‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्ष २०१२ पासून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित केले जात आहे. १६ ते २२.६.२०२३ या कालावधीत ११ वे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात येत असून त्याचे नाव ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ असे ठेवण्यात आले आहे. दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ याविषयीची सूत्रे वाचून मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ हे नाव वाचल्यावर शरिरावर रोमांच येणे आणि भाव जागृत होणे
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ हे पूर्ण नाव वाचतांना माझ्या शरिरावर रोमांच आले. माझा भाव जागृत झाला. मी २ – ३ वेळा हे नाव वाचल्यावर प्रत्येक वेळी माझी भावजागृती झाली. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातून मानसिक आणि बौद्धिक या स्तरांवरील कार्याच्या व्याप्तीसह आध्यात्मिक स्तरावरील कार्याच्या व्याप्तीतही वाढ होण्याची ही अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
२. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ यांतील एकेका शब्दाचे उच्चार करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. ‘वैश्विक’ हा शब्द उच्चारताच जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. हा शब्द मनात उच्चारताच मला माझ्या सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवली.
२. ‘मला हलकेपणा जाणवून मी निरभ्र आकाशात उडत आहे. ही निर्गुण तत्त्वाची अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
३. ‘आतापर्यंत झालेली अधिवेशने पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी निगडित होती, तर या वर्षीचा महोत्सव आकाशतत्त्वाशी निगडित आहे. आकाशतत्त्वाला काही बंधन नसून तेे निर्गुण, चिदानंद आणि व्यापक असते, त्या प्रकारे या वर्षीचा महोत्सव आकाशतत्त्वरूपी निर्गुणाशी निगडित असून सर्वांना आनंद देणारा आहे’, असे मला जाणवले.
२ आ. ‘हिंदु राष्ट्र ’ हे शब्द उच्चारताच जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. हे शब्द मनात उच्चारताच मला सत्यलोकातून पुष्कळ पिवळा प्रकाश पूर्ण सृष्टीत पसरतांना दिसला.
२. ‘हा प्रकाश माझ्यावर पडताच माझ्यातील पेशी-पेशीला आनंद झाला. माझा देह, मन, बुद्धी आणि चित्त सर्वच आनंद अनुभवत आहेत. चिरंतन टिकणारी आनंदावस्था मी प्रत्येक क्षणी अनुभवत आहे. या आनंदाचा स्रोत चित्त असून ही ज्ञानशक्तीची अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
३. ‘भूतलावर स्थापित होणार्या ईश्वरी राज्यात, म्हणजेच हिंदु राष्ट्रात सर्वांचे मन आणि चित्त यांवर ज्ञानशक्तीमुळे सात्त्विकतेचे संस्कार झाल्यावर प्रत्येक क्षणी अनुभवता येणार असणार्या स्थितीची ही झलक आहे. सर्वांना आनंद देणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेली आणि मन अन् चित्त यांवर सात्त्विकतेचे संस्कार करणारी ज्ञानशक्ती या महोत्सवातून प्रक्षेपित होणार आहे. त्यामुळे मिळणार्या आनंदाची लहानशी झलक महोत्सवातून अनुभवायला येईल. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची वेळ जवळ आल्यामुळे त्यातील आनंदरूपी स्पंदने अधिक प्रमाणात अनुभवायला येत आहेत’, असे मला जाणवले.
२ इ. ‘महोत्सव’ हा शब्द उच्चारताच जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. हा शब्द उच्चारताच मला माझ्या सर्व कुंडलिनीचक्रांवर आनंदाची स्पंदने जाणवली. ‘ही क्रियाशक्तीची अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
२. मला सूक्ष्मातून दिसले, ‘संपूर्ण विश्वात आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. यामुळे वृक्ष, लता आदी आनंदाने डोलत आहेत. मेघ आनंदाने वर्षाव करत आहे. पशु-पक्षी आनंद साजरा करत आहेत. मोर नृत्य करत आहे. डोंगर परत हिरवेगार होत आहेत.’ ‘महोत्सवातील आनंद व्यष्टीपर्यंत (महोत्सवात उपस्थित असलेले आणि महोत्सव ‘ऑनलाईन’ पहाणारे यांच्यापुरता) मर्यादित न रहाता तो पूर्ण समष्टीत प्रक्षेपित होऊन विश्वाला चैतन्यमय करणार’, असे मला जाणवले.
३. कृतज्ञता
अध्यात्मातील सिद्धांत आहे, ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात.’ वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ या नावाच्या माध्यमातून त्याच्याशी निगडित चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती मला काही प्रमाणात घेता आली’, त्याबद्दल श्री गुरुचरणी कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.०५.२०२३, संध्याकाळी ५.२० ते ५.५५)
|