हिंदु संस्कृतीचा दीप विश्वभरात उजळवणारा दीपोत्सव !

९ नोव्हेंबर या दिवशीपासून ‘दीपावली’ चालू होत आहे. त्या निमित्ताने….

संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. आनंद आणि उत्साह यांनी भरलेला दिवाळीचा उत्सव भारतासह अन्य देशांमध्येही साजरा केला जातो. भारताचे शेजारी देश जसे नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमार यांच्यावर भारतीय उत्सवांचा विशेष प्रभाव दिसून येतो. ब्रिटन, सिंगापूर, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, अमेरिका, थायलंड, मलेशिया, मॉरिशस, जपान, इंडोनेशिया, फिजी यांसारख्या अनेक देशांमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे येथे देत आहोत.

श्री. रमेश शिंदे

श्रीलंका

श्रीलंका हा भारताचा शेजारी देश होण्यासह महाकाव्य ‘रामायणा’शीही जोडलेला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या लोकांसाठी दिवाळीचा उत्सव विशेष महत्त्वाचा असतो. दिवाळीच्या पवित्र पर्वावर लोक आपल्या घराला मातीच्या पणत्या लावून सजवतात. या उत्सवात लोक एकमेकांच्या घरी जाऊन भेटतात आणि एकत्र पक्वान्न बनवतात. श्रीलंकेत हिंदूंची १३ टक्के लोकसंख्या आहे की, जे दिवाळी साजरा करतात. लोक येथे मिठाई वाटतात, घरामध्ये दिवे लावतात आणि फटाकेही उडवून दिवाळी साजरी करतात. श्रीलंकेत दिवाळीच्या दिवशी सुट्टी असते.

म्यानमार

भारताच्या आणखी एका शेजारी देशात दिवाळी उत्सव साजरा केला जातो तो आहे म्यानमार ! म्यानमार भारताच्या पूर्व सीमेवर आहे. म्यानमारमध्ये भारतियांची संख्या अधिक असल्यामुळे तेथेही दिवाळी उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो.

दिवाळीच्या दिवशी येथे एक मोठा वर्ग देवीदेवतांची पूजा करतो. या उत्सवाच्या दिवशी लोक चांगले पक्वान्न आणि मिठाई बनवतात. त्यासह म्यानमारचे सांस्कृतिक नृत्य आणि लोकगीत यांचेही प्रदर्शन करतात.

ब्रिटन

ग्रेट ब्रिटनच्या लिस्टर भागात वसलेले भारतीय हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. यामध्ये अधिकतर हिंदू, शीख आणि जैन लोक असतात. भारतात जसे लोक घरात दिवे लावतात, तसेच तेथेही लोक घरात दिवे लावतात आणि मिठाई खातात अन् फटाकेही उडवतात.

सिंगापूर

सिंगापूरमध्ये एक ठिकाण आहे, ताे ‘लिटिल इंडिया’ (लहानसा भारत) या नावाने ओळखला जातो. दिवाळीच्या दिवशी येथील रस्ते दिव्यांच्या प्रकाशाने झगमगत असतात. तेथे रहाणारे भारतीय या पावन दिवशी एकत्रित होऊन दिवाळी साजरी करतात. पारंपरिक वस्त्रे परिधान करून हिंदू भगवंताची पूजा करतात. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सिंगापूरमध्ये एकूण १८ हिंदु मंदिरे आहेत आणि दिवाळीच्या दिवशी ही मंदिरे दिव्यांनी झगमगत असतात. दिवाळीच्या निमित्त केवळ मंदिरच नव्हे, तर मेट्रो आणि मॉल सुद्धा सजतात. उत्सवाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

‘पृथ्वीवर रामराज्य होते’: म्हणून विश्वभरात दिवाळी साजरी केली जाते!

नेपाळ

गोमातेची पूजा

हिमालयाच्या तराईताच्या (पायथ्याशी) वसलेल्या नेपाळमध्ये ८० टक्के लोकसंख्या हिंदु आहे. त्यामुळे या देशात दिवाळीचा उत्सव साजरा करणे सर्वसामान्य गोष्ट आहे. नेपाळच्या स्थानिक लोकांमध्ये दिवाळीला ‘तिहार’च्या रूपात ओळखले जाते आणि हा उत्सव ५ दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी गायींची पूजा केली जाते. दुसर्‍या दिवशी कुत्र्यांची पूजा करून त्यांना भोजन दिले जाते. उत्सवाचा तिसरा दिवस भारताच्या दिवाळीसारखाच असतो. त्या दिवशी फराळाचे पदार्थ (मिठाई) बनवले जातात. देवीदेवतांची पूजा केली जाते आणि घरांना सजवले जाते. चौथ्या दिवशी भगवान यमराजाची पूजा होते आणि पाचवा दिवस भाऊबिजेच्या रूपात भाऊ-बहीण यांना समर्पित होतो.

इंडोनेशिया

दिवाळीनिमित्त आयोजित स्पर्धेत रामलीलेचा एक प्रसंग

इंडोनेशियाची दिवाळी साजरी करण्याची पद्धतही अगदी भारतियांसारखीच आहे. या झगमगणार्‍या उत्सवाचा प्रकाश आपल्याला बालीच्या बेटावर पहायला मिळतो; कारण की, या क्षेत्रात भारतियांची लोकसंख्या अधिक आहे. येथील रामलीलेमध्ये लोक इंडोनेशियन संस्कृतीनुसार सजतात (नटतात) आणि रामलीला सादर करतात.

थायलंड

दिवाळीच्या कालावधीत नदीत दिवे सोडण्यासाठी नेतांना नागरिक

या देशात केवळ दिवाळीच नाही, तर जगातील कितीतरी उत्सवांना अनोख्या ढंगात साजरे केले जाते. थायलँडमध्ये दिवाळीला ‘लम क्रियओंघ’ या नावाने ओळखले जाते. येथे उत्सवात केळीच्या पानाचे दिवे बनवून त्यात नाणे ठेवून त्यावर मेणबत्ती ठेवण्याची परंपरा आहे. यानंतर हा दिवा नदीच्या प्रवाहात सोडून दिला जातो. त्यासहच येथील लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकत्र भोजन करतात.

मॉरिशस

थायलंड आणि मॉरिशस या देशांवर ‘रामायणाचा’ विशेष प्रभाव दिसून येतो. तेथे रामायण कथा, नृत्य इत्यादींच्या माध्यमातून प्रसारित केली जाते. मॉरिशसमध्ये ६३ टक्के भारतीय लोक आहेत. ज्यामध्ये ८० टक्के हिंदू रहातात.

हिंद महासागरात मॉरिशस एक असे ठिकाण आहे, जेथे दिवाळी अगदी भारतासारखीच साजरी केली जाते. मॉरिशसचे लोकही असे मानतात की, नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.

अमेरिका

आशियापेक्षा मोठ्या संख्येने प्रवासी अमेरिकेला जातात. तेथे भारतियांची संख्याही अधिक आहे. अमेरिकेत जाऊन तेथे स्थायिक झालेल्या भारतियांनी दिवाळीला त्या देशात प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या काही मोठ्या शहरांमध्ये दिवाळीच्या निमित्त संचलनही केले जाते.

जपान

जपानच्या लोकांची दिवाळी साजरी करण्याची पद्धत भारतियांपेक्षा अगदी वेगळीच आहे. लोक आपल्या बागेतील झाडांवर कंदील आणि कागदाने बनवलेले पडदे  लटकवतात. त्याच वेळी ‘फ्लाईंग लालटेन’ला (उडत्या आकाशकंदीलाला) आकाशात सोडतात. ते पाहून कुणीही स्वतःची नजर त्यावरून ढळू देऊ इच्छित नाही. दिवाळीच्या रात्री सर्व लोक एकत्र गात नृत्य करतात. या उत्सवाच्या कालावधीत काही लोक नौकाविहारही करतात आणि या उत्सवाचा आनंद घेतात.

फिजी

फिजीमध्ये मोठ्या संख्येने मूळ भारतीय लोक रहातात आणि त्यामुळे येथे दिवाळी हा उत्सव विशेष झाला आहे. दिवाळीच्या दिवशी फिजीमध्ये राष्ट्रीय सुटीचा दिवस असतो. येथे लोक मेणबत्त्या लावून उत्सव साजरा करतात.

मलेशिया

सत्य हे आहे की, मलेशिया इस्लामिक देश असून तेथेही दिवाळी साजरी केली जाते. सिंगापूरप्रमाणे मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्येही रहाणारा भारतीय समुदाय दिवाळी साजरा करतो. मलेशियामध्ये दिवाळीला ‘हरि दीवाली’च्या रूपात साजरे केले जाते. मलेशियामध्ये दिवाळी दक्षिण भारतीय परंपरेसह साजरी केली जाते. उत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला तेल लावून नंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यानंतर देवीदेवतांची पूजा केली जाते. त्यासह काही ठिकाणी दिवाळी उत्सवासाठी जत्राही भरवली जाते. दिवाळीच्या दिवशी मलेशियामध्ये सुटी असते. तेथील भारतीय उपाहारगृहांमध्ये या दिवशी विशेष पदार्थही बनवले जातात.

– श्री. रमेश शिंदे