गोव्यात कॅसिनोंना दिलेल्या अधिमान्यतेमुळेच वासनांधतेचा उद्रेक ! – डॉ. नंदकुमार कामत, गोवा विद्यापिठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक

गोव्यातील वाढत्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी गोवा विद्यापिठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक तथा संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांचे निरीक्षण

डॉ. नंदकुमार कामत

पणजी, २ सप्टेंबर (वार्ता.) – कॅसिनो म्हणजेच जुगार याला महसूल प्राप्तीसाठी अधिमान्यता दिल्यानंतर समाजाचे नैतिक अध:पतन हे ठरलेलेच आहे. गोव्यात कॅसिनोला दिलेल्या अधिमान्यतेचे दृश्यपरिणाम आता दिसू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी गोवा विधानसभेचे तत्कालीन सभापती दयानंद नार्वेकर यांनी केलेल्या कथित विनयभंग प्रकरणावरून समाजमन पेटून उठले होते. विनयभंग प्रकरणाच्या विरोधात मोहिमा चालू झाल्या होत्या; मात्र आता प्रतिदिन अशी प्रकरणे उघडकीस येऊनही समाज निष्क्रीय झालेला आहे. समाजाच्या सभोवतालचे वातावरण वासनेने बरबटलेले आहे, असे निरीक्षण डॉ. नंदकुमार कामत यांनी गोव्यात लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या प्रकरणी एका स्थानिक वृत्तपत्रात नोंदवले आहे. डॉ. नंदकुमार कामत यांनी यामध्ये पुढील सूत्रे मांडली आहेत.

१. कॅसिनो संस्कृती ही कधीही एकटी नसते. त्याच्यासमवेत वेश्याव्यवसाय, बाललैंगिकता, समलैंगिकता, अमली पदार्थ, गुन्हेगारी हे सारे येत असते. गोव्यातही हेच दिसत आहे. राज्यातील अशासकीय संस्था कॅसिनोच्या विरोधात आवाज उठवून थकल्या आहेत. कॅसिनो संस्कृती ही चंगळवादी संस्कृती असून ती आज गोमंतकीय संस्कृतीला शिरजोर ठरली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे राज्यात अंधानुकरण चालू आहे. चंगळवादी संस्कृती आता हाताबाहेर गेली आहे. नैतिकता आणि अनैतिकता यांच्या व्याख्या आता पालटत चालल्या आहेत. आम्ही बालपणी अनुभवलेला गोवा हाच का ? असा प्रश्न पडावा अशी भयावह स्थिती सभोवताली आहे.

२. लैंगिक शोषणाचे लोण विद्यालयांमध्ये पोचणे, हे काही नवीन नाही. गोवा विद्यापिठातही असे प्रकार तोंड दाबून अनेक विद्यार्थिनींनी सहन केले आहेत. आजही बसमध्ये, बाजारात, बसथांब्यावर मुली आणि महिला यांना लज्जास्पद अनुभव येत असतात. हे अनुभव एवढे घृणास्पद असतात की, त्या युवतींना घरीपण सांगता येत नाही. प्रतिदिन घराबाहेर पडणारी स्त्री आज असुरक्षित आहे. समाजात वासनांध नजरेने न्याहाळणारे आज अल्प नाहीत. लैंगिक अत्याचाराची अनेक प्रकरणे लज्जेपोटी दडपली जात आहेत. गर्भपाताच्या प्रकरणांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. कॅसिनो संस्कृतीत वासनांधतेला प्रतिष्ठा मिळत गेली आणि त्यामुळे आज जे काही घडत आहे, ते वावगे आहे, असे समाजाला वाटतच नाही. देह प्रदर्शन किंवा अन्य प्रदर्शन यांमुळे वासना चिथावल्या जात असतील, तर त्यांना बळी पडणार्‍यांचा तरी यात काय दोष आहे. ३३ वर्षीय महिलेशी २२ वर्षांच्या मुलाचे संबंध होते, यात वावगे असे कुणालाही वाटत नाही. हे असेच चालणार असे समाजमनाने मानून घेतले आहे.

३. सरकारने भू महसूल जमा करणे बंद केले आहे. याकडे बघण्यास सरकारला वेळ नाही. नीतीमत्ता आज रसातळाला पोचली आहे. या सर्वांवर एकमेव उपाय म्हणजे वर्ष २०२७ पूर्वी राज्यातील कॅसिनो बंद करणार, असे सरकारने ठरवावे. देशात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर अनेक राज्ये आहेत; मात्र महसूल प्राप्तीसाठी त्यांनी त्यांच्या राज्यात कॅसिनो चालू केलेला नाही.