सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्यासाठी सागवान लाकडाची बैलजोडी बनवून देणारे अकोला येथील कारागीर श्री. शैलेंद्र पुंड यांना आलेल्या अनुभूती आणि बालसंतांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व !
अकोला येथील श्री. शैलेंद्र पुंड यांनी पू. वामन राजंदेकर यांच्यासाठी लाकडाची बैलजोडी बनवली. त्यांनी याआधी कधीच बैलजोडी बनवली नव्हती. ती बनवतांना त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. पू. वामन राजंदेकर यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे अकोला येथील आजोबा श्री. श्यामसुंदर राजंदेकर यांनी सागवान लाकडाची खेळण्यातील बैलगाडी देणे; मात्र वेळेअभावी बैलांची जोडी बनू न शकणे
‘सप्टेंबर २०२२ मध्ये पू. वामन राजंदेकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अकोला येथील चुलत आजोबा श्री. श्यामसुंदर राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७८ वर्षे) यांनी सागवान लाकडाची खेळण्यातील बैलगाडी दिली. त्या वेळी बैलगाडी पूर्ण झाली होती; पण वेळेअभावी बैलांची जोडी बनवून झाली नाही. ‘श्यामकाका अकोला येथे परत गेल्यावर कारागीर श्री. शैलेंद्र पुंड यांच्याकडून बैलजोडी सिद्ध करून घेऊन गोव्याला पाठवणार’, असे ठरले.
२. कारागीर उपलब्ध न झाल्याने बैलांची जोडी अनेक दिवस लोटूनही बनवली न जाणे
श्री. शैलेंद्र पुंड यांच्याकडील लाकडी साहित्य बनवणारा पारंगत कारागीर कामावर येत नसल्याने ‘बैलांची जोडी कोण आणि कशी बनवणार ?’, असा प्रश्न निर्माण झाला. अनेक दिवस लोटूनही बैलांची जोडी बनवून झाली नाही. श्यामकाका श्री. पुंड यांचा बरेच दिवस पाठपुरावा करत होते.
३. श्री. श्यामसुंदर राजंदेकर यांनी श्री. शैलेंद्र पुंड यांना पू. वामन राजंदेकर यांच्या संतत्वाविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेला लेख दाखवणे आणि पू. वामन यांच्याविषयी ऐकून आणि त्यांचे छायाचित्र पाहून श्री. शैलेंद्र पुंड यांचा भाव जागृत होणे
श्यामकाकांनी श्री. शैलेंद्र पुंड यांना पू. वामन यांच्याविषयी सांगितले. त्यांनी पू. वामन राजंदेकर यांच्या संतत्वाविषयी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये छापून आलेला लेख श्री. पुंड यांना दाखवला. पू. वामन यांच्याविषयी ऐकल्यावर आणि त्यांचे छायाचित्र बघून श्री. पुंड यांचा भाव जागृत झाला. इतक्या लहान वयातील संत बघून त्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले. त्यांनी श्यामकाकांना विचारले, ‘‘काका, हे तुमचे कोण आहेत ?’’ तेव्हा श्यामकाका म्हणाले, ‘‘ते सनातनचे दुसरे बालसंत आहेत. ते गुरुदेवांचे आहेत. ते आम्हाला गुरुस्वरूप आहेत.’’ (नंतर श्यामकाकांनी मला सांगितले, ‘‘मी पू. वामन यांचा आजोबा आहे’, असे मायेतील नात्याविषयी देवाने माझ्याकडून काहीही बोलून घेतले नाही. हीसुद्धा गुरुदेवांची कृपा आहे.’’)
४. श्री. शैलेंद्र पुंड यांनी बैलगाडीसाठी बैलांची जोडी बनवणे
४ अ. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा देवतेच्या प्रतिमेचे पूजन करत असतांना श्री. शैलेंद्र पुंड यांना विश्वकर्मा देवतेच्या प्रतिमेमध्ये पू. वामन यांचा चेहरा दिसणे : त्यानंतर काही दिवसांनी विश्वकर्मा जयंती होती. त्या दिवशी श्री. पुंड यांच्या दुकानात विश्वकर्मा देवतेच्या प्रतिमेचे पूजन होते. पूजन करत असतांना त्यांना विश्वकर्मा देवतेच्या प्रतिमेमध्ये (छायाचित्रामध्ये) पू. वामन यांचा चेहरा दिसला. हे बघून त्यांना पुष्कळच आश्चर्य वाटले. नंतरही त्यांना डोेळ्यांसमोर सतत पू. वामन दिसत होते.
४ आ. श्री. पुंड यांनी श्यामकाकांना भेटून त्यांना आलेल्या अनुभूतीविषयी सांगितले आणि ‘‘याचा अर्थ काय ?’’, असे विचारले. तेव्हा श्यामकाका त्यांना म्हणाले, ‘‘देवाला तुम्हीच बैलांची जोडी बनवून देणे अपेक्षित आहे’’, असे वाटते.’’
४ इ. त्या वेळी श्री. पुंड यांनी त्यांना सांगितले, ‘‘मी आजपर्यंत स्वतः असे काही बनवले नाही. माझ्याकडे काम करणार्या कारागिराला बैल बनवतांना पाहिले आहे. मग हे मी कसे बनवणार ?’’ तेव्हा शामकाका म्हणाले, ‘‘तुम्ही देवावर विश्वास ठेवून बैलांची जोडी बनवणे चालू करा. देवच तुमच्याकडून करून घेईल.’’
४ ई. यानंतर श्री. पुंड यांनी त्यांच्याकडील अन्य कामे बाजूला ठेवून बैलांची जोडी बनवायला चालू केले. हे करत असतांना त्यांना सतत विश्वकर्मा देवतेच्या प्रतिमेत पू. वामन यांचा चेहरा दिसत होता.
४ उ. श्री. शैलेंद्र पुंड यांना बैल बनवण्याचा अनुभव नसतांना त्यांनी केवळ २२ दिवसांतच बैलांची जोडी बनवली. ‘हे सर्व कसे झाले ?’, याचे त्यांना अजूनही आश्चर्य वाटते.
५. श्री. शैलेंद्र पुंड यांना बैलांची जोडी बनवतांना विश्वकर्मा देवतेचे आणि पू. वामन यांचे दर्शन झाल्याने त्यांनी बैलांचे मूल्य न आकारणे
शामकाकांनी श्री. पुंड यांना बैलजोडीचे मूल्य विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘केवळ बैल बनवून देण्यासाठी आम्ही अनुमाने ८ ते १० सहस्र रुपये इतके मूल्य आकारतो. (बैलगाडीचे मूल्य वेगळे आकारतात); परंतु मला तुमच्याकडून काही नको. बैलांची जोडी बनवल्यामुळे मला विश्वकर्मा देवतेचे दर्शन झाले, जे आजपर्यंत कधीच झाले नाही. मला पू. वामन यांचे दर्शन झाले. मला आणखी काही नको.’’
६. गुरुदेवांची अनुभवलेली कृपा
हे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले), ही सर्व आपलीच कृपा आहे. श्री. पुंड यांनी पू. वामन यांना कधी पाहिले नाही. त्यांनी केवळ काही क्षण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. वामन यांचे छायाचित्र पाहिले. त्यांना अशी अद़्भुत दैवी अनुभूती येणे, ही केवळ आपलीच कृपा आहे. ही अनुभूती म्हणजे आपला अगाध महिमा आणि अद्वितीयत्व यांचे दर्शक आहे. आपण घडवलेल्या संतांची अफाट क्षमता आणि त्यांचे कार्य यांविषयी मला पुन्हा एकदा जाणीव झाली.
७. कृतज्ञता
एक क्षण असे वाटले, ‘कदाचित् पू. वामन केवळ देहाने आमच्या समवेत असून ते सूक्ष्म देहाने अविरतपणे आपले निश्चित कार्य करण्यासाठी सर्वत्र संचार करत असणार. हे सर्व बुद्धीने समजून घेणे अशक्य आहे. प.पू गुरुदेव, आपण नेहमी म्हणता ना, ‘‘अध्यात्म हे बुद्धीच्या पलीकडील शास्त्र आहे. ते केवळ साधना केल्यावर अनुभवता येते.’’ आपल्या या वचनाची प्रचीती देणारा हा विलक्षण अनुभव आहे. ‘आम्हाला या क्षणाचे साक्षीदार होता आले’, हे आमचे भाग्य आहे. केवळ आपण आहात; म्हणून सर्वकाही आहे. कोटीशः कृतज्ञता, गुरुदेव !’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३९ वर्षे), फोंडा, गोवा. (२७.४.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |