गर्भवतीला छळणारे गैरसमज आणि वास्‍तव !

१. गर्भवतीसमोर जपून बोला ! 

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

‘डॉक्‍टर, ४- ५ दिवस झाले. रात्री झोपच लागत नाही. सरळ पाठीवर किती वेळ झोपणार ? आई म्‍हणाली, ‘कुशीवर झोपू नको. बाळावर दाब पडेल.’ ‘डॉक्‍टर, सासूबाईंनी सांगितले आहे, प्रतिदिन झाडून पुसून काढायचे अख्‍खे घर.. म्‍हणजे ‘नॉर्मल डिलिव्‍हरी’ (सामान्‍य प्रसुती) होईल. मी कधीच केले नाही हो, इतक्‍या कष्‍टाचे काम ! कालपासून कंबर आणि पोट खूप दुखत आहे.’ ‘डॉक्‍टर, हिला काहीतरी सांगा. काहीच खात नाही. आम्‍ही घरात सुकामेवा, फळे, मिठाई सगळे आणून ठेवले आहे; पण ही काहीच खात नाही. अशाने आमच्‍या (!!) बाळाची वाढ कशी होईल ?’ इति सासूबाई ! हे असे अनेक संवाद स्‍त्रीरोगतज्ञांच्‍या चिकित्‍सालयात नित्‍यनियमाने होतात.

नेहमी बघायला मिळणारी गोष्‍ट म्‍हणजे गर्भवती मुलीला प्रसुतीविषयी भीतीदायक गोष्‍टी सांगून घाबरवणे किंवा येता-जाता उगाचच म्‍हणतात, ‘अगं, काहीच पोट कसे दिसत नाही तुझे ?’ किंवा ‘अगं, किती अधिक पोट दिसत आहे ? जुळी आहेत कि काय ? परत विचार डॉक्‍टरांना !’ ‘अगं, त्‍या अमकीचे ऐकलेस का ? बाळ पोटातच गेले म्‍हणे अचानक !’, असे संवाद गर्भवतीसमोर बोलण्‍याची काय आवश्‍यकता ? आधीच घाबरलेली गर्भवती स्‍त्री अशा संवादांनी अजूनच घाबरून जाते. तेव्‍हा गर्भवतीसमोर बोलतांना सर्वांनीच जरा जपून बोललेल बरे !

२. ज्ञानजालावरील आवश्‍यक नसलेली माहिती तापदायक !  

सध्‍या प्रत्‍येक गोष्‍ट सामाजिक संकेतस्‍थळावर वाचणार्‍या समाजातील वर्गाची वेगळीच समस्‍या निर्माण झाली आहे. गर्भवती स्‍त्री सतत ज्ञानजालावर (इंटरनेटवर) गर्भारपणातील गुंतागुंतींविषयी वाचते. परिणामी अकारण मानसिक ताण वाढतो. या माहितीचा रुग्‍णाशी क्‍वचितच संबंध असतो. आवश्‍यक नसलेली माहिती डोक्‍याला तापदायक ठरू शकते. त्‍यातून ‘भित्‍यापाठी ब्रह्मराक्षस’ या म्‍हणीचा प्रत्‍यय होतो.

३. गर्भारपणाविषयीच्‍या गैरसमजुती ! 

गर्भवतीच्‍या मागे असलेला अजून एक ब्रह्मराक्षस म्‍हणजे गर्भारपणाविषयी गैरसमजुती ! त्‍या आता आपण पाहूया.

३ अ. गर्भवतीने कुशीवर झोपू नये ! : गर्भवती स्‍त्रीला शांत झोप लागणे महत्त्वाचे आहे. कोणत्‍याही स्‍थितीत झोपल्‍याने काहीही फरक पडत नाही. अर्थातच पोटावर झोपणे गर्भवतीला अशक्‍यच आहे. कुशीवर झोपतांना आजूबाजूला उशा ठेवून अधिक आरामदायकरित्‍या झोपता येते. गर्भाशयात बाळ गर्भजलात तरंगत असते. त्‍यामुळे बाळावर कोणत्‍याही प्रकारचा दाब पडू शकत नाही.

३ आ. गर्भवतीने दोन जणांसाठीचा आहार घ्‍यावा ! : ही अतिशय चुकीची समजूत आहे. विशेषतः पहिल्‍या ३ मासांमध्‍ये बर्‍याच वेळा गर्भवतीला उलटी, मळमळ असा  त्रास होतो. त्‍यामुळे नेहमीचे जेवणही जात नाही. अशा वेळी तिला जे खावेसे वाटेल, ते तिने खाल्‍ल्‍यास काहीच हरकत नाही.

काळ्‍या रंगाची शीतपेये, ‘अजिनोमोटो’ असलेले चायनीज पदार्थ, अतीसाखर, ‘प्रिझर्व्‍हेटिव्‍ह’ (पदार्थ खराब होऊ नये, यासाठी घातलेला पदार्थ) असलेले फळांचे रस, बाजारातील तयार आणि ‘जंक फूड’ या गोष्‍टी टाळलेल्‍या बर्‍या !

गर्भारपणाच्‍या ३ मासांनंतर आपोआपच भूक वाढते; पण अतीप्रमाणात उष्‍मांक असलेले पदार्थ आहारात अल्‍पच असावेत.

सध्‍या गर्भारपणातील मधुमेहाचे प्रमाण पुष्‍कळ वाढले आहे. गर्भवतीचे वजन आधीच पुष्‍कळ असेल अथवा गर्भारपणात ते अधिक वाढले, तर मधुमेहाचा धोका वाढतो. त्‍यामुळे सध्‍याच्‍या काळात उलटपक्षी गर्भवतीच्‍या आहारावर लक्ष आणि नियंत्रण ठेवणे आवश्‍यक झाले आहे. फळे, भाज्‍या, कोशिंबिरी, उसळी या भरपूर असाव्‍यात. गोड पदार्थ कमी तेलकट आणि कमी तळलेले असावेत. सुकामेवा आणि इतर पौष्‍टिक गोष्‍टींचा अति मारा करू नये. गर्भवतीने जेवढी भूक असेल, तेवढेच खावे. घरच्‍यांनीही खाण्‍याचा अतीआग्रह करू नये. गर्भारपणात स्‍वतः करून खाणे, ही गोष्‍ट गर्भवतीला अवघड जाते. घरच्‍यांनी करून खाऊ घातले, तर ते अधिक अंगी लागेल.

३ इ. केशरदूध अथवा नारळपाणी प्रतिदिन प्‍यायल्‍याने बाळ गोरे होते ! : बाळाचा रंग हा सर्वस्‍वी जनुकांवर अवलंबून असतो. ज्‍या क्षणी गर्भधारणा होते, त्‍या क्षणी बाळाचा रंग ठरलेला असतो, त्‍यात बाहेरच्‍या कोणत्‍याही गोष्‍टींमुळे कसलाही फरक पडत नाही. त्‍यामुळे आपण सर्वांनीच या रंगभेदाच्‍या विळख्‍यातून बाहेर पडायला हवे. एक हसरे, निरोगी बाळ हवे…त्‍याच्‍या रंगाने काय फरक पडतो ? बाळाचे निरागस आणि लोभस हास्‍य ही सौंदर्याची परिसीमा आहे, नाही का ?

– डॉ. शिल्‍पा चिटणीस-जोशी, स्‍त्रीरोगतज्ञ आणि वंध्‍यत्‍व तज्ञ, कोथरूड, पुणे. (६.७.२०२३)