समस्त हिंदूंसाठी आश्वासक ठरणारा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेली उत्तरे

प्रतीवर्षी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ या नावाने आपण हे अधिवेशन घेतले, यंदाच्या वर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ असे नामकरण केले आहे, याचे काही विशेष कारण आहे का ?

श्री. रमेश शिंदे : होय, यापूर्वी स्वामी विवेकांनद यांनी अमेरिकेत जाऊन या वैश्विक हिंदुत्वाच्या संकल्पनेचा पाया रचला आहे. पूर्वी या अधिवेशनात भारतातील २६ राज्यांसह बांग्लादेश, श्रीलंका आणि नेपाळ देशांतील प्रतिनिधीही सहभागी होत होते; आता यात अमेरिका, इंग्लंड, फिजी, हाँगकाँग यांसह अनेक देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राच्या दृष्टीतून विश्व एक परिवार आहे; म्हणून आपण ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (वसुधा म्हणजे पृथ्वी हेच कुटुंब) म्हणतो. अमेरिकी, युरोपीय आणि चिनी देशांच्या दृष्टीतून विश्व एक बाजार आहे. ते या जगाकडे उपभोगाच्या दृष्टीतून पहातात. आम्ही ‘चराचरात ब्रह्म आहे’, हे मानत असल्याने आम्ही त्याचा उपभोग घेऊ इच्छित नसतो. म्हणूनच सनातन भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, ते विश्वकल्याणाचे कार्य करते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणूनच मी पुन्हा सांगू इच्छितो की, हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृतीचे आणि सनातन धर्मातील विश्वदर्शनाचेच नाव आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा कि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे.

गेले वर्षभर इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने चालू आहेत. तेथील इस्लामी शासनाने निदर्शने करणार्‍या ७०० विद्यार्थिनींवर विषप्रयोग केला आहे. तेथील विद्यार्थिनींवर रासायनिक आक्रमणे केली जात आहेत. स्वकन्यांना ठार मारणारे राज्यकर्ते असलेल्या इराणी भूमीतही आज वैश्विक हिंदु राष्ट्र हवे आहे. पाकिस्तानमध्ये प्रतिदिन धर्मांतरित होणारे हिंदु परिवार आणि बलात्कारित होणार्‍या हिंदु स्त्रिया या भारतीय हिंदु राष्ट्राकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहेत. दुसरीकडे आर्थिक मंदीमध्ये अडकलेला श्रीलंकेसारखा देशही आज भारताच्या वैश्विक संस्कृतीचे गुणगान गात आहे. गेल्या १० वर्षांत भारतात हिंदु राष्ट्राचा विचार जसा प्रबळ होत आहे, तसाच विचार अवघ्या जगतात येत्या १० वर्षांत होईल, याची निश्चिती बाळगा ! या विचारांचे बीजच हा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आहे !

मला आठवते की, २०१२ मध्ये ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे एकमेव व्यासपीठ हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करत होते. आज २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करणारी अनेक व्यासपिठे आहेत आणि ती सर्वच राज्यांत निर्माण झालेली आहेत. त्याचप्रमाणे वैश्विक हिंदु राष्ट्राचा विचार देणारे हे पहिले व्यासपीठ असले, तरी भविष्यात याविषयीची चर्चा जगभर चालू होईल !

या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे स्वरूप कसे असेल, कोणत्या विषयावर चर्चा होईल आणि कोण-कोण सहभागी होणार आहे ?

श्री. रमेश शिंदे

श्री. रमेश शिंदे : यंदाही १६ ते २२ जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे श्री रामनाथ देवस्थानातील श्री विद्याधिराज सभागृहात ‘एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ होणार आहे. त्यामध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल सर्टिफिकेशन, काशी-मथुरा मुक्ती, धर्मांतर, गोहत्या, मंदिर संस्कृतीचे रक्षण, काश्मिरी हिंदूंचे मायभूमीत पुनर्वसन, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार यांसारख्या विविध विषयांवर मंथन होईल, यासोबतच हिंदु राष्ट्राची वैचारिक दिशा स्पष्ट करणारी ‘हिंदु राष्ट्र संसद’ होईल. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कृतीआराखडाही सिद्ध केला जाईल.

प्रतिवर्षीप्रमाणे देश-विदेशांतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, नेते, विचारवंत, लेखक, अधिवक्ते, संत, धर्माचार्य या अधिवेशनाला उपस्थित रहाणार आहेत. या अधिवेशनाचे हिंदु जनजागृती समितीच्या यु-ट्यूब, फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून, तसेच www.hindujagruti.org या संकेतस्थळावरून थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आजवर केलेल्या आंदोलांनामध्ये समस्त हिंदूंना मिळत असलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन समस्त हिंदूंसाठी अत्यंत उत्साहाचे ठरेल, यात शंका नाही.

