सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची मुद्रा पाहूनच तिचे आध्यात्मिक महत्त्व जाणणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !  

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या हातांची मुद्रा पाहून ती वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगणे

‘१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सप्तर्षींच्या आज्ञेने साधकांना श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले. त्या सोहळ्याची छायाचित्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण लिखाण २४ जुलै २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘गुरुभक्ती विशेषांका’त प्रसिद्ध करण्यात आले. विशेषांकाची पृष्ठे पहातांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांच्या मुद्रेकडे लक्ष गेले. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘गाढ ध्यानावस्थेत असतांनाही गुरुदेवांचे हात पूर्णवेळ जोडलेले असतात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. गुरुदेवांच्या संदर्भात झालेल्या अन्य सोहळ्यांमध्येही त्यांच्या हातांची अशी मुद्रा असते का, हे पाहूया. या मुद्रेविषयी वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान मिळू शकते.’’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संदर्भातील प्रत्येक सोहळ्यात गुरुदेवांच्या हातांची तशी मुद्रा आढळणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितल्यानुसार ‘अन्य सोहळ्यांत अशी मुद्रा असते का ?’, हे पाहिले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या संदर्भातील विशेष सोहळे साधारण वर्ष २०१५ पासून चालू झाले. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या सर्व सोहळ्यांची छायाचित्रे पाहिली असता प्रत्येक सोहळ्यात गुरुदेवांनी हातांची ही मुद्रा केल्याचे लक्षात आले. यामध्ये वर्ष २०१५ पासून प्रतिवर्षी सप्तर्षींच्या आज्ञेने झालेले गुरुदेवांचे जन्मोत्सव सोहळे, ८.१०.२०१९ या दिवशी झालेला ‘सुवर्णाभिषेक सोहळा’, ११.१२.२०१९ या दिवशी झालेला ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळा’, १०.२.२०१९ या दिवशी झालेला गुरुदेवांचा ‘पादुकाधारण सोहळा’ आदी सप्तर्षींच्या आज्ञेने पार पडलेल्या सर्व सोहळ्यांमध्ये गुरुदेवांच्या हातांची ही वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा दिसून आली.

कु. सायली दिलीप डिंगरे

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनीही गुरुदेवांच्या हातांची मुद्रा निर्गुण स्तरावरील असल्याचे सांगणे आणि सूक्ष्मातील ज्ञानाद्वारेही तसेच पैलू उलगडणे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना ही छायाचित्रे दाखवली असता त्यांनीही ही छायाचित्रे पाहून सांगितले, ‘‘गुरुदेवांची ही मुद्रा निर्गुण स्तरावरील आहे. ‘गुरुदेवांच्या हातांच्या मुद्रेद्वारे पुष्कळ प्रमाणात निर्गुण तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवते.’’

पुढे मुद्रेमुळे सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या निर्गुण स्थितीसंदर्भातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडले. साधकांना सोहळ्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी ही मुद्रा कार्य करत असल्याचेही त्यातून समजले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या हातांची मुद्रा पाहून केवळ काही क्षणांत तिचे उच्च आध्यात्मिक कार्य  जाणले. त्यांच्या संकल्पामुळे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या हातांच्या मुद्रेचे बुद्धीअगम्य कार्य समष्टीला समजले. त्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– कु. सायली दिलीप डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२३)