आगामी ध्येयपूर्तीच्या अनुषंगाने चर्चात्मक वाटचाल…,मंदिरे वाचवा ! संस्कृती वाचवा !!

देवळातील चैतन्य टिकवणे भक्त आणि देवस्थान समिती यांचे दायित्व !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. काही देवळांत होणारे उत्सव किंवा देवाच्या जत्रा या देवतेच्या चैतन्याचा एक आनंदोत्सव न होता अपप्रकारांचे एक ठिकाण बनलेले आहेत. देवळांतील उत्सव भावपूर्ण पद्धतीने पार पडले पाहिजेत ! उत्सवांना विकृत स्वरूप दिल्यास देवतेच्या चैतन्याचा र्‍हास होतो आणि देवतेच्या सात्त्विकतेचा भाविकांना लाभ होत नाही. उत्सवाच्या वेळी फटाके उडवणे निषिद्ध आहे.

२. मोठ्यांदा लावलेल्या ध्वनीक्षेपक यंत्रणेतील आवाजामुळे चैतन्यकणांचे विभाजन होऊन त्यांचे अखंडत्व नष्ट झाल्याने वातावरणात त्रासदायक स्पंदने खेचली जातात. काही देवळांतील पुजारी मोठ्यांदा, तसेच स्पर्धा लावल्यासारखे चढाओढीने बेसूर आवाजात मंत्र म्हणतात. यातून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांच्या प्रभावाने मंत्रशक्ती विकृत स्वरूप धारण करते. त्यामुळे याचा भाविकांना लाभ होण्याऐवजी त्यांचा देह आणि मन यांवर याचे विकृत परिणाम होतात. गडबडीने मंत्र म्हणून पूजाविधी गुंडाळून ठेवणार्‍यांना हिंदूंनी खडसवावे आणि त्यांना दक्षिणा देऊ नये. अनेक प्रकारच्या दुष्कृत्यांतून देवळाची चैतन्याच्या स्तरावर कार्य करण्याची क्षमता अल्प होत गेल्याने त्या त्या देवळाचे महत्त्व कालमाहात्म्याप्रमाणे अल्प होत जाते.

३. देवळाच्या बाहेरचा बाजार हटवून तेथे धर्मशिक्षण देणारे फलक लावले पाहिजेत. देवळात ध्वनीक्षेपकावरून त्या त्या देवतेचा नामजप लावून ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक, व्यावहारिक गप्पा मारत बसणार्‍या मंडळींना तेथे बसण्यास मज्जाव करणेही आवश्यक आहे. एका देवळाच्या सात्त्विकतेमुळे सहस्रो किलोमीटरचा परिसर शुद्ध होण्यास साहाय्य मिळते.

४. देवस्थान समितीचे दायित्व केवळ पैसा गोळा करणे आदी नसून देवळातील चैतन्य टिकवणे, हे त्यांचे खरे दायित्व आहे !

– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ   

डावीकडून श्री. अशोक घेगडे, श्री. दिलीप देशमुख, श्री. आनंद जाखोटिया, श्री. डिगंबर महाले आणि सद्गुरु नंदकुमार जाधव

मंदिरसेवकांची उभारूनी संघटना । करू मंदिरांची आदर्श रचना । त्यायोगे होईल मग धर्मसंस्थापना ॥

मंदिरे वाचवा ! संस्कृती वाचवा !!

या दिशादर्शनातून साकार होतील हिंदु राष्ट्रातील सात्त्विक मंदिरे… !

मंदिरे जागवा ! धर्म जागवा !!

या चर्चात्मक पायाभरणीतून उभे रहातील भविष्यातील आदर्श मंदिरांचे कळस… !

‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ अभ्यासक्रम निर्मितीचे शिवधनुष्य उचलू ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था 

श्री.चेतन राजहंस

काही मासांपूर्वी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’(मुंबई)चे संचालक आणि त्यांच्या शैक्षणिक विभागातील काही मंडळी यांनी ‘टेम्पल मॅनेजमेंट’(मंदिर सुव्यवस्थापन) या विषयावर अभ्यासक्रम निर्मितीचा प्रस्ताव आपल्यापुढे ठेवला. याचे दायित्व मंदिर महासंघाने घेतले आहे. या अंतर्गत अभ्यासक्रमासाठी ‘मंदिरांमध्ये सामान्य वैदिक धार्मिक विधी, मंदिरांचे प्रशासन, मंदिरांच्या सांप्रदायिक परंपरा, मंदिरांतील पुजार्‍यांची कर्तव्ये आणि दायित्व, विश्‍वस्त आणि व्यवस्थापकीय सदस्यांचे उत्तरदायित्व आणि कर्तव्ये, मंदिर कार्यालय व्यवस्थापन, मंदिरांचे अर्थशास्त्र, मंदिरांशी संबंधित संविधानिक कलमे आणि कायदे, मंदिरांना शासकीय योजनांचे लाभार्थी कसे व्हावे ?, मंदिरांचा जिर्णोद्धार, चरित्र व्यवस्थापन आणि साधना’ असे १२ विषय निवडले आहेत. यासाठी आम्हाला मंदिर विश्‍वस्तांकडून त्यांचे अनुभव हवे आहेत. धार्मिक क्षेत्रांतील मंदिरांचे व्यवस्थापन करायचे असल्यास सात्त्विक बुद्धी, चारित्र्य असणे, तसेच धर्मपालन करणे आवश्यक आहे. मंदिराशी संबंधित विश्‍वस्त, व्यवस्थापक, पुजारी हा भक्त, तसेच निष्काम कर्मयोग करणारा साधक असायला हवा !

पुढच्या पिढीला सुलभ मंदिर व्यवस्थापनासाठी मंदिराचा लेखाजोखा (‘रेकॉर्ड किपिंग’) चांगला हवा ! – दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त

श्री.दिलीप देशमुख

मंदिरांचा लेखाजोखा योग्य असल्यास धर्मादाय आयुक्त कार्यालयातून मंदिरांना कसलीच अडचण येणार नाही. लेखाजोखा, चल-अचल संपत्तीची नोंद करणे, जमा-खर्च नोंद करणे या सर्व कृती ताळेबंद करण्यासाठी आवश्यक असतात. ‘ट्रस्ट’च्या झालेल्या कार्यात्मक बैठकींचे इतिवृतांत नोंद असल्यास पुढे काही वर्षांत येणार्‍या विश्‍वस्तांना आधीच्या बैठकींतील निर्णयांचे संदर्भ घेता येतात. दानपेटीमध्ये जमा झालेल्या रकमेची नोंद करायला हवी, तसेच ही रक्कम २४ घंट्यांत रक्कम अधिकोषात जमा व्हायला हवी. परंपरागत मिळालेल्या वस्तू, राजे-महाराजांनी दिलेल्या सनदी, ऐतिहासिक शिलालेख, नाणी अशा अनेक वस्तूंच्या नोंदी ठेवल्यास मंदिरांचा इतिहासही त्यातून कळतो. एकूणच मंदिराचे ‘रेकॉर्ड किपिंग’ (लेखाजोखा) योग्य ठेवल्यास मंदिर व्यवस्थापन करणार्‍या पुढच्या पिढीला सुलभ होईल.

भाविकांना केंद्रबिंदू ठेवून मंदिरांचे व्यवस्थापन करायला हवे ! – दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त  

मंदिराचे उत्तम व्यवस्थापन कसे असावे ? हे शेगाव येथील मंदिर व्यवस्थापनाकडून शिकता येण्यासारखे आहे. प्रत्येक मंदिरात ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करायला हवा. दर्शनरांगेत वृद्धांना उभे रहाण्यासाठी सुयोग्य व्यवस्था असायला हवी. यात्राकाळात भाविकांना ये-जा करण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था असावी. पंढरपूरची वारी हे यात्रा व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. चप्पल व्यवस्थेपासून ते भाविकांना सहजतेने दर्शन व्हावे, यासाठी सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. मंदिराचे व्यवस्थापन करतांना भाविकांना केंद्रबिंदू ठेवून केल्यास आदर्श व्यवस्थापन करता येऊ शकते.

त्रुटी असलेली मूर्ती मंदिरात स्थापन करू नये ! – प्रमोद कांबळे, उपाध्यक्ष आणि शिल्पकार, संस्कार भारती, महाराष्ट्र

श्री. प्रमोद कांबळे

प्राचीन मूर्तींचा सर्वांचा मुखवटा त्यांच्या तळहाताच्या एवढाच आहे. मूर्ती घडवतांना हे सूत्र शिल्पकाराने लक्षात घ्यायला हवे. मुखवट्याच्या साडेसात पट शरिराची उंची असते. मूर्ती सिद्ध करतांना डोळ्यांतील अंतर अनेक वेळा अल्प-अधिक होते. डोळ्यांमध्ये एक डोळा बसेल एवढेच अंतर ठेवावे, तसेच कान, नाक, डोळे हेही एकाच रेषेमध्ये असावेत. मूर्ती अचूक बनवण्यासाठी शिल्पकाराची एकाग्रता असणे आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात घेतल्यास मूर्ती बनवण्यातील त्रुटी अल्प होतील. कलाकृती साकार करतांना कलाकाराने एकाग्र व्हायला हवे. सध्याचे कारागीर पुरेसे शिक्षित नसल्याने अनेकदा मंदिरांमध्ये पाश्‍चात्त्य शैलीतील रचना वापरली जाते. मूर्ती अनेक पिढ्यांना आशीर्वाद देण्याचे कार्य करत असल्याने त्रुटी असणारी मूर्ती मंदिरामध्ये कधीही स्थापित करू नये.

विकास करतांना मंदिराची मूळ रचना वाचवणे आवश्यक ! – विलास वहाणे, उपसंचालक, पुरातत्व विभाग

श्री.विलास वहाणे

मंदिरांचा विकास करतांना मंदिराची मूळ रचना वाचवणे आवश्यक असते. मंदिरांची दुरुस्ती करतांना मंदिराच्या बांधकाम शैलीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मंदिरात ‘टाइल्स’ बसवल्यामुळे मूळ दगडापर्यंत हवा पोचत नसल्यामुळे काही वर्षांनंतर दगडांची झीज होते. सध्या मूर्तीवर वज्रलेप करण्याच्या नावाखाली रासायनिक घटक वापरणे अत्यंत चुकीचे आहे. मंदिरांचे संवर्धन करतांना मंदिर आणि देवतेची मूर्ती यांना कोणतीही इजा न झाल्यास भगवंताचा वास टिकू रहातो.

काळानुरूप अपेक्षित प्रसिद्धीमाध्यमे वापरून मंदिरांनी त्यांचा विषय समाजापर्यंत पोचवावा ! – नीलेश खरे, संपादक, ‘झी २४ तास’

श्री. नीलेश खरे

मंदिर संस्था किंवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ३ मिनिटांपर्यंतचे एक चलचित्र सिद्ध करून ते दूरचित्रवाणी माध्यमांपर्यंत पोचले, तर जनजागृतीसाठी लाभ होऊ शकतो. प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोचत नसतील, तर तुम्ही प्रतिनिधीपर्यंत पोचा. वर्तमानपत्रांमध्ये जागेची मर्यादा असते; मात्र ‘स्पीड न्यूज’च्या (वेगवान बातम्या देण्याच्या) माध्यमातून आपण अल्प कालावधीत अधिकाधिक लोकांपर्यंत विषय पोचवू शकतो.

परिषदेला उपस्थित काही मान्यवर

१. श्रीक्षेत्र लेण्याद्री गणपति देवस्थानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र बिडवई आणि न्यासाचे श्री. शंकर ताम्हाणे

२. श्री विघ्नहर गणपति मंदिराचे (ओझर) अध्यक्ष श्री. गणेश कवडे, विश्‍वस्त श्री. बबनराव मांडे

३. श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे कार्यकारी अध्यक्ष श्री. मधुकर अण्णा गवांदे, तुळजापूर येथील सिद्ध गरीबनाथ मठाचे योगी मावजीनाथ महाराज,

४. काळाराम मंदिराचे महंत सुधीरदासजी महाराज

५. श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानचे सचिव श्री. सुरेश कौदर

६. त्र्यंबकेश्‍वर देवस्थानचे श्री. थिटे

७. अमरावती येथील श्री महाकाली शक्तीपिठाचे पिठाधीश्‍वर श्री शक्तीजी महाराज

८. श्री तुळजाभवानी मंदिर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे

९. महाबळेश्‍वर महादेव मंदिराचे पुजारी श्री. हृषिकेश महाबळेश्‍वरकर