सातारा १९ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या मोहिमेच्या अंतर्गत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी धर्मप्रेमींच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध १०७ ठिकाणी निवेदने देण्यात आली. जनजागृतीसाठी हस्तपत्रकांचे वितरण, फलक लिखाण, तसेच ठिकठिकाणी भित्तीपत्रकेही लावण्यात आली.
राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा, कराड, वडूज, उंब्रज, मसूर, रघुनाथपूर या शहरातील विविध ७६ शाळा, १२ महाविद्यालये, ३ तहसीलदार कार्यालये, २ नगरपालिका, ८ ग्रामपंचायती आणि ६ पोलीस ठाणी येथे निवेदने देण्यात आली. या वेळी समितीचे कार्यकर्ते, महिला आणि स्थानिक धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते.
यासमवेत १० विविध शाळांमध्ये समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी प्रवचन, तसेच २ शाळांमध्ये ‘राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन’ लावण्यात आले. यास विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.