ब्रह्मोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी नृत्याद्वारे साकारलेल्या मनोहारी विष्णुलीला !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी नृत्याद्वारे श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीची आराधना केली. या वेळी ‘अच्युताष्टकम्’च्या बोलावर साधिकांनी श्री महाविष्णूचे दशावतार, गरुडारूढ चतुर्भुज श्रीविष्णु साकारले. विशेष म्हणजे शेषशायी श्रीविष्णु साकारतांना साधिकांनी नृत्याद्वारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या वर्ष २०१८ मधील जन्मोत्सवाच्या स्मृती जागृत केल्या. त्या वर्षी शेषशायी श्रीविष्णुरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पुष्पार्चना केली होती. ते दृश्य साधिकांनी अत्यंत लयबद्ध पद्धतीने साकारले.

श्रीविष्णुरूपांसह यंदाच्या नृत्यआराधनेचे वैशिष्ट्य होते बाळकृष्ण आणि यशोदामैय्या यांच्या सुंदर लीला ! साधिकांनी त्या लीला इतक्या तन्मयतेने साकारल्या की, कार्यस्थळी जणू गोकुळ अवतरले ! या नृत्याचे संयोजन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य अभ्यासिका सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे.

कृष्णकन्हैयाचे भावविश्व अनोखे ।
होते स्मरण अवखळ खोड्यांचे ।।

मातृवात्सल्य ते यशोदामातेचे ।
घेऊया दर्शन त्या बाललीलांचे ।।

नृत्याद्वारे साकारले गोकुळ अवघे ।
मुखावरील भावही तंतोतंत जुळले ।।

श्रीमन्नारायणस्वरूपी गुरुदेव भारावले ।
ब्रह्मोत्सवाच्या दिनी कृपाशीर्वाद लाभले ।।

ब्रह्मोत्सव म्हणजे काय ?

तिरुपति येथे गेल्या १ सहस्र वर्षांपासून प्रत्येक वर्षी भूदेवी आणि श्रीदेवी यांच्यासहित श्री वेंकटेश्वरदेवाचा उत्सव साजरा केला जातो. या ९ दिवसांच्या उत्सवाला ‘ब्रह्मोत्सव’, असे म्हटले जाते. या उत्सवात श्रीदेवी आणि भूदेवी यांच्यासहित श्रीविष्णु ‘सुवर्णरथा’त आरूढ होतो. या वेळी रथारूढ महाविष्णूची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती केली जाते !

सर्व उत्सवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मोत्सव !

‘सर्व भक्तांना दर्शन मिळावे’, यासाठीच तिरुपति बालाजीचा ब्रह्मोत्सव साजरा करण्याची पद्धत चालू झाली. ब्रह्मोत्सवातील ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ ‘सर्वाेच्च’, असा आहे; म्हणून ब्रह्मोत्सव म्हणजे सर्वाेच्च उत्सव. श्रीविष्णु उत्सवप्रिय आहे. श्रीविष्णूसाठी साजर्‍या होणार्‍या सर्व उत्सवांमध्ये ‘ब्रह्मोत्सव’ हा सर्वाेच्च आहे.