गंधर्वश्रेष्ठ आणि महामुनी ‘तुंबरु’ यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

आज १३.५.२०२३ या दिवशी ‘तुंबरु जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

‘ब्रह्मांडात ‘भू (पृथ्वी), भुव, स्वर्ग, महर्, जन, तप आणि सत्य’, असे सप्तलोक आहेत. यांतील भूलोक मनुष्य, भुवलोक पितर आणि स्वर्गलोक देवता यांच्यासाठी देवाने निर्मिली आहेत. ब्रह्मदेवाने निष्काम कर्म करणारे पुण्यात्मे, दिव्यात्मे आणि ऋषीमुनी यांच्यासाठी महर्लाेक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक या लोकांची रचना केलेली आहे. अतिमानवी योनींमध्ये २१ प्रकारच्या स्वर्गांमध्ये रहाणार्‍या यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, विद्याधर, विविध गणदेवता इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये ‘तुंबरु’चाही उल्लेख आढळतो. या लेखामध्ये आपण गंधर्वश्रेष्ठ आणि महामुनी ‘तुंबरु’ यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

महामुनी ‘तुंबरु’

१. उत्पत्ती

ब्रह्मपुत्र नारदाची निर्मिती ब्रह्मदेवाच्या मनातून झालेली आहे. त्याला साहाय्य करण्यासाठी ब्रह्मदेवाने त्याच्या केसांपासून तुंबरूच्या सूक्ष्म रूपाची उत्पत्ती केली. वैशाख कृष्ण पक्ष अष्टमीला ‘तुंबरु जयंती’ असते. या तिथीला तुंबरूच्या स्थूलदेहाची निर्मिती झाली. महामुनी तुंबरूंच्या खालील गुणवैशिष्ट्यांमुळे संगीतकार, गायक, नर्तक आणि वादक असे विविध कलाकार त्यांची जयंती उत्साहात साजरी करतात.

२. तुंबरूचे मूर्तीविज्ञान

‘तुंबरु’ला दोन हात असून त्याचे मुख अश्वाप्रमाणे, म्हणजे घोड्याप्रमाणे आहे आणि त्याच्या उजव्या हातात ‘कलावती’ नावाची वीणा आहे. तो मुळात अमानवी आणि गंधर्व असल्यामुळे त्याच्या देहामध्ये पृथ्वीतत्त्वात्मक दिव्य गंधलहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे त्याच्या देहाला केवड्याचा सुगंध येतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये दैवी तेज कार्यरत असल्यामुळे त्याच्या देहाच्या भोवती पिवळसर रंगाची दैवी आभा दिसत असते आणि त्याचा ‘ॐ’ हा नामजप अखंड चालू असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात ‘ॐ’ काराचा ध्वनी मंद आवाजात ऐकू येत असतो.

३. तुंबरूचा परिवार

३ अ. माता आणि पिता : तुंबरूचे पिता महर्षि कश्यप आणि माता प्राचा किंवा प्रभा आहे. त्यांच्यापासून त्याच्या स्थूलदेहाची निर्मिती झाली. महर्षि कश्यप आणि माता प्राचा यांच्यापासून निर्माण झालेले विविध गंधर्व त्याचे बंधु आहेत. तुंबरूमध्ये ब्राह्मतेज असल्यामुळे त्याला संगीतशास्त्राचे संपूर्ण दिव्य ज्ञान सहजरित्या प्राप्त झाले. त्याचप्रमाणे त्याची प्रकृती तपस्वी असल्यामुळे त्याने तप करून ब्रह्मदेव आणि शिव या उच्च देवतांना प्रसन्न करून घेतले.

३ आ. पत्नी : अप्सरांमध्ये श्रेष्ठ असणारी ‘रंभा’ ही तुंबरूची पत्नी आहे. रंभेला चित्रसेन गंधर्वाकडून गायन आणि नर्तन अन् तुंबरूकडून गायन अन् वादन या कलांचे ज्ञान मिळाले. त्यामुळे ती इंद्रसभेतील सर्वश्रेष्ठ अप्सरा झाली.

३ इ. कन्या : ‘मनोवती’ आणि ‘सुकेशा’ या तुंबरूच्या दोन कन्या आहेत. ‘मनोवती’ची प्रकृती चंचल असल्यामुळे आणि ती प्रवृत्तीमार्गी (मायेत रममाण होणारी वृत्ती) असल्यामुळे तिने माता रंभाकडून नृत्य आणि संगीत या कलांचे ज्ञान घेतले. त्यानंतर ती अप्सरा बनली आणि स्वर्गलोकात जाऊन उत्कृष्ट नृत्य करू लागली. ‘सुकेशा’ ही मुळातच निवृत्तीमार्गी (अध्यात्माकडे कल असणारी) असल्यामुळे तिच्यामध्ये वैराग्य आणि तपस्वी वृत्ती प्रबळ होती. तिने शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. शिवाची अखंड आराधना आणि सेवा करण्यासाठी तिला शिवाकडून ‘शिवलोकात कायमस्वरूपी रहाण्याचा’ आशीर्वाद मिळाला. त्यामुळे तिने गंधर्वलोकाचा कायमस्वरूपी त्याग करून कैलासावर स्थान प्राप्त केले.

४. गंधर्वांमध्ये श्रेष्ठ असणे

यक्षांचा संबंध चित्रकला, गंधर्वांचा संबंध गायन आणि किन्नर अन् अप्सरा यांचा संबंध नर्तन किंवा नृत्यकला यांच्याशी आहे. विद्याधरांकडे विविध कला आणि शास्त्र यांचे गूढ ज्ञान आहे, तर विविध मरुत, वसु, रुद्र, आदित्य इत्यादी गणदेवता या उच्च देवतांच्या अधिपत्याखाली त्यांचे सैन्य बनून असुरांशी लढत असतात. ‘तुंबरु’ हा गंधर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. तुंबरूच्या भक्तीमय संगीताने शिव प्रसन्न झाल्यामुळे शिवाने त्यास गंधर्वांमध्ये श्रेष्ठ होण्याचा अधिकार दिला आणि त्याला गंधर्वांचा अध्यक्ष नेमले.

५. उत्तम संगीतकार

‘तुंबरु’ याला उपजतच संगीताचे ज्ञान असल्याने हा गंधर्वांमध्ये श्रेष्ठ होता. त्यानंतर त्याने सरस्वतीदेवीची आराधना करून तिला प्रसन्न करून घेतल्यावर तिच्याकडून त्याला संगीतशास्त्राचे तात्त्विक ज्ञान मिळाले. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर जेव्हा त्याने त्याच्याकडील कलावती वीणेचे वादन केले, तेव्हा त्याच्यावर प्रसन्न होऊन वीणापाणि (संस्कृत भाषेमध्ये ‘पाणि’ म्हणजे हात. जिने हातामध्ये ‘वीणा’ हे वाद्य धारण केली आहे, तिला ‘वीणापाणि’ म्हटले आहे. ‘वीणापाणि’ हे सरस्वतीदेवीचे एक नाव आहे. त्याचप्रमाणे श्रीविष्णु किंवा श्रीकृष्ण यांनी हातामध्ये सुदर्शनचक्र धारण केल्यामुळे त्यांना ‘चक्रपाणि’ असेही संबोधतात.) सरस्वतीदेवीने त्याला वीणावादन करण्याचे प्रायोगिक आणि दिव्य ज्ञानही दिले. त्यानंतर तुंबरूने संगीतकलेचे प्रदर्शन करून शिवाची कृपा संपादन केली. त्यामुळे त्याला शिवाकडून संगीतकलेच्या सूक्ष्म ज्ञानाची प्राप्ती झाली. अशाप्रकारे सरस्वतीदेवी आणि शिव यांच्या कृपेने तुंबरूला संगीतशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त होऊन तो श्रेष्ठतम संगीतकार झाला.
त्याचप्रमाणे सप्तस्वर, राग आणि रागिण्या यांचे सखोल ज्ञान अन् त्यांना जागृत करण्याची कला त्याला नारदमुनींकडून प्राप्त झाली. त्याने ब्रह्मदेवाची घोर तपस्या करून संगीतकला अवगत केली. त्यामुळे तो गायन आणि वादन या कलांमध्येही निपुण झाला. तो चित्रसेन गंधर्वासमवेत इंद्राच्या अमरावतीतील देवसभा आणि यक्षराज कुबेराच्या अलकापुरीतील यक्षसभा यांमध्ये गायन अन् वादन करत असतो. तो या सभांमधील प्रमुख गायक आहे. त्याचप्रमाणे तो ब्रह्मलोकात ब्रह्मदेव आणि सरस्वती, वैकुंठात विष्णु आणि लक्ष्मी, अन् कैलासावर शिव आणि पार्वती यांची स्तुती करून नारदाप्रमाणे कीर्तनभक्ती करून देवतांना प्रसन्न करून घेतो. तुंबरूने शास्त्रीय संगीताचे सखोल चिंतन आणि मनन करून अनेक नवीन रागांची निर्मितीही केली. त्याने शिव आणि पार्वती यांच्या विवाहप्रसंगी सुमधुर गायन आणि वीणावादन करून सर्वांना प्रसन्न केले होते. जेव्हा बाल हनुमान सूर्यलाेकात राहून सूर्यदेवाकडून गुरुकुलात अध्ययन करत होता, तेव्हा त्याला संगीत आणि व्याकरण या विषयांचे ज्ञान देवर्षि नारद यांच्याकडून अन् गायन, तसेच वादन या कलांचे ज्ञान तुंबरूकडून प्राप्त झाले होते. तुंबरु देवतांचे पुत्र आणि पुत्री यांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे संगीतशास्त्रांर्गत गायन आणि वादन यांचे ज्ञान देत असतो.

६. नवीन वाद्यांची निर्मिती करणे

जर वाद्य गायनाला पूरक असेल, तर गायकाचे स्वर वाद्याच्या नादातून प्रतिध्वनित होऊन घुमू लागतात आणि संपूर्ण आसमंत नादब्रह्माने भारित होते. तुंबरूने त्याच्या गायनाला अनुकूल असणारी दोन वाद्ये बनवली. यांतील पहिले वाद्य होते ‘कलावती वीणा’ आणि दुसरे वाद्य होते ‘तंबोरा’. या दोन्ही वाद्यांच्या साहाय्याने  तुंबरु अत्यंत सुमधुर आणि दैवी गायन करतो. त्याच्या या दैवी संगीतामुळे केवळ यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, विद्याधर आणि गणदेवताच नव्हे, तर ऋषीमुनी आणि उच्च देवताही प्रसन्न होतात.

६ अ. कलावती वीणा आणि तंबोरा या वाद्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे तौलनिक महत्त्व

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

७. तुंबरूने घोर तपश्चर्या करून महामुनीपद प्राप्त करणे

एकदा तुंबरु आणि नारद यांच्यामध्ये परस्परांविषयी ईर्ष्या निर्माण झाल्यामुळे ते एकमेकांचा द्वेष करू लागतात. त्यानंतर शिवकृपेने त्यांना त्यांच्या अपराधाची जाणीव होते. त्यानंतर नारद विष्णूची आणि तुंबरु ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागतात. श्रीविष्णूच्या कृपेने नारदाचा अहंकार नष्ट होऊन त्याला पुन्हा ‘देवर्षी’ पद प्राप्त होते आणि तो पुन्हा ब्रह्मांडातील १४ भुवनांमध्ये (लोकांमध्ये) मुक्तपणे संचार करू लागतो. तुंबरूवर अजून ब्रह्मदेवाची कृपा होत नाही. त्यामुळे तो कंटाळून शिवाची उपासना करू लागतो. त्यानंतर त्याच्यावर एकाच वेळी ब्रह्मदेव आणि शिव प्रसन्न होऊन त्याला दर्शन देतात. तेव्हा तुंबरु स्वत:च्या अहंकाराला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी ब्रह्मदेवाकडून ‘अश्वमुख’, म्हणजे ‘घोड्याचे तोंड’ असलेले रूप मागून घेतो. त्यानंतर तो शिवाला शरण जाऊन त्याचा आत्मोद्धार करण्यासाठी प्रार्थना करतो. तेव्हा शिव त्याला संगीतकलेच्या माध्यमातून साधना करून महामुनीपद प्राप्त करण्याचा आणि त्रैलोक्यात भ्रमण करण्याचा आशीर्वाद देतो. दोन्ही देवतांनी दिलेल्या वरदानाप्रमाणे तुंबरूला अश्वमुख आणि महामुनीपद प्राप्त होते. या प्रसंगानंतर नारदाप्रमाणे तुंबरु त्रैलोक्यात पूजनीय झाला. त्यामुळे नारदाप्रमाणे तुंबरूही विविध लोकांमध्ये भ्रमण करतो आणि काही वेळा पृथ्वीवरील पापी जिवांचा उद्धार करण्यासाठी ‘भूलोकी’, म्हणजे पृथ्वीवरही येतो.

