३० सप्‍टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्‍कृती रक्षण’ सभेचे आयोजन !

प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ विचारक श्री. पुष्‍पेंद्र कुलश्रेष्‍ठ यांचे होणार मार्गदर्शन !

श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

मुंबई – मंदिरे ही हिंदु धर्माची शक्‍ती आणि भक्‍ती केंद्रे आहेत. ‘प्राचीन भारतीय मंदिर संस्‍कृती’चे रक्षण व्‍हावे, राष्‍ट्र, हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांवर होणार्‍या आघातांना संघटितपणे विरोध करण्‍यासाठी दिशादर्शन व्‍हावे, यासाठी गौड सारस्‍वत ब्राह्मण टेंपल ट्रस्‍ट, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ३० सप्‍टेंबरला दादर येथे ‘मंदिर-संस्‍कृती रक्षण’ सभेचे आयोजन केले आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे ३० सप्‍टेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता या सभेला आरंभ होईल. प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ विचारक श्री. पुष्‍पेंद्र कुलश्रेष्‍ठ या सभेला प्रमुख वक्‍ते म्‍हणून संबोधित करतील. या कार्यक्रमासाठी नोंदणी अनिवार्य असून https://forms.gle/P3uzj1TZTGHLHADZ9 या लिंकवर जाऊन ती करता येईल. अधिक माहितीसाठी ८०८०२०८९५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सभेच्‍या आयोजकांकडून कळवण्‍यात आले आहे.

सभेत गौड सारस्‍वत ब्राह्मण टेंपल ट्रस्‍टचे सचिव आणि विश्‍वस्‍त श्री. शशांक गुळगुळे गौड सारस्‍वत ब्राह्मण टेंपलच्‍या कार्याविषयी, तर ट्रस्‍टचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्‍विक औरंगाबादकर हे ‘बाणगंगा तीर्थ-कॉरिडोर प्रोजेक्‍ट’विषयी माहिती देतील.

महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषद आणि मंदिर रक्षण या हेतूने कार्यरत असलेल्‍या महाराष्‍ट्र मंदिर महासंघाच्‍या कार्याविषयी, तसेच सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्‍हावे, मंदिरांच्‍या विविध समस्‍यांवर उपाय निघावा आदींविषयी महासंघाचे समन्‍वयक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट संबोधित करतील.

विविध राज्‍य सरकारांकडून केवळ मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे. याविषयीच्‍या न्‍यायालयीन लढाईविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर सांगतील. वक्‍त्‍यांच्‍या भाषणांसह दीपप्रज्‍वलन, वेदमंत्रपठण, पुस्‍तक प्रकाशन, विविध मान्‍यवरांचा सत्‍कार असे या सभेचे स्‍वरूप असेल. ‘या सभेचा नागरिकांनी मोठ्या संख्‍येने लाभ घ्‍यावा’, असे आवाहन आयोजकांकडून करण्‍यात आले आहे.

सभेच्‍या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची बैठक !

सभेच्‍या पार्श्‍वभूमीवर २४ सप्‍टेंबरला स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक, दादर (प) येथे विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची बैठक संपन्‍न झाली, या वेळी गौड़ सारस्‍वत ब्राह्मण टेम्‍पल ट्रस्‍ट, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्‍था या संघटनांसह अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे प्रतिनिधी, तसेच धर्मप्रेमी उपस्‍थित होते. या सभेचा प्रसार सामाजिक माध्‍यमे, फ्‍लेक्‍स फलक आणि अन्‍य माध्‍यमांतून चालू असून सभेच्‍या यशस्‍वी आयोजनासाठी संघटितपणे कृती करण्‍याचा निर्धार केला.