मुंबई – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांच्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील मेेढे या गावातील श्री परशुराम तपोवन आश्रमात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी २६ सप्टेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदूऐक्याचे महत्त्व, साधनेची आवश्यकता, वेदांचे महत्त्व अशा विविध विषयांवर आश्रमाचे संस्थापक ऋषितुल्य संत भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांच्याशी त्यांची चर्चा झाली.
या वेळी स्वतः भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांना आश्रम दाखवला. आश्रमातील ध्यानधारणेसाठी असणारी जागा, मागील २८ वर्षांपासून अग्नि अखंड प्रज्वलित असलेली गुहा, श्री हनुमान मंदिर, शिवपिंड, यज्ञ स्थान यांचे दर्शन घेतले. या वेळी ‘श्री परशुराम तपोवन आश्रम हे धर्मप्रसाराचे केंद्र व्हावे’, अशी इच्छा भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी व्यक्त केली.
‘सनातन’ हाच एकमेव धर्म ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला
‘संपूर्ण ब्रह्मांड चालवणारी जी शक्ती आहे, ती म्हणजे ‘ध’, ‘र’ म्हणजे अग्नी आणि ‘म’ म्हणजे विस्तार. यांद्वारे ‘धर्म’ हा शब्द बनला आहे. संपूर्ण ब्रह्मांड चालवण्याचे सामर्थ्य धर्माच्या माध्यमातून होते. पूर्ण ब्रह्मांडात केवळ एकच सनातन वैदिक धर्म आहे. अन्य सर्व संप्रदाय आणि पंथ आहेत’, असे मार्गदर्शन या वेळी भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी केले.