Covid Wave : कोरोनाची पुन्हा एकदा लाट येण्याची शक्यता !

नवी देहली – देशात कोरोना विषाणूचे संक्रमण व्हायला आरंभ झाला आहे. प्रतिदिन कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. चिंतेचे सूत्र असे की, केरळनंतर आता आणखी २ राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात १, तर गोव्यात १८ नवी प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनाचा नवीन उपप्रकार (सब-व्हेरिएंट) ‘जेएन्.१’च्या प्रकरणांचा यात समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. देशात कोरोनाची सक्रीय प्रकरणे प्रतिदिन वाढत असून त्यांची संख्या २ सहस्रांच्या वर गेली आहे.

कोरोनाच्या या नव्या प्रकाराच्या संदर्भातील माहिती

  • ‘जेएन्.१’ हा विषाणूचा प्रकार अमेरिका, सिंगापूर आणि चीन येथेही प्रादुर्भाव झाला आहे.
  • या प्रकाराची वाढती प्रकरणे पहाता जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ असे म्हटले आहे.
  • कोरोनाची वाढती प्रकरणे पहाता तज्ञांनी लोकांना सतर्क रहाण्याचा सल्ला दिला.
  • लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

केरळ वगळता इतर सर्व राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य; पण सतर्क रहाणे आवश्यक ! – डॉ. अजित जैन

देहलीच्या राजीव गांधी रुग्णालयातील वरिष्ठ कोविड अधिकारी असलेले डॉ. अजित जैन यासंदर्भात म्हणाले, ‘‘कोरोनाच्या नवीन प्रकाराला हलक्यात घेऊ नये. सध्या या ‘व्हेरिएंट’ची लक्षणे सौम्य असली, तरी ज्याप्रकारे प्रकरणे वाढत आहेत, ते लक्षात घेता सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. विशेषत: वृद्ध रुग्ण आणि ज्यांना आधीच गंभीर आजार आहे, अशांनी विशेष काळजी घ्यावी. या ‘व्हेरिएंट’चा प्रादुर्भाव समाजामध्ये झाला आहे कि नाही, हेही पहावे लागेल. जर झाला असेल, तर येत्या आठवड्यात कोरोनाच्या संदर्भात सतर्कता वाढवावी लागेल. सध्या कोरोनाची आकडेवारी पाहिली, तर केरळ वगळता इतर सर्व राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.’’