्शकांना दोषी ठरवणे’, ही त्यांची भोंदूगिरीच आहे ! संमोहनशास्त्राच्या संदर्भात प्रा. मानव यांनी अजब विधाने करून चुकीचा प्रचार केला आहे. या संदर्भात प्रा. शाम मानव यांच्या विरोधात एका आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) कल्याण येथील पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा प्रविष्ट (दाखल) केली आहे. सनातन संस्थेने प्रा. मानव यांना दूरचित्रवाहिनीवर सार्वजनिक आव्हान दिले, ‘आम्ही समाजातील १० व्यक्ती तुम्हाला देतो, तुम्ही त्यांच्याकडून संमोहनाद्वारे गुन्हे घडवून दाखवा !’ प्रा. मानव यांनी या आव्हानाचा स्वीकार तर सोडाच, याचा कुठे उच्चारही केला नाही.
जातीद्वेषाविषयी तुमचा विचार काय आहे ?
उत्तर : ‘सध्याच्या काळात जातीद्वेष वाढण्याला गलिच्छ राजकारण कारणीभूत आहे. आज राजकारण्यांनी सर्व क्षेत्रांत जात आणून समाजात जातीजातींमध्ये विष पेरलेले आहे. हा जातीद्वेष केवळ समाजाला आध्यात्मिक बनवून रोखता येऊ शकतो’, असे आमचे मत आहे. सनातनच्या आश्रमातील जातीनिरपेक्षता ठळकपणे दिसणारी आहे. आश्रमात कुणालाही कुणाची जात विचारली जात नाही. ‘प्रत्येक जण साधकबंधू आहे, गुरुबंधू आहे’, या आध्यात्मिक भावाने त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सनातनचा आश्रम हे शेकडो सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे.
सनातनला नेमके काय साध्य करायचे आहे ?
उत्तर : सनातन संस्था श्रद्धासंवर्धन चळवळीतील एक अग्रणी संस्था आहे. ‘मनुष्यजन्माचे सार्थक करण्यास शिकवणार्या हिंदु धर्मावर श्रद्धा ठेवून साधना करा आणि जीवनाचे सार्थक करा !’, ही सनातन संस्थेची मुख्य शिकवण आहे. आम्हाला हिंदु धर्मावरील श्रद्धेच्या संवर्धनातून धर्माचरणी प्रजेची निर्मिती करायची आहे; कारण ‘सुखस्य मूलं धर्मः ।’ (चाणक्यसूत्रे, अध्याय १, सूत्र १), म्हणजे ‘सुखाचे मूळ धर्म (धर्माचरण करण्यात) आहे’, असे धर्म सांगतो. श्रद्धेचा प्रसार केल्याने समाज धर्माचरणी बनतो. धर्माचरणामुळे नीतीमत्तेचा उत्कर्ष होतो. असा नीतीमान समाजच राज्यव्यवस्थेचे आदर्शरित्या संचालन करू शकतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानरूपी प्रार्थनेतून जी विश्वकल्याणाची याचना केली आहे, त्याच परंपरेतील आम्ही वंशज आहोत. विश्वकल्याणाची कामना करणार्या हिंदु धर्मावरील श्रद्धेचा आम्ही प्रसार करत आहोत. विश्वकल्याणकारी आध्यात्मिक हिंदु राष्ट्राचा पुरस्कार करतो. त्याद्वारे आम्हाला (सनातन संस्थेला) अखिल मानवजातीचे हित साध्य करायचे आहे.