महबूबनगर (तेलंगाणा) येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून केली २१ भटक्या कुत्र्यांची हत्या : ५ कुत्रे घायाळ

(प्रतिकात्मक चित्र)

महबूबनगर (तेलंगाणा) – येथील पोनन्कल गावामध्ये १५ फेब्रुवारीच्या रात्री  अनेक भटक्या कुत्र्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यात २१ कुत्र्यांचा मृत्यू झाला, तर ५ कुत्रे घायाळ झाले. गोळीबार करणारे ४ जण होते आणि ते एका चारचाकीतून चेहरा झाकून आले होते. या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही, तसेच आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

 भटक्या कुत्र्यांवर विधानसभेत अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधान केल्याच्या रात्रीच घडली गोळीबाराची घटना !

ज्या रात्री ही घटना झाली, त्याच दिवशी एम्.आय.एम्.च्या आमदारांनी तेलंगाणाच्या विधानसभेत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर विधान केले होते. ते म्हणाले होते की, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय शोधावे लागतील. (यावरून ‘यामागे एम्आयएम् आहे का ?’, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

देशात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. त्यावर कुणी कायदा हातात घेऊन अशी कृती करत असेल, तर ते सरकारचे अपयश आहे. या समस्येवर सरकारने तातडीने उपाय काढणे आवश्यक आहे !