फोंडा, गोवा येथील सौ. मीना यशवंत शिंदे यांचा भावजागृतीचा प्रवास !

सौ. मीना शिंदे

१. दादर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाचे वातावरण पुष्कळ आवडणे

‘वर्ष १९९२ मध्ये मी गुरुपौर्णिमा महोत्सवाला दादर येथे गेले होते. त्या वेळी मी माझी नणंद श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८० वर्षे) यांना भेटणे, गुरुपौर्णिमेचा सोहळा पहाणे आणि गुरूंचे दर्शन घेणे यांसाठी दादरला गेले होते. त्या वेळी मला तेथील वातावरण पुष्कळ आवडले.

२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात अनुभवलेला आनंद !

२ अ. अमृतमहोत्सव सोहळ्याचे वातावरण पुष्कळ चैतन्यमय वाटणे आणि साधकांचा प्रेमभाव पाहून भारावून जाणे : वर्ष १९९५ मध्ये वसंतपंचमीच्या (५ फेब्रुवारीच्या) दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव सोहळा इंदुर येथे होता. त्या वेळी मला श्रीमती शकुंतला डुंबरे आणि श्री. अनिरूद्ध डुंबरे (नणंदेचा मुलगा) यांनी बोलावल्याने इंदुर येथे जाण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे मी मुंबई येथील साधक आणि माझी मोठी नणंद श्रीमती मृणालिनी दळवी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८७ वर्षे) यांच्यासमवेत इंदूरला गेले. तो सोहळा बघून मी तर भारावूनच गेले.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याची व्यवस्था इंदूरच्या त्यांच्या आश्रमासमोरील शेतात केली होती. ती व्यवस्था आणि तेथील वातावरणही पुष्कळ चैतन्यमय वाटत होते. तेथील साधक देहभान विसरून करत असलेली सेवा आणि साधकांचा प्रेमभाव बघून मला पुष्कळ चांगले वाटत होते; म्हणून मी त्यांच्यात सामावून गेले होते.

२ आ. हेलिकॉप्टरमधून प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणे : ५ फेब्रुवारी या दिवशी अन्नपूर्णा मंदिरापासून प.पू. भक्तराज महाराज, अनेक संत आणि साधक यांची पदयात्रा निघाली होती. तेव्हा हेलिकॉप्टर मधून प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

२ इ. प.पू. भक्तराज महाराज यांचा मंडपात प्रवेश झाल्यावर साधकांच्या डोळ्यांतून भावाश्रू येणे, तेव्हा भावजागृतीसंबंधी ठाऊक नसल्याने त्यांच्या या रडण्याचे कारण न कळणे : प.पू. भक्तराज महाराज यांनी मुख्य प्रवेशद्वारातून मंडपात प्रवेश केला आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. तेव्हा वातावरणात पुष्कळ चैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे काही साधकांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले. मी ‘भाव म्हणजे काय ?’, हे कधी अनुभवले नसल्याने ‘हे साधक वेडे आहेत. ते कशाला रडत आहेत ?’, असा विचार माझ्या मनात आला. याबद्दल गुरुदेवा, क्षमस्व ! मी अज्ञानी आहे. मला क्षमा करा.

३. सत्संगाची ओढ लागणे

मी इंदूर येथून आले आणि कुलदेवतेचा नामजप करू लागले. मला ‘प्रत्येक शनिवारी अधिवक्ता रामदास केसरकरकाका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७१ वर्षे) यांच्या कार्यालयामध्ये सत्संग असतो’, हे कळल्यावर मी सत्संगाला गेले आणि मला सत्संगाला जाण्याची ओढ लागली.

४. साधनेला आरंभ

वर्ष १९९५ मध्ये अधिवक्ता केसरकरकाकांनी आमच्या घरी ऋषिपंचमीच्या दिवशी प्रवचन घेतले आणि तेथून माझा साधनाप्रवास चालू झाला. माझा साधनाप्रवास प्रचार, प्रसार, सत्संग, सभा अशा अनेक प्रकारच्या सेवांच्या माध्यमातून चालू झाला. काही काळ मी देवद आश्रमात वास्तव्यास होते.