‘लव्ह जिहाद’ हा विषय पहिल्या अधिवेशनापासून आतापर्यंत मांडण्यात येत आहे. देशभरात ६ राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू झाला आहे आणि अजून ३-४ राज्यांत तो लागू होण्याचे प्रयत्न चालू आहेत. ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी खरंच कायद्यांची आवश्यकता आहे का ? याचा हिंदु समाजाला नेमका लाभ काय होईल ?

श्री. रमेश शिंदे : लव्ह जिहाद रोखण्यासाठी प्राथमिक स्तरावर काही राज्यांमध्ये कायदा झाला ही चांगली गोष्ट आहे; मात्र केवळ एका राज्यपुरता कायदा न होता राष्ट्रीय स्तरावर कठोर कायदा होण्याची आवश्यकता आहेत. तसेच केवळ कायद्याने या सर्व घटना थांबतील, असे नसून त्याविषयी जनजागृतीसाठी व्हायला हवी. जागोजागी व्याख्याने घेऊन ‘लव्ह जिहाद’ची  भीषणता समाजासमोर मांडणे, विशेषत: मुलींमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. आपल्या दैदिप्यामान इतिहास आणि सर्वश्रेष्ठ धर्माचे शिक्षण देऊन त्यांना धर्माचरण करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

तसेच ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र आखणार्‍या ज्या संघटना वा समूह यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. यंत्रणांनी त्यांची पाळेमुळे खणून त्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करायला हवी. त्यांचे आर्थिक स्रोत शोधून त्यांच्यावर चहूबाजूंनी कारवाई व्हायला हवी. आज शिक्षेचे भय नसल्याने गुन्हे थांबत नाहीत, याउलट आरोपींना दंडाचे भय नसल्याने प्रोत्साहनच मिळते. कायद्यांची कठोरता अशी असायला हवी की, पुन्हा एखादा व्यक्ती गुन्हा करतांना दहा वेळा विचार करेल.

गेल्या १० वर्षांपासून आपण ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ घेत आहात, तर या अधिवेशनांच्या माध्यमातून तुम्ही नेमके काय साध्य झाले, याविषयी आम्हाला सांगा.

श्री. रमेश शिंदे : १. आज भारतभर जी हिंदु राष्ट्राची चर्चा चालू झाली आहे, ही हिंदु राष्ट्र अधिवेशनाची फलनिष्पत्ती आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्वातंत्र्यानंतर कोणीही हिंदु राष्ट्राविषयी उघडपणे अनेक वर्षे कोणी बोलत नव्हते. वर्ष २०१२ पासून आम्ही हिंदु अधिवेशन आरंभ केल्यानंतर हिंदु राष्ट्राची जाहीरपणे देशभर चर्चा चालू झाली. हिंदु राष्ट्राविषयी अनेक ठिकाणांहून आम्हाला विषय मांडण्यासाठी आमंत्रणे मिळाली. आजही आम्ही याविषयी जागृतीपर कार्यक्रम करत आहोत.

२. हे राष्ट्रीय अधिवेशन आणि यांसारखी प्रांत स्तरीय अधिवेशने यांमुळे देशभरातील ५०० हून अधिक हिंदु संघटना संघटित झाल्या आणि त्या हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी झाल्या आहेत.

३. पहिल्या अधिवेशनामध्ये सर्वानुमते समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिमास ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्याचे निश्चित झाले. गेल्या ११ वर्षांत देशभरातील विविध हिंदु संघटनांनी एकत्र येत राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी १६८८ हून अधिक आंदोलने केली आहेत. उदा. अक्षय कुमार यांच्या ‘लक्ष्मी बाँब’ चित्रपटाने नाव बदलणे, अजय देवगण यांच्या ‘सिंघम रिटर्न’ चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृष्ये आणि संवाद वगळणे, सलमान खानच्या ‘दबंग 3’ या चित्रपटातील साधू-देवता यांचे केलेले विडंबन रोखणे अशी अनेक उदाहरणे देता येतील. यांसह कुंभमेळ्यात हिंदूंवर लादण्यात येणारा प्रवासी अधिभार रहित करण्यात आला. पाकिस्तान-बांगलादेश मधील अत्याचारित हिंदूंना न्याय मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनांमुळे केंद्र शासनाने या संदर्भातील शासकीय बैठकीला आम्हाला निमंत्रित केले.

