मुकामार/दुखापत आणि मुरगळणे या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक २०) !

होमिओपॅथी औषध

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

२९ सप्टेंबर या दिवशीपासून आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेत आहोत. त्या अंतर्गत १५ डिसेंबर या दिवशी आपण ‘भाजणे (Burns)’ या आजारावर घ्यावयाची काळजी आणि त्यावर घ्यावयाची औषधे’, यांविषयी माहिती वाचली. ‘प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील ‘होमिओपॅथी स्वउपचारांच्या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !

संकलक : डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

मुकामार/दुखापत (Bruise/Injury)

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

पडणे, आपटणे, अपघात यांमुळे शरिराला मुकामार लागू शकतो. बाह्य घटकामुळे जाणीवपूर्वक किंवा अजाणता शरिराच्या जिवंत भागाची झालेली हानी याला ‘दुखापत’, असे म्हणतात. दुखापतीच्या व्याप्तीनुसार विश्रांती घेणे, दुखापत झालेल्या भागावर ३-४ वेळा प्रत्येकी १० मिनिटे बर्फ लावणे, इत्यादी उपचार करावे. जर जखम झाली असेल, तर ती स्वच्छ करावी; जखम मोठी आणि खोलवर असल्यास त्यावर मलमपट्टी करावी. जखमेला दुर्गंध येत नाही ना, त्यात पू होत नाही ना, याकडे बारीक लक्ष द्यावे. जखम पुष्कळ मोठी असल्यास तिथे टाके घालावे लागू शकतात, त्यासाठी रुग्णाला रुग्णालयात हलवावे.

१. आर्निका मोन्टाना (Arnica Montana) : सर्व प्रकारची दुखापत (injury), मुका मार (bruise), अपघातामध्ये स्नायूंना मार लागणे (post traumatic soft tissue injury)

अर्धा कप पाण्यामध्ये या औषधाच्या मूलार्काचे (mother tincture चे) ४ ते ५ थेंब टाकावे आणि त्या मिश्रणामध्ये भिजवलेली मऊ कापडाची पट्टी त्या मुका मार लागलेल्या भागावर ठेवावी, तसेच पोटामध्ये घेण्यासाठी ३० पोटेन्सीचे हेच औषध द्यावे. त्यामुळे सूज कमी होण्यास त्वरीत सहाय्य होते.

डॉ. अजित भरमगुडे

२. बेलिस पॅरेन्निस (Bellis Perennis) : दुखापत अधिक खोलवर असणे

३. कॅलंडुला ऑफिसिनॅलिस (Calendula Officinalis) : जखम (wound) होणे

४. एकिनेशिया एंगस्टिफोलिया (Echinacea Angustifolia) : व्रण (ulcer), जखम यांना दुर्गंधी येणे

५. नेट्रम् सल्फ्युरिकम् (Natrum Sulphuricum) : डोक्याला मार लागणे

६. हायपेरिकम् पर्फाेरेटम् (Hypericum Perforatum) : नसा (nerves), बोटांची टोके, माकड हाड (coccyx), पाठीचा कणा (spine) यांना मार लागणे

७. रूटा ग्रॅव्हिओलेन्स (Ruta Graveolens) : ठोसा किंवा बोथट शस्त्र यांमुळे लागलेला मुका मार, त्वचा काळी-निळी पडणे

८. लेडम् पालुस्त्रे (Ledum Palustre) : उंदीर, मांजर, कुत्रा यांनी चावल्यामुळे, तसेच खिळे किंवा अन्य धारदार शस्त्रे यांमुळे होणार्‍या जखमा

९. स्टाफीसाग्रिया (Staphysagria) : धारदार शस्त्रांमुळे, तसेच शस्त्रकर्म केल्यामुळे होणार्‍या जखमा

१०. सिंफायटम् ऑफिसिनॅलिस (Symphytum Officinalis) : हाडे, डोळा, अस्थीबंधने (Ligaments), स्नायूबंधने (Tendons), कोपर (tennis elbow) या ठिकाणी मार लागणे

११. पायरोजेनियम (Pyrogenium) : जखम दूषित होऊन त्यामध्ये पू होणे

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

मुरगळणे (Sprain)

सांध्याभोवतीच्या अस्थीबंधनाला (ligament ला) झालेल्या दुखापतीला ‘मुरगळणे’, असे म्हणतात. मुरगळलेल्या भागात वेदना होतात आणि सूज येते. अशा परिस्थितीत त्या भागावर वजन टाकायचे नाही. ज्या कृतींनी किंवा हालचालींनी त्या भागात वेदना होत असतील, त्या सर्व टाळाव्या. मुरगळलेल्या भागाला पूर्ण विश्रांती द्यावी. त्या भागाला बर्फाने शेकल्याने तेथील सूज लवकर उतरते आणि वेदनाही काही प्रमाणात न्यून होतात. लवचिक पट्टीने (elastic bandage ने) मुरगळलेला भाग घट्ट बांधून ठेवणेही लाभदायक ठरते. मुरगळण्याच्या उपरोल्लेखित लक्षणांच्या व्यतिरिक्त कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.

१. आर्निका मोन्टाना (Arnica Montana) : मुरगळल्यामुळे संबंधित भाग काळा-निळा पडून असह्य वेदना होऊ लागल्यास हे औषध प्रथम द्यावे.

२. र्‍हस टॉक्सिकोडेंड्रॉन (Rhus Toxicodendron)

२ अ. वजनदार वस्तू उचलून उसण भरल्यामुळे कायमची पाठदुखी, कंबरदुखी जडणे

२ आ. बसमध्ये अनेक घंटे हाताने आधार पकडून उभे रहावे लागल्याने मनगट दुखावणे, मुष्टीयोध्यांची मनगटे दुखावणे, धावतांना घोटे मुरगळणे, तसेच मजुरांच्या पाठीचे स्नायू दुखावणे

३. बेलिस पॅरेनिस (Bellis Perennis) : मोटारच्या किंवा आगगाडीच्या अपघातामध्ये पाठीचा कणा दुखावणे, आतील स्नायूंना दुखापत होणे (injury to deeper tissues), स्नायू पुष्कळ कडक होणे (marked stiffness)

‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.