राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे ‘सनातन प्रभात’ होय ! – अधिवक्‍ता समीर पटवर्धन

साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा मिरज (सांगली) येथे वर्धापनदिन सोहळा !

अधिवक्‍ता समीर पटवर्धन

मिरज, २० ऑगस्‍ट (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्‍यामुळेच आपण हिंदू आहोत, हे आपण प्रत्‍येकाने लक्षात घेतले पाहिजे. कोणत्‍याही प्रकारचा विशेष पाठिंबा अथवा आर्थिक पाठबळ नसतांना सतत २५ वर्षे एखादे वृत्तपत्र चालवणे, ही अविश्‍वसनीय गोष्‍ट आहे. सनातन प्रभात हे धर्मभक्‍ती आणि राष्‍ट्रभक्‍ती शिकवते. सनातन प्रभातचे वाचक हे केवळ वाचक नसून तो भगवंताशी जोडलेला जीव आहे. राष्‍ट्र-धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे सनातन प्रभात होय, असे प्रतिपादन अधिवक्‍ता समीर पटवर्धन यांनी केले. ते साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍य महोत्‍सवी सोहळ्‍यात प्रमुख वक्‍ता म्‍हणून बोलत होते. हा सोहळा ब्राह्मणपुरी येथील ‘आळतेकर हॉल’ येथे २० ऑगस्‍टला पार पडला. दैनिक ‘सनातन प्रभात’चे श्री. राहुल कदम आणि सनातन संस्‍थेच्‍या श्रीमती मधुरा तोफखाने यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. या सोहळ्‍यासाठी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि सनातनच्‍या संत पू. (कु.) रत्नमाला दळवी यांची वंदनीय उपस्‍थिती होती. सोहळ्‍याला ३०० जणांची उपस्‍थिती होती.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्‍थिती !

या सोहळ्‍यासाठी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्‍थिती होती. त्‍यांचा सन्‍मान सनातन संस्‍थेचे ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले साधक श्री. रमेश लुकतुके यांच्‍या हस्‍ते शाल आणि श्रीफळ देऊन करण्‍यात आला.


उपस्थित मान्‍यवर : शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, गोरक्षक श्री. विनायक माईणकर, दत्तभक्‍त श्री. चंद्रशेखर कोडोलीकर, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. श्रीकृष्‍ण माळी, श्री. सचिन पवार, जयसिंगपूर येथील अधिवक्‍ता काळे यांसह धारकरी, वाचक, हिंदुत्‍वनिष्‍ठ उपस्‍थित होते.

विशेष : कार्यक्रम प्रारंभ झाल्‍यापासून शेवटपर्यंत अनेक वाचक सोहळ्‍यासाठी येतच होते. या प्रसंगी ६० हून अधिक वाचकांनी सनातन संस्‍थेच्‍या मिरज येथील चैतन्‍यमय आश्रमाचे दर्शन घेतले.


असा झाला ‘सनातन प्रभात’चा सोहळा !

प्रारंभी वेदमूर्ती कुश आठवले, श्री. श्रीधर जोशी, श्री. आेंकार जोशी यांच्‍या हस्‍ते वेदमंत्रपठण करण्‍यात आले. यानंतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. अजय केळकर आणि श्री. सचिन कौलकर यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यानंतर सनातन प्रभातच्‍या विविध वितरकांचा सत्‍कार करण्‍यात आला. यानंतर ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. प्रमोद भोसले, डॉ. (सौ.) भाग्‍यश्री सामंत, सौ. रोहिणी करमरकर, श्री. विजय पाटील यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले. यानंतर मान्‍यवरांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले.