विशेष संपादकीय : रामराज्याची नांदी . . . !

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा।
गच्छन्मनोरथोऽस्माकम् रामः पातु सलक्ष्मणः।। २१।। – श्रीरामरक्षास्तोत्र

(अर्थ : सदैव तत्पर असणारे, हातात खड्ग घेतलेले आणि धनुष्यबाण धरलेले लक्ष्मणजींसमवेत प्रभु श्रीराम पुढे कूच करून आमच्या इच्छांचे रक्षण करोत.)

हिंदुस्थानच्या अत्यंत पवित्र भूमीचा आत्मा असलेल्या मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामाच्या मंदिरासाठी झालेला प्रचंड कालावधीचा संघर्ष हा हिंदूंचा आत्मसन्मान आणि राष्ट्रीय अस्मिता यांसाठी विश्वाच्या इतिहासात अमर झाला आहे ! भारताच्या संस्कृतीची परिभाषा असलेले, भारतीय सभ्यतेचे आदर्श असलेले, भारतीय जीवनमूल्यांचे प्रतिनिधित्व करणारे रघुकुलवंशी अयोध्यापती श्रीरामाचे भव्य मंदिर अंतिमतः उभे राहून तिथे रामलला प्राणप्रतिष्ठित होण्याची दैवी सूक्ष्म मुहूर्तघटिका नजिक आली आहे ! आसेतुहिमालयापासून हिंदसागरापर्यंत प्रत्येकाला एकात्मतेच्या बंधनात बांधणारे श्रीराम हे एक अलौकिक राष्ट्रसूत्र आहे ! प्रत्येकाच्या मनातील श्रीरामाच्या मंदिराची उभारणी हे न केवळ इस्लामी आक्रमकांचा पराभव, न केवळ अधर्मावर धर्माचा विजय; परंतु त्याचसमवेत कलियुगांतर्गत सहाव्या कलियुगातील सत्ययुगाच्या नवनिर्मितीची, हिंदूंच्या अलौकिक ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’ची, म्हणजेच स्वधर्माधिष्ठित स्वराष्ट्र, सर्वशक्तीसंपन्न, सुव्यवस्थाप्रधान, सर्वसुविधांयुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत सुराज्याच्या सूर्याेदयाची नांदी आहे !

मना राम कल्पतरू कामधेनू। निधी सार चिंतामणी काय वानू।।
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आता।। ६०।। – समर्थ रामदासस्वामीकृत मनाचे श्लोक

अश्वमेध यज्ञ करून संपूर्ण पृथ्वीवर सहस्रो वर्षे राज्य केलेल्या प्रभु श्रीरामाचे रामराज्य हे आदर्श राष्ट्राचे सर्वाेच्च उदाहरण आहे ! राजा श्रीराम हे राष्ट्रासाठी करावयाच्या त्यागाचे सर्वाेत्तम उदाहरण आहेत. वचनपूर्तीसाठी त्यांनी साक्षात् राजसिंहासनाचा त्याग केला ! सुग्रीव आणि बिभीषण यांना त्यांची जिंकलेली राज्ये परत केली. आदर्श राज्यकारभारासाठी दैवी धर्मपत्नीचाही त्याग करणारा राजा केवळ आणि केवळ तो प्रजाहितदक्ष प्रभु श्रीरामच आहे ! प्रभु श्रीराम नम्रता, वचनबद्धता, नीतीमत्ता, सुसंस्कृतपणा यांचा सर्वाेच्च आदर्श आहेत. ते ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे प्रतीरूप आहेत ! असुर निर्दालन आणि आदर्श राष्ट्र निर्मिती यांसाठीच त्यांचा अवतार आहे ! राष्ट्र संरक्षणासाठी वानरांची सैन्यनिर्मिती करून शत्रूनाशासाठी सदैव तत्पर असणारे ते प्रजारक्षक आहेत ! वेळप्रसंगी भव्य सागरालाही गवसणी घालण्याची क्षमता असणारे राजा आहेत. रघुराम कुशल संघटक आहेत ! सर्वांचा तो राम‘राया’ आहे ! म्हणूनच ते सर्वांसाठी आदर्शवत् आहेत, अनुसरणीय आहेत ! ‘हे राज्य व्हावे ही ‘श्रीं’ची इच्छा !’, हाच भाव ठेवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवरायांचे गुरु समर्थ रामदासस्वामी हे अशा सर्वगुणसंपन्न प्रभु श्रीरामाशी एकरूप झालेले आहेत ! हा केवळ योगायोग नव्हे. छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य हे आदर्शांच्या जवळ जाणारे आहे आणि आदर्श केवळ ‘रामराज्य’ आहे ! हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपूर्वी समर्थांनी भारतभर भ्रमण करून श्रीरामतत्त्व कार्यरत केले होते. रामराज्य हे परमोच्च आदर्शाचा बिंदू असल्याने आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी रामतत्त्व कार्यान्वित होणे अपरिहार्य ठरते ! वर्ष २०१९ पर्यंत जगाच्या आर्थिक महासत्तेत १० व्या क्रमांकावर असणारा भारत आता ३ र्‍या क्रमांकाची अर्थशक्ती होऊ पहात आहे ! श्री रामलला तंबूतून बाहेर आल्यावर एवढा पालट होऊ शकतो, तर श्रीराम त्याच्या भव्य पावन मंदिरात प्राणप्रतिष्ठित होऊन त्याचे तत्त्व संपूर्ण विश्वभरात कार्यरत होऊ लागल्यावर ही भारतभू विश्वगुरु होण्यास कितीसा वेळ लागणार आहे ? श्रीराममंदिराची उभारणी ही केवळ स्थूलातून राजकीय वाटली, तरी त्याचे सूक्ष्म आध्यात्मिक परिणाम हे दूरगामी आणि सर्वव्यापी आहेत. १० वर्षांपूर्वी अपराधजन्य मानल्या जाणार्‍या ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा आता जयघोष चालू होणे, ही रामललाची लीला नव्हे काय ? अशक्य ते शक्य होत आहे, तसेच आताच्या घडीला काहीसे अवघड वाटणारे ‘हिंदु राष्ट्र’ प्रत्यक्षात साकार होणार आहे आणि हेच श्रीराममंदिर उभारणीचे सूक्ष्मातील कार्य आहे !

रक्तरंजित ऐतिहासिक संघर्षाचे फळ !

वैवस्तान मनू यांनी निर्मिलेल्या अयोध्येवर द्वापरयुगापर्यंत सूर्यवंशी राजघराण्याचे श्रीरामपुत्र कुश याच्यानंतर ४४ पिढ्यांनी राज्य केले. इ.स.पूर्व १०० मध्ये चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य, पुष्यमित्र शृंग यांसह नंतरच्या अनेक राजांनी या मंदिराचे नवनिर्माण आणि देखरेख केली. वर्ष १५२८ मध्ये बाबराचा सेनापती मीर बाकीने मंदिर पाडल्यावर ते कह्यात घेण्यासाठी आतापर्यंत ७६ छोटी-मोठी युद्धे झाली; कित्येक संत-महात्मे आणि आणि भक्त यांनी प्राणार्पण केले; पण रामभक्त हिंदूंची रण जिंकण्याची उर्मी यत्किंचित्ही न्यून झाली नाही. हिंदूंचा पिढ्यान् पिढ्यांचा संकल्प अजेय राहिला ! या संघर्षात नवीन ऊर्जा मिळून २३ डिसेंबर १९४९ या दिवशी बाबरी ढाच्यात रामलला प्रगट झाले. ‘स्वतंत्र हिंदुस्थानातच श्रीरामजन्माचे प्रमाण मागितले जाणे’, हा प्रत्येक रामभक्ताच्या हृदयावरील दुर्दैवी आघात होता. वर्ष १९९० मध्ये श्रीरामासाठी सर्व जाती, संप्रदाय, पंथ, पद आदी विसरून लाखो कारसेवक संघटित झाल्यामुळे ‘श्रीराम हिंदूंना एकत्र करू शकतो’, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले ! १३४ वर्षांपासून चालू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा निकाल अत्यंत खडतर आव्हानांनंतर लागून अखेर ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये हिंदूंचा विजय झाला ! एखाद्या समूहाने तब्बल ५०० वर्षे एखाद्या मंदिरासाठी लढा चालू ठेवणे, ही विश्वातील एकमेव घटना असेल.

सुवर्णक्षणांचे साक्षीदार !

‘रामनाम’ आणि अयोध्या ही एक सकारात्मक ऊर्जा अन् चैतन्याचा स्रोत आहे, संस्कृतीची अस्मिता आहे, राष्ट्रोद्धाराची प्रेरणा आहे; इतकेच नव्हे, तर धर्मसंस्थापनेचा मार्ग अन् त्या माध्यमातून मोक्षाचे द्वार आहे ! या अलौकिक मंदिर उभारणीमुळे हिंदू धन्यता आणि आत्मिक समाधान अनुभवत आहेत ! हिंदु राष्ट्र निर्मितीचा पायाभूत आधार असलेल्या या मंदिर उभारणीच्या अभूतपूर्व क्षणांचे साक्षीदार होण्याचे महत्भाग्य या पिढीला मिळाले आहे. श्रीरामाच्या व्यष्टी आणि समष्टी व्यक्तीत्वाचा आदर्श आचरणात आणून त्यासाठी प्रयत्न करणे, हीच खरी काळानुसार रामभक्ती आहे. सध्या विविध कारणांस्तव हिंदूंचे संघटन वाढत आहे. ‘घरात घुसून शत्रूला मारणे’, हा आदर्श श्रीरामाने समोर ठेवला आहे. शत्रूला ओळखणे, त्याच्या तुल्यबळ सिद्धता करणे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे विजयासाठी भक्त बनून उपासना करणे, ही शिकवण रामचरित्र आपल्यासमोर ठेवते. धर्माचे अधिष्ठान ठेवून शत्रूला धडकी भरवणारे केलेले हिंदूसंघटन आणि धर्माचरणाने वागणारी प्रजा आदर्श हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते. मंदिराच्या माध्यमातून रामतत्त्व कार्यरत होऊन त्यासाठीची आध्यात्मिक प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे रामभक्तांनी आता उपासनेची गती वाढवून राष्ट्रोत्थानाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलण्यासाठी संघटितपणे झोकून दिले, तर रामराज्याची पहाट खरोखरच दूर नसेल !