५. प.पू. पांडे महाराज यांच्या बोलण्याचा अर्थ न कळणे

मी एकदा देवद आश्रमात प.पू. पांडे महाराज यांच्या भेटीला गेले होते. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही कंजूष आहात. तुमच्याकडे पुष्कळ काही आहे. त्याचा वापर तुम्ही करत नाही आणि आम्हालाही देत नाही.’’ तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही असे का म्हणता ? मला काही कळले नाही.’’ ते म्हणाले, ‘‘तुमचे अनेक जन्म वाया गेले, तरी तुमचे मडके कच्चेच राहिले. आता तरी भाजा.’’ तरीही मला त्याचा अर्थ कळला नाही आणि माझ्या मनात हा विचार सतत घोळत राहिला होता. त्या वेळी मला वाटत होते की, ‘मला तर गुरु आहेत.’

६. सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न करण्यास सांगणे 

वर्ष २०१५ मध्ये आम्ही फोंडा, गोवा येथे रहाण्यास आलो. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा मी त्यांना प.पू. पांडे महाराज यांच्या भेटीत घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘काही नाही. भावजागृतीचे प्रयत्न करा. सर्व काही ठीक होईल.’’ त्यांच्या या संकल्पामुळे माझे थोडे थोडे भावजागृतीचे प्रयत्न होऊ लागले.

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून भाव अन् भक्ती शिकायला मिळणे

मला भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून ‘भावजागृतीसाठी प्रयत्न कसे करायचे ?’, हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळत आहे, तर ‘श्रीगुरूंप्रती भक्ती कशी असावी ?’, हे मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळत आहे.

८. ‘भावजागृतीचे प्रयत्न करतांना कुठे अल्प पडत आहे ?’, याची जाणीव होणे

‘भावजागृतीचे प्रयत्न करतांना मी पुष्कळ अल्प पडत आहे आणि माझ्याकडून म्हणावे तसे प्रयत्नही होत नाहीत’, याची मला जाणीव होऊ लागली. तेव्हा मनालाही पुष्कळ त्रास होऊ लागला. ‘मला जे हवे आहे, ते मिळत नाही. परमेश्वर मला देत आहे; पण मला ते घेता येत नाही’, याची मला सदोदित खंत वाटत होती. ‘हे गुरुदेवा, तुम्ही माझ्यासाठी पुष्कळ काही करत आहात’, याची मला जाणीव नाही. ‘तुम्ही मला माझ्यातील  स्वभावदोष आणि अहं यांच्या आवरणातून बाहेर काढणार आहात, तसेच माझ्यातील स्वभावदोष आणि अहं नष्ट करून माझा उद्धार करणार आहात’, असा माझा विश्वास अन् श्रद्धा आहे; पण माझी तळमळ अल्प पडते. ती तुम्हीच वाढवा. माझ्यातील शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव वाढू दे’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.

९. ‘भावजागृती म्हणजे नक्की काय ?’, हे प.पू. गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सव सोहळ्यात अनुभवता येणे

वर्ष २०२२ मध्ये प.पू. गुरुदेवांचा ८० वा जन्मोत्सव सोहळा होता. त्या दिवशी मी रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी गेले होते. रथ पहातांना माझी भावजागृती झाली.

प.पू. गुरुदेवांचे रथात बसलेले रूप पाहिल्यावर मी भारावून गेले. माझ्या डोळ्यांतील भावाश्रू थांबतच नव्हते. तेव्हा मी माझे देहभान पूर्णपणे विसरून गेले होते. ‘ते रूप मी माझ्या अंतर्मनात किती साठवून ठेवू ?’, असे मला वाटत होते. ‘भावजागृती म्हणजे नक्की काय ?’, हे मी त्या वेळी काही क्षण तरी अनुभवले आणि ‘भावजागृतीसाठी किती प्रयत्न करायला हवेत ?’, याची मला जाणीव झाली. ती भावजागृतीची क्षमता तुम्हीच मला दिलीत.

१०. कृतज्ञता 

‘गुरुदेवा, मी अज्ञानी आहे. श्रीमन्नारायणाच्या चरणी लीन होण्यासाठीचे ज्ञान तुम्हीच मला द्या. या जिवाचा उद्धार तुम्हीच करणार आहात आणि ‘त्यासाठीचे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून करून घ्या’, अशी कळकळीची प्रार्थना आपल्या चरणी करत आहे. ‘गुरुदेवा, माझ्याकडून आतापर्यंत पुष्कळ चुका झाल्या, त्याविषयी मला क्षमा करा. मला तुम्ही पुष्कळ काही दिले आहे आणि देत आहात. त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. तुम्हीच मला समजून घेत आहात. माझ्या साधनेची आणि प्रगतीची काळजी तुम्हालाच आहे’, त्याविषयी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मीना यशवंत शिंदे (वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा.

(११.९.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक