रत्नागिरी, १४ ऑगस्ट (वार्ता.) – प्रतिवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण आणि १ मे महाराष्ट्रदिन अन् अन्य महत्त्वाचे कार्यक्रम या दिवशी लहान आकारातील कागदी आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. शालेय विद्यार्थी, लहान मुले किंवा व्यक्ती राष्ट्रभक्ती आणि उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. नंतर त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसर्या दिवशी ते इतरत्र टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार रस्त्यावर इतरत्र पडलेल्या, खराब झालेल्या आणि फाटलेल्या ध्वजांचे संकलन करून राष्ट्रध्वज संहितेमध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत, नगर परिषद स्तरावर समित्या स्थापन करण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक हे अध्यक्ष, तर गावातील शाळांचे मुख्याध्यापक, गावातील पोलीस पाटील हे सदस्य असतील. नगर परिषद आणि नगरपंचायत स्तरावर मुख्याधिकारी अध्यक्ष असून नगरातील शाळांचे मुख्याध्यापक, संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा त्यांचा प्रतिनिधी हे सदस्य असतील. याप्रमाणे समित्या स्थापन करून त्या कार्यान्वित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्याधिकारी, नगर परिषद यांना कळवण्यात आले आहे.
सर्वांनीच इतरत्र पडलेले, खराब झालेले आणि फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत. कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. या समित्यांनी ते स्वीकारून खराब आणि फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील प्रावधानानुसार करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना १० ऑगस्ट या दिवशी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी’ निवेदन देण्यात आले होते. या संदर्भात समितीचे श्री. संजय जोशी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून ‘यासंदर्भात आम्ही प्रशासकीय परिपत्रक काढत आहोत’, असे सांगितले होते. आता जिल्हाधिकार्यांकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले आहे. |