७ अ. मुनी आणि महामुनी : ‘मुनी’ म्हणजे केवळ ‘अध्यात्म’ याविषयी बोलणारा, तर ‘महामुनी’ म्हणजे ‘मायाविरहित अध्यात्म आणि मायामय अध्यात्म’, या दोन्ही विषयांवर बोलणारा किंवा इतरांचे प्रबोधन करणारा. ‘मुनी’ जिवाला मायेतून मुक्त होऊन साधना करण्यास सांगतो, तर महामुनी जिवाचा प्रवृत्ती मार्ग असेल, तर मायेत राहून आणि निवृत्ती मार्ग असेल, तर मायेचा त्याग करून साधना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतो.

८. तुंबरूच्या संगीतकलेतून भक्तीरसाची गंगा आणि ज्ञानामृत प्रवाहित झाल्याने अनेकांचा उद्धार होणे

तुंबरूमध्ये संगीतशास्त्राचे ज्ञान आणि देवतांप्रतीचा भक्तीभाव आहे. त्यामुळे त्याच्या गायनातून केवळ संगीताचे शुद्ध स्वरच नव्हे, तर भक्तीरसाची गंगाही प्रवाहित होत असते. त्यामुळे त्याचे गायन आणि वादन ऐकल्यामुळे श्रोत्यांच्या मनातील राग आणि द्वेष यांसारख्या कलुषितभावना नष्ट होऊन भगवंताप्रतीची निश्चल भक्ती जागृत होण्यास साहाय्य होते. महामुनी तुंबरूच्या संगीताच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञानामृत पाझरत असते. त्यामुळे पथभ्रष्ट किंवा पतित झालेल्या जिवांना आध्यात्मिक बोधामृत मिळून दिव्यत्व प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन लाभते. अनेक अप्सरा, किन्नर, गंधर्व आणि यक्ष यांना नारद अन् तुंबरु यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांचा उद्धार झालेला आहे.

९. महामुनी तुंबरु चैत्र मासात सूर्यदेवाच्या रथावर आरूढ होणे

तुंबरु हा ‘मधु आणि माधव’, म्हणजे ‘चैत्र’ आणि ‘वैशाख’ या दोन्ही मासांचा अधिपति आहे. त्याला चैत्र मासात सूर्यदेवाच्या सात घोडे जुंपलेल्या दैवी रथावर आरूढ होऊन सूर्यदेवाच्या समीप बसण्याचा विशेष अधिकार प्राप्त झालेला आहे. सूर्यदेवाच्या सान्निध्यात राहून तुंबरु चतुर्वेदी सूर्यदेवाकडून वेदांचे दिव्य आणि गूढ ज्ञान प्राप्त करत असतो. सूर्यदेवाच्या सत्संगामुळे तुंबरूला संगीतशास्त्राची उत्पत्ती करणार्‍या ‘सामवेदाचे’ विशेष ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुंबरु ‘चैत्र’ मासात त्याची ‘कलावती वीणा’ आणि ‘तंबोरा’ या वाद्यांचे वादन करत सामगायन (सामवेदातील मंत्रांचा उच्चार गायनाप्रमाणे) करत असतो. त्याच्या सुमधुर संगीतातून निर्माण होणार्‍या सृजनात्मक आणि नादमय प्रजापती लहरींचा संचार सौरमालिकेतील सर्व ग्रहांवर होतो. त्यामुळे पृथ्वीवर वसंतऋतूचे आगमन होऊन सर्वत्र वृक्ष आणि लता यांना नवीन पालवी फुटून विविध प्रकारची पुष्पे उमलतात अन् संपूर्ण सृष्टी नवचैतन्याने उजळून जाते. अशाप्रकारे चैत्र मासास पृथ्वीवर होणार्‍या वसंतऋतूच्या आगमनामागे आणि त्याला कार्यान्वित करण्यामध्ये ‘महामुनी तुंबरु’ यांचे विशेष योगदान आहे.