४. या अधिवेशनामध्येच हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ने हिंदुहितासाठी अनेक खटले विनामूल्य लढवले, आजही ते विनामूल्य लढत आहेत. यातून अनेक अवैध पशुवधगृहे बंद करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील श्री तुळजापूर मंदिर, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान, कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिर आदी अनेक सरकारीकरण झालेल्या मंदिरातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. परिषदेने दिलेल्या लढ्यामुळे पंढरपूर देवस्थानची १२५० एकर भूमी जी देवस्थानच्या ताब्यात नव्हती, त्यापैकी १०१७ एकरहून अधिक भूमी देवस्थानच्या ताब्यात मिळाली.

५. या अधिवेशनांमध्ये उत्स्फूर्तपणे ‘उद्योगपती परिषद’, ‘आरोग्य साहाय्य समिती’, ‘राष्ट्रीय पत्रकार मंच’ यांची स्थापना होऊन त्या त्या क्षेत्रातील लोक हिंदु राष्ट्रासाठी संघटित होत आहेत.

६. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात देशभरात ‘एक भारत अभियान – चलो कश्मीर की ओर’ हे अभियान राबवण्यात आले. याद्वारे देशभरात काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सभांचे आयोजन करण्यात आले.

७. अधिवेशनातील सहभागी संघटनांनी ‘Dismentling Global Hindutva’ या हिंदुत्वाला बदनाम करणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेला जागतिक स्तरावर जोरदार विरोध करण्यात पुढाकार घेतला.

८. अधिवेशनात निश्चित केलेल्या समान कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत देशभरात आम्ही ‘राष्ट्रीय मंदिर संस्कृती रक्षा अभियान’ राबवले. याच्या माध्यमांतून कर्नाटकातील बेळगाव येथील एक मंदिर सरकारीकरण करण्यापासून रोखले गेले. महाराष्ट्रातील जवळपास ११४ मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करण्यात आली, तर एकूण ३०० मंदिरांमध्ये लागू करण्याची प्रक्रिया चालू आहे.

गेल्या काही मासांपासून देशात हिंदुत्वाचे वातावरण निर्माण होत आहे. अनेक घटना घडत आहेत. यामध्ये चित्रपटांच्या माध्यमातूनही काही विषय समोर येत आहेत, उदा. मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ आणि यावर्षी प्रदर्शित झालेला ‘द केरला स्टोरी’ हे दोन्ही चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहेत, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. तरी देशभरात यांविषयी पुष्कळ वादविवाद होत आहेत. तुमचे या चित्रपटांविषयी किंवा होत असलेल्या वादंगाविषयी काय म्हणणे आहे ? हे अधिवेशन या चित्रपटांकडे आणि निर्माण झालेल्या परिस्थितीकडे कसे पहाते ?

श्री. रमेश शिंदे : ज्या वेळी या देशात ‘पीके’, ‘ओ माय गॉड’ यांसारख्या असंख्य चित्रपटांतून गेली काही दशके हिंदू देवीदेवता आणि हिंदू धर्म यांवर कशा प्रकारेही टीका-टिप्पणी केली जात होती. त्या वेळी हेच सर्व ‘सेक्युलर’ नेते, पक्ष, काही प्रसिद्धीमाध्यमे त्याला ‘व्यक्तीस्वातंत्र्या’चा मुलामा देऊन चित्रपटांचे समर्थन करत होती. विरोध करणार्‍या हिंदूंना मूलतत्त्ववादी म्हणवून हिणवत होते. आता नाण्याची दुसरी बाजू म्हणजे सत्यघटेनवर आधारीत असलेले ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर गहजब माजवण्याचे कारण काय ? हे कोणा एका धर्माच्या विरोधात नसून एका अपप्रवृत्तीच्या अर्थात् आतंकवादाच्या विरोधात आहे. जे वास्तव माध्यमांनी आणि त्या त्या वेळच्या सरकारांनी दाखवायला हवे होते ते दाखवले गेले नाही. त्यावर आज कोणी चित्रपट काढून लोकांमध्ये जागृती करत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. आज या चित्रपटांमुळे समाजात अशा प्रकारे घडलेली; पण उघडकीस न आलेली प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. अन्यायाला वाचा फोडली जात आहे. खरे तर अशा वेळी काही तथाकथित राजकीय स्वार्थ साधणार्‍या लोकांचा विचार करण्यापेक्षा सत्याच्या बाजूने उभे रहायला हवे. लोकांमध्ये अधिकाधिक जागृती होण्यासाठी अशा चित्रपटांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती