पाकिटबंद अन्न, ते अन्न नव्हेच…!

ज्याचे विज्ञापन करावे लागते, ते अन्न नाही. पोळी, भात, भाकरी, वरण, तूप, भाज्या, कोशिंबीर आणि विविध उसळी यांचे विज्ञापन करावे लागते का हो ? निसर्गातून प्राप्त झालेले आणि सहस्रो वर्षांपासून मनुष्यप्राणी जे ग्रहण करतो, ते हे खरे अन्न ! ते वेष्टनामध्ये गेले आणि ‘रेडी टू इट’ (खाण्यासाठी सिद्ध) झाले की, त्यावर प्रक्रिया केली आहे, हे समजून घ्यावे.

१. खाद्यसंस्कृती विसरल्याने शहरी लोकांप्रमाणे वनवासी लोकांनाही करावा लागत आहे अनारोग्याचा सामना !

‘मागे एकदा ठाण्याजवळील एका वनवासी वाड्यावर जाण्याचा योग आला. तेथील महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करायचे होते. तेथे जाईपर्यंत मला वाटत होते की, आपण त्यांना काय सांगणार ? परिश्रम आणि मिताहार ? कष्ट आणि उपासमार ही तर त्या स्त्रियांच्या पाचवीला पुजलेली असते; पण तेथे गेल्यावर लक्षात आले की, शहरातील  लोकांची काळी सावली यांच्यावरही पडली आहे. शहरातून तेथे आलेल्या ‘बंगला संस्कृती’ने त्यांच्यावर चांगले गारुड घातलेले आहे. जंगलाखेरीज जग नसलेली ही निसर्गस्नेही जमात आता शहरातील तथाकथित सुशिक्षित आणि सुस्थापित लोकांच्या मूर्खपणाचे अनुकरण करायला अक्षरशः उतावीळ आहे.

आरंभी ‘तुम्हाला काही प्रश्न असतील, तर विचारा’, असा आग्रह मी धरला, तरी संकोचापायी कुणी लवकर बोलेना. मग मीच सूचक प्रश्न विचारला. ‘कंबर दुखते का कुणाची ?’ कष्ट करणार्‍या बहुतेक महिलांना ही समस्या असते. ‘हा, लई दुखते बघा !’ जवळजवळ सगळ्याच जणी या वेदना सहन करण्यासाठीच आपण आहोत, या समजामध्ये असाव्यात; म्हणून मी विचारेपर्यंत कुणीही गार्‍हाणे (तक्रार) केले नाही.

‘पोट साफ होते का ?’ माझा पुढचा प्रश्न.

‘नाही, त्रास होतो.’

‘कडधान्य किती खाता ?’

‘आता हिरवी भाजी आम्हाला प्रतिदिन कुठे मिळायची ? प्रतिदिनच कडधान्य म्हणा ना.’

‘त्यात तेल किती घालता ?’

‘हे आपलं दोन चमचे !’

‘म्हणजे तुम्हाला तेल अल्प पडत आहे. कडधान्य पुष्कळ कोरडी असतात. त्यांना तेल अल्प घातले, तर पोट साफ होणार नाही आणि पोट साफ नाही, तर कंबर दुखणार.’ मी माझे पुस्तकी ज्ञान पाजळले.

‘तेल वाढवायला कसे जमणार ? परवडत नाही.’ बायका कुजबुजायला लागल्या.

‘दोन पोरांचा वेष्टनातील (पाकिटातील) खाऊचाच व्यय १० रुपये होतो, म्हणजे  प्रत्येक मासाला ५०० रुपये.’ कुणीतरी मला धक्कादायक बातमी दिली.

