अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिरात प्रतिदिन सहस्रो भाविक दर्शनासाठी येत आहेत. या भाविकांना प्रसाद देण्यात येतो. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने या भाविकांना कारागृहातील बंदीवानांनी बनवलेल्या ५ सहस्र पिशव्यांतून प्रसाद देण्याचा निर्णय घेतला आहे.
फतेहपूरच्या कारागृहातील बंदीवानांनी श्रीराममंदिरासाठी स्वतःचाही हातभार लागावा, यासाठी स्वहस्ते बनवलेल्या १ सहस्र १०० पिशव्या मंदिराला अर्पण केल्या. या पिशव्यांचा रंग केशरी असून यावर श्रीरामासह मंदिराची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे. या पिशव्या न्यासाला प्राप्त झाल्यानंतर त्या सर्वांनाच आवडल्या. यानंतर न्यासाचे सचिव चंपत राय यांनी या बंदीवानांना आणखी ५ सहस्र पिशव्या बनवण्याची विनंती केली आहे. या बंदीवानांनी बनवलेल्या पिशव्यांतून भक्तांना प्रसाद देण्यात येणार आहे.