१४ जुलैला प्रक्षेपित होणार ‘चंद्रयान-३’ !

‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील बालाजी मंदिरात जाऊन घेतले आशीर्वाद !

तिरुपती (आंध्रपदेश) – ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’कडून (‘इस्रो’कडून)  १४ जुलै या दिवशी दुपारी २:३५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करण्यात येणार आहे. ‘इस्रो’चा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तत्पूर्वी ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ या प्रकल्पाला ईश्‍वरी आशीर्वाद मिळावा, यासाठी १३ जुलै या दिवशी येथील बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले. या वेळी शास्त्रज्ञांनी त्यांच्यासमवेत ‘चंद्रयान-३’ची लहान प्रतिकृतीही नेली होती. ‘चंद्रयान-३’ हे २४ किंवा २५ ऑगस्ट २०२३ या दिवशी चंद्रावर उतरणार आहे. त्यानंतर पुढील १४ दिवस ते चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करणार आहे.

चंद्रावर यान पाठवणारा भारत हा जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोचणारा पहिला देश ठरणार आहे.

याच ठिकाणी ‘चंद्रयान-१’ च्या वेळी ‘चंद्र इम्पॅक्ट प्रोब’ सोडण्यात आले होते आणि त्याद्वारे चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावण्यात आला होता. ‘चंद्रयान-२’ चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले होते.