लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी कार्यक्रमास प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची उपस्थिती !

१७ डिसेंबरला विशेष कार्यक्रम !

डावीकडून श्री. विनायक काळे, सौ. मनीषा काळे, श्री. प्रकाश बिरजे आणि श्री. श्रीहरि दाते

सांगली – लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या संस्थेस ९९ वर्षे पूर्ण होऊन ही संस्था शतक वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने शताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ डिसेंबरला लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विश्रामबाग येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सायंकाळी ६ वाजता होईल. हा कार्यक्रम म्हणजे सांगलीकरांसाठी पर्वणी असून त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन टिळक स्मारक संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा काळे यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी विश्वस्त श्री. विनायक काळे, सौ. मनीषा काळे, श्री. प्रकाश बिरजे आणि श्री. श्रीहरि दाते उपस्थित होते.

१५ फेब्रुवारी १९२० या दिवशी लोकमान्य टिळक यांनी या परिसरात आयोजित केलेल्या ज्योतिष परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. याचे स्मरणार्थ १९ डिसेंबर १९२४ या दिवशी लोकमान्य टिळक स्मारक मंदिर स्थापन झाले.

गेल्या अनेक वर्षांपासून स्मारकाच्या वतीने योगासन वर्ग, गीताजयंती या निमित्ताने विद्यार्थांसाठी वक्तृत्व स्पर्धा, गीतापठण, कथाकथन, चर्चासत्र, आरोग्य विषयक, तसेच ज्ञानेश्वरी आणि लोकमान्य टिळक या विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात, तसेच बालसंस्कार शिबिर, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम, असे अनेक देश आणि समाजोपयोगी कार्यक्रमही येथे आयोजित करण्यात आले आहेत. या समवेत स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महापुरुषांची जयंती असे राष्ट्रीय उपक्रमही आयोजित केले जातात.