असा घडला दिव्य रथ !
डिसेंबर मासापासून श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांसाठी रथ बनवण्याच्या सेवेला प्रत्यक्ष प्रारंभ झाला ! सप्तर्षींनी वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे आणि पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या आश्रमातील सुतार सेवेतील साधकांनी प्रथमच एवढी भव्य कलाकृती साकारली. ही सेवा सर्वांसाठीच नवीन होती. त्यामुळे पू. गुरुजींचे मार्गदर्शन घेऊन शिकत शिकत, अडचणींवर मात करत साधकांनी ही सेवा भावपूर्णरित्या केली. हा दिव्य रथ साकारतांना अनेक हितचिंतकांनीही स्वतःहून साहाय्य केले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले.
रथासाठी कोणत्या प्रकारचे लाकूड वापरावे यापासून ते रथासाठी लागणारी लहान-मोठी यंत्रे तयार करण्यापर्यंत साधकांनी सखोल अभ्यास केला. सुतारकलेच्या अंतर्गत अन्य सामान्य सेवा करणार्या साधकांकडून ही भव्य आणि दिव्य कलाकृती साकार होणे, हीच श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांची लीला आहे ! ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रथ घडला आणि साधकही घडले ! ईश्वरी कृपेने साकारलेला हा दिव्य रथ ही श्रीमन्नारायणाची रथलीलाच आहे !
‘रथाच्या अग्रभागी सर्वांत खाली श्री गरुडाची मूर्ती बसवली आहे. ती मूर्ती बनवण्याची सेवा करायची होती. त्याची रचना अंतिम झाली नव्हती. वेळही अल्प होता. तेव्हा एका कारागिराच्या मनात विचार आला, ‘कुमटा येथील हितचिंतक श्री. चैतन्य आचार्य यांना विचारूया.’ ते पुष्कळ व्यस्त असतात; पण त्यांना मूर्ती करण्याच्या सेवेविषयी विचारल्यावर त्यांनी सहजतेने सांगितले, ‘‘मी सेवा म्हणून करून देऊ शकतो.’’ ती मूर्ती त्यांनी अवघ्या ८ दिवसांत हातांनी कोरून सिद्ध करून दिली.
उडणार्या गरुडाचे पंख जसे दिसतील, तसे रंगकाम करण्यापूर्वी लाकडाचे grains (नसा) एकमेकांना जुळलेले दिसत होते. गरुडाच्या दोन्ही पायांची बोटांच्या नखांच्या ठिकाणच्या भागावर पांढर्या लाकडांचे grains (नसा) आले होते. त्यामुळे ती खरोखरच बोटांची नखे वाटत होती.’
– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ब्रह्मोत्सवाच्या विराजमान झाल्यावर साधकांनी अनुभवलेली शब्दातीत कृतज्ञता !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर रथात चढल्यावर ‘सेवा स्वीकारली’, असे वाटून भाव अनुभवणे
ज्या क्षणी परात्पर गुरु डॉक्टर रथात चढले, तो क्षण आम्हा रथसेवेतील साधकांसाठी अविस्मरणीय होता. मनातील तो भाव मला शब्दांत मांडता येत नाही; पण भगवंताने सेवा स्वीकारल्याचा आनंद होऊन माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘आमच्याकडून सेवा परिपूर्ण झाली’, असे नाही; पण ‘करुणाकर भगवंताने आमची सेवा स्वीकारली’, असे मला जाणवले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर रथात आसनस्थ होतांना पहाण्याचे भाग्य लाभल्याबद्दल कृतज्ञता वाटणे
आतापर्यंत इतके मास आमच्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी रथ बनवत आहोत’, हा भाव असायचा; पण ज्या क्षणी ते प्रत्यक्ष त्या रथात बसले, तेव्हा एका दिव्य प्रकाशाने संपूर्ण परिसर व्यापून गेला. त्या प्रकाशाने माझे डोळे दीपून गेले. आम्हाला ‘भगवंत रथात आसनस्थ होतांना पहाण्याचे भाग्य लाभले’, ही ईश्वराची आमच्यावर असलेली कृपाच आहे.’
३.‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर रथात बसल्यावर तो गुरुदेवांच्या तत्त्वात सामावून गेला आहे’, असे वाटणे
‘परात्पर गुरु डॉक्टर रथात बसल्यावर रथाचे उरलेसुरले अस्तित्वही नष्ट झाले. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचेच तत्त्व आहे’, असे मला जाणवत होते. ‘रथदेवता सेवकभावाने गुरुदेवांच्या तत्त्वात सामावून गेल्यामुळे तिचे अस्तित्व संपले आहे’, असे मला जाणवले.
रथाच्या संदर्भातील सेवा करणारे आम्ही सर्व साधक कोटीशः कृतज्ञ आहोत !’
– सौ. जान्हवी रमेश शिंदे, फोंडा, गोवा.
ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भावजागृती होणे आणि देवाने रथ बनवण्याच्या सेवेची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता वाटणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी पुष्कळ भावजागृती होत होती. माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते आणि माझ्याकडून सतत कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘एवढी मोठी अमूल्य सेवेची संधी आम्हाला दिल्याबद्दल देवाच्या चरणी किती कृतज्ञता व्यक्त करू, तेवढी ती अल्पच आहे’, असे मला वाटले. ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी ।’, वचनाची मला अनुभूती आली.’
– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.