दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला !
१. मनोरंजनाचे माध्यम नव्हे, श्रद्धेचे प्रतीक !
मागील काही वर्षांमध्ये नाटक, चित्रपट, मालिका, विज्ञापने यांमध्ये हिंदूंच्या देवतांचे विडंबन सर्रासपणे चालू आहे. ‘बिघडले स्वर्गाचे दार’, ‘यदा कदाचित’, ‘वस्त्रहरण’ आदी नाटके; ‘ओ माय गॉड’, ‘पीके’, ‘सिंघम २’ आदी चित्रपटांमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अश्लील, पानचट विनोद दाखवले गेले. त्यांवर हसणार्यांमध्ये बहुतांश हिंदूंच होते. स्वत:च्या श्रद्धास्थानांविषयीची इतकी असंवेदनशीलता धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम होती. हे लक्षात घेऊन हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांचा अवमान करणार्यांच्या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ने शब्दप्रहार केला.

२. प्रस्थापितांचा विरोध पत्करून दिला वैचारिक लढा !
श्रद्धास्थानांची विटंबना अशीच चालू राहिली, तर येणार्या पिढीपुढे कोणता आदर्श रहाणार ? अशाने देवतांचे आशीर्वाद मिळतील कि अवकृपा होईल ? हे प्रश्न ‘सनातन प्रभात’ने उपस्थित केले. समाजातील काही प्रस्थापित आणि प्रतिष्ठित यांनी ‘प्रतिगामी’ अन् ‘कट्टरवादी’ ठरवून चिखलफेक केली. अनेकदा संपादक, वार्ताहर यांना धमक्याही आल्या; परंतु श्रद्धास्थानांचा अवमानाविरोधातील वैचारिक लढा आणि प्रतिवादही ‘सनातन प्रभात’ने चालूच ठेवला.
३. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्माभिमान जागृत केला !
सद्यःस्थितीत हिंदू जागृत होत आहेत. अनेक ठिकाणी देवता, संत आणि अन्य श्रद्धास्थानांच्या अवमानाविरोधात हिंदू कायदेशीर लढा देत आहेत. सामाजिक माध्यमांवर वैचारिक प्रतिवाद करायला लागले आहेत. हिंदूंमधील हा धर्माभिमान, म्हणजे एक प्रकारे ‘सनातन प्रभात’च्या वैचारिक लढ्याचा विजय होय. (समाप्त)
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, मुंबई. (१९.३.२०२५)