‘पाकिटातील खाऊ म्हणजे ?’ ‘म्हणजे हेच – बिस्किट, वेफर्स, कुरकुरे, केक, चॉकलेट आणि आता गरमी असल्याने पेप्सी. एक पाकिट न्यूनतम ५ रुपयाला मिळते. २-३ पोरे असतील, तर प्रतिदिन १५ रुपये होतात ना ?’ मी हबकलेच. शाळेसाठी आणि पाण्यासाठी डोंगरातून काही किलोमीटर चालणार्‍या या मुलांचा खाऊ हा असा ? कचरा ? शाळा आणि रुग्णालय नसलेल्या जागी हा पाकिटातील खाऊ कसा पोचला ? शिक्षण आणि औषधे न परवडणार्‍या लोकांना तो परवडतो कसा ? जांभूळ, करवंद, चिंचा आणि गावठी आंबे असा रानातील मेवा सोडून हे काय खायला लागली ही लेकरे ? कुठून शिकले हे लोक असले पदार्थ खायला ? आपलेच पाहून शिकले ना ? आपणच या पदार्थांना अनावश्यक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे ना ?

वैद्या सुचित्रा कुलकर्णी

२. नावाजलेल्या आस्थापनाचे ‘पॅकिंग’मधील पदार्थ, म्हणजे निर्जंतुक आणि उत्तम असल्याचे समजणे ही आधुनिक अंधश्रद्धा !

भारतातील शिकलेल्या मंडळींचा ‘पॅक्ड फूड’वर (वेष्टनातील अन्नावर) जेवढा विश्वास आहे ना, तितका स्वतःचे आई-वडील आणि परमेश्वर यांवरही नाही. कित्येक सधन कुटुंबातील माता त्यांच्या मुलांना शाळेच्या एका डब्यात असे कुठले तरी पाकीट भरून देतात. ते तसे द्यायचे असते, हे त्या विज्ञापनातून शिकतात. ‘‘कॅलरीज’चा उत्तम स्रोत, नावाजलेले आस्थापन, म्हणजे उत्तम गुणवत्ता’ ही ‘पॅकिंग’मध्ये उपलब्ध असल्याने निर्जंतुक असल्याची निश्चिती’, असा समज करून घेऊन एक आधुनिक वैद्या (डॉक्टर) तिच्या ३ वर्षांच्या मुलाला भुकेच्या वेळी अत्यंत प्रेमाने कॅडबरी चॉकलेट भरवतांना मी पाहिलेले आहे. मुलाने जेवायच्या वेळी किमान अर्धी कॅडबरी किंवा अर्धा बिस्किटाचा पुडा संपवला, तर त्याच्या पोटात अमृत गेल्याप्रमाणे कृतकृत्य वाटणार्‍या साक्षर माता बघितल्या की, मला फार काळजी वाटते.

अनेक लोकांना वाटते की, हे ‘सो कॉल्ड फूड’ (कथित अन्न) कारखान्यात सिद्ध होते, म्हणजे उत्तम दर्जाचे असते. यंत्रावर सिद्ध होते आणि चकचकीत वेष्टनात येते, म्हणजे स्वच्छ अन् निर्जंतुक असते. विज्ञापनामध्ये सांगतात, म्हणजे ‘हेल्दी’ (पोषक) असते. त्यांच्या पाकिटावर लिहिलेली सर्व जीवनसत्त्वे (व्हिटामिन्स) आणि खनिजे यात खरोखर असतात. सगळ जग खाते, म्हणजे हे अन्न आहे आणि आपणही खायला हरकत नाही. किंबहुना आपल्याला लहानपणी मिळाले नाही; पण आपल्या मुलांना मिळायलाच हवे इत्यादी. केवढी ही अंधश्रद्धा ?

३. अन्नासंदर्भातील काही डोळस नियम

पाकिटबंद अन्न : प्रतिकात्मक छायाचित्र

अ. अन्न वेष्टनामध्ये गेले आणि ‘रेडी टू इट’ (खाण्यास सिद्ध) झाले की, त्यावर प्रक्रिया केली आहे, हे समजून घ्यावे. त्या प्रक्रियेत मूळ पोषक तत्त्वांचा सत्यानाश झालाच म्हणून समजायचे. या पापाचे प्रायश्चित्त; म्हणून मग वरून काही ‘व्हिटामिन्स’ आणि खनिजे त्यात मिसळतात. यावर आपण आनंदी होणे, म्हणजे आपल्याकडील १० सहस्र रुपये चोरलेल्या चोराने आपल्याला रिक्शासाठी १० रुपये दिल्यावर आनंदी होण्यासारखे आहे.

आ. ज्यातील घटक पदार्थांची नावे आपल्याला वाचता येत नाहीत आणि चुकून वाचता आली, तरी तो कुठला पदार्थ आहे ? हे समजत नाही, ते अन्न नव्हे. ते घटक पदार्थ एखाद्या आधुनिक वैद्याला विचारावे लागत असतील किंवा ‘इंटरनेट’वर शोधावे लागत असतील, तर ते नैसर्गिक नव्हेत. अशा पदार्थांना आपण आपल्या अन्ननलिकेतून प्रवेशच देता कामा नये; कारण यांचे काय करायचे ? याविषयीची व्यवस्था निसर्गाने आपल्या शरिरात बसवलेली नाही. हे पदार्थ आपल्या शरिरासाठी अनोळखी असतात. शरीर ते नको तेथे साठवून ठेवते आणि त्यातूनच कर्करोगासारखे आजार जन्माला येतात.

इ. जो पदार्थ ‘पॅकिंग’सह इतका स्वस्त मिळतो, ते अन्न नसते. ते बनवण्यासाठी जे काही थोडेफार धान्य वापरतात, ते हमखास निकृष्ट दर्जाचे असणार किंवा त्याऐवजी दुसरे स्वस्त पदार्थ वापरले असणार, हे आपल्याला समजायला हवे. यात पोषकांश तर नसतातच; उलट इतक्या सगळ्या प्रक्रिया करता करता ते शरिरासाठी निरुपयोगी होऊन जाते. वाढत्या वयातील मुलांना हे असे पदार्थ खायला घालून त्यांच्या आरोग्याची आपण हानीच करतो. त्यांना यातून ना पोषण मिळते, ना ऊर्जा.

मुळात ‘जंक’ या शब्दाचा अर्थच ‘कचरा’ असा आहे. आता कचरा या शब्दापुढे ‘फूड’, म्हणजे अन्न हा शब्द कसा लागू शकतो ? हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते आपल्या देहरूपी पूर्णब्रह्माचे पोषण करण्यास सक्षम असते. याउलट कचरा त्याज्य असतो. त्यामुळे ‘जंकफूड’ हा शब्दच फसवा आहे. यात बेकरीमध्ये बनवले जाणारे पदार्थ, आईस्क्रिम, विविध प्रकारचे चटपटीत वेफर्ससारखे पदार्थ, शीतपेये, काही प्रकारचे पिझ्झा आणि बर्गर्स असे अनेक पदार्थ समाविष्ट होतात.

४. मनुष्याहून प्राणी शहाणे !

‘प्राण्यांहून मनुष्याला अधिक अक्कल असते’, अशी आपण माणसे मोठी शेखी मिरवत असतो; परंतु कुठलाही प्राणी त्याचे ठरलेले अन्न सोडून अन्य गोष्टींना तोंडही  लावत नाही. हत्तीचे अन्न गवत आहे. जंगलात वाघाला मांसभक्षण करतांना तो कित्येक सहस्र वर्षे बघत आहोत; म्हणून एकाही हत्तीने ‘कधीतरी खाऊन बघायला काय हरकत आहे ?’ असा विचार करून वाघाशी ‘मेजवानी’ करून त्याचा आहार पालटलेला नाही. इतकेच काय वाघानेही हत्तीचे पाहून गवत खायला आरंभ केलेला नाही. नैसर्गिक प्रेरणेने जे खावेसे वाटते, तेच पदार्थ प्राणी खातात. आपण मात्र काहीही भारंभार खात असतो. इतरांनी सेवन केले; म्हणून आपणही खात असतो. चव चांगली लागली; म्हणून पदार्थांची अन्न असण्याची शहानिशा न करता खात असतो.

५. ‘जंक फूड’चे दुष्परिणाम

अ. या पदार्थांमध्ये तंतुमय पदार्थ अल्प असल्याने ते सेवन करणार्‍याला बद्धकोष्ठता हा विकार जडतो. बद्धकोष्ठता ही अनेक छळवादी आजारांची जननी आहे.

आ. यात मोठ्या प्रमाणात पांढर्‍या साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे ‘टाईप -२’चा मधुमेह (यामध्ये शरिरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता निर्माण होते आणि इन्सुलिनचे उत्पादन असूनही आपले शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही.) होण्याची शक्यता वाढते.

इ. या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असल्याने रक्तदाब वाढू शकतो, केस गळू शकतात आणि केस अकाली पांढरे होऊ शकतात. यातील अतिरिक्त सोडियम किडनीला धोकादायक ठरू शकते.

ई. यातील खारट आणि आंबट पदार्थांच्या अतिरेकामुळे विविध क्लिष्ट त्वचा विकार होऊ शकतात.

उ. यातील ‘ट्रान्स फॅट्स’ (चरबी) शरिरामध्ये साठल्याने मेद वाढून व्यक्ती स्थूल होते.  अगदी लहान वयात स्थौल्य आल्याने पुढे निराशा, सांधेदुखी, अनुत्साह आणि आत्मविश्वास अल्प होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. हे वाढलेले ‘ट्रान्स फॅट्स’ हृदयरोगालाही आमंत्रण देतात.

ऊ. ‘जंक फूड’ पचायला जड असल्याने ते वरचेवर सेवन केले, तर पचनाच्या तक्रारी मागे लागतात.

ए. शरिराचे योग्य पोषण न झाल्याने अनुत्साह, कंटाळा, दौर्बल्य आणि रोगप्रतिकारशक्तीचा र्‍हास या समस्यांना तोंड द्यावे लागते.

ऐ. लहानपणापासून पुष्कळ ‘जंक फूड’ खाण्याची सवय असेल, तर तरुण वयात स्त्री आणि पुरुष दोघांचीही पुनरुत्पादन क्षमता अल्प होऊ शकते. मग अपत्य प्राप्तीसाठी महागडे आणि वेदनादायक उपचार घ्यावे लागतात.

ओ. अलीकडे किशोरवयीन आणि तरुणी यांना मोठ्या प्रमाणात भेडसावणारा ‘पीसीओडी’ (पॉलिसिस्टीक ओव्हेरियन डिसीज – मासिक पाळीशी संबंधित एक आजार) ही जंक फूडचीच देणगी आहे.

औ. आपण सेवन केलेल्या पदार्थांचे ‘नक्की काय करायचे ?’, हे शरिराला समजत नाही. त्यामुळे तो पदार्थ आपल्या यकृतात नेऊन गोळा केला जातो. ‘जंकफूड’मध्ये असेच पदार्थ अधिक असतात. हा कचरा जितका वाढत जातो, तितके यकृत बिघडत जाते. पोटात गेलेला हाच कचरा कर्करोगाला कारण ठरतो.

अं. हे पदार्थ खाण्याचे व्यसन लागू शकते. त्यामुळे मुलांच्या एकाग्रतेवर विपरीत परिणाम होतो.

हे सर्व त्या वनवासी मातांना समजावून सांगायला मला पुष्कळ कष्ट पडले; पण आपण शहरवासी, तर हे समजू शकतो ना ? आपण हे पदार्थ टाळले, तर आपले आरोग्य सुधारेलच !

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, ४.८.२०१९)