१०. विविध लोकांमध्ये विविध प्रकारची रूपे धारण करणे

जेव्हा तुंबरु इंद्रसभा किंवा कुबेरसभा येथे असतो, तेव्हा तो अश्वमुख धारी असतो. जेव्हा तो गंधर्वलोकात असतो, तेव्हा त्याचे रूप अन्य गंधर्वांप्रमाणे सुंदर असून त्याला सोनेरी रंगाचे दोन पंख प्राप्त होतात. या पंखांच्या साहाय्याने तो २१ स्वर्गांमध्ये मुक्तपणे विहार करतो. जेव्हा तो विष्णुमार्गाने (म्हणजे ब्रह्मांडातील विविध लोकांना जोडणार्‍या सूक्ष्म-मार्गाने) १४ भुवनांमध्ये संचार करत असतो, तेव्हा त्याची कांती निळसर आणि वस्त्र पिवळसर असतात अन् त्याचे अश्वमुख (घोड्याचे मुख)सोनेरी रंगाचे असते. जेव्हा तो विशिष्ट प्रसंगी पृथ्वीवर येतो, तेव्हा तो मनुष्यरूपात असतो. जेव्हा देवासुर संग्राम चालू असते, तेव्हा देवासुरांमध्ये होणार्‍या संगीतयुद्धात जेव्हा असुर भेसूर संगीत निर्माण करतात, तेव्हा वीणापाणी सरस्वतीदेवी वीणावादन, शिव डमरूनाद, श्रीविष्णु शंखनाद, श्रीदेवी बासरी, श्रीगणेश झांज इत्यादी सात्त्विक वाद्ये वाजवत असतात. तेव्हा देवर्षी नारद आणि महामुनी तुंबरु त्यांची वीणा वाजवून देवतांच्या बाजूने या युद्धात सहभागी होतात. त्या वेळी तुंबरूची कांती क्षात्रतेजाच्या प्राकट्यामुळे लालबुंद झालेली असते आणि त्याचे अश्वमुख अन् नेत्र यांतून अग्नीच्या लालबुंद ज्वाळा बाहेर पडत असतात. अशाप्रकारे अन्य वेळी सौम्य रूपात असणारा महामुनी तुंबरु देवासुर संग्रामाच्या वेळी उग्र रूप धारण करतो.

देवर्षी नारद आणि महामुनी तुंबरु

११. नारद आणि तुंबरु यांच्यातील गुणवैशिष्ट्यांचे तौलनिक महत्त्व

अनेक पौराणिक कथांमध्ये ‘नारद’ आणि ‘तुंबरु’ यांचा एकत्रित उल्लेख आढळतो. या दोघांची जोडी विख्यात आहे, तरीही त्यांच्या गुणवैशिष्टांमध्ये पुढीलप्रमाणे भेद जाणवतो.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
टीप १ – इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती :  इच्छाशक्तीमुळे कर्म करण्याची इच्छा किंवा कामना जागृत होते. क्रियाशक्तीमुळे प्रत्यक्ष कर्म करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते आणि ज्ञानशक्तीमुळे कर्माचे तात्त्विक ज्ञान प्राप्त होते. अशाप्रकारे इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तिन्हींच्या संयोगाने विशिष्ट कर्म पूर्ण होते. कर्मपूर्ण झाल्यावरच अनुभूतीजन्य म्हणजे प्रायोगिक ज्ञान प्राप्त होते.
टीप २ – प्रकट शक्ती आणि अप्रकट शक्ती : जेव्हा तुंबरु आणि नारद ध्यानस्थ असतात, तेव्हा त्यांची शक्ती अप्रकट अवस्थेत, म्हणजे सुप्तावस्थेत असते. जेव्हा ते गायन, वादन, मार्गदर्शन किंवा भ्रमण करत असतात, तेव्हा ते विशिष्ट कर्म करण्यासाठी त्यांची शक्ती प्रकट स्वरूपात कार्यरत असते.
टीप ३ – विविध लोकांमध्ये  विहार करण्याची गती : सर्वसामान्य दैवी शक्तींची गती मंद, मध्यम आणि तीव्र असते. मंद गतीने काही घंट्यांत, मध्यम गतीने काही मिनिटात, तर तीव्र गतीने काही सेकंदात ब्रह्मांडातील एका लोकातून दुसर्‍या लोकात जाता येते. र्‍हंस गतीने क्षणाच्या दशांश भागातील एका भागाच्या कालावधीत ब्रह्मांडातील एका लोकातून दुसर्‍या लोकात जाता येते, तर महार्‍हंस गतीने क्षणाच्या लक्षांश भागातील एका भागाच्या कालावधीत ब्रह्मांडातील एका लोकातून दुसर्‍या लोकात जाता येते. स्वर्गलोकातील देवतांची ‘मंद, मध्यम आणि तीव्र’ गती असते. उच्च देवतांची ‘र्‍हंस’ गती असते, तर देवतांच्या अवतारांची ‘महार्‍हंस’ गती असते. नारदाचे कार्य हे देवतांच्या अवताराला अधिक प्रमाणात साहाय्यक असल्यामुळे त्याची गती अवतारांच्या गतीप्रमाणे महार्‍हंस आहे. याउलट तुंबरु हा गंधर्व असल्यामुळे नेहमीचे कार्य करत असतांना त्याची गती मंद आणि मध्यम असते, तर देवतांना साहाय्य करत असतांना त्याच्यातील मुनीतत्त्व जागृत असल्यामुळे त्याची गती तीव्र असते.
टीप ४ – देवर्षि नारद आणि तुंबरु यांच्या दैवी कार्याचे स्वरूप
टीप ४ अ. देवर्षि नारदाचे  तारक-मारक कार्य : जेव्हा देवर्षि नारद ब्रह्मांडात विचरण करत भगवद्भक्तीचा प्रसार करतात, तेव्हा त्यांच्याकडून तारक स्वरूपाचे कार्य होते. जेव्हा ते एखाद्या उन्मत्त जिवाचा उद्धार करण्यासाठी त्याला शाप देतात, तेव्हा त्यांच्याकडून मारक स्वरूपाचे कार्य होते, उदा. जेव्हा कुबेरपुत्र मणिग्रीव आणि नलकुबेर अप्सरांसह नग्न अवस्थेत जलक्रीडा करत होते, तेव्हा तेथून मार्गक्रमण करणार्‍या नारदमुनींना पाहून अप्सरांनी त्वरित त्यांचा देह वस्त्राने झाकला; परंतु मणिग्रीव आणि नलकुबेर तसेच नग्न अवस्थेत राहिले. निर्लज्ज होऊन अध:पतन झालेल्या मणिग्रीव आणि नलकुबेर यांचा उद्धार करण्यासाठी नारदाने त्यांना ‘तुम्ही काही सहस्र वर्षे यमलार्जुन वृक्षाच्या रूपात (एक विशिष्ट प्रकारचा वृक्ष) रहाल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अपराधाचा पश्चाताप झाल्यावर श्रीविष्णूचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण त्याच्या बाललीला करत तुम्हा वृक्षांना मुळासहित उपटून टाकेल. त्यानंतर तुमची वृक्षयोनीतून मुक्तता होऊन तुम्हाला तुमचे मूळ यक्षस्वरूप प्राप्त होईल,’ असे सांगितले. या शापामुळे मणिग्रीव आणि नलकुबेर एके ठिकाणी यमलार्जुन वृक्षाच्या रूपात जन्माला आले. त्यानंतर सहस्र वर्षांनी बाळकृष्णाच्या खोड्यांनी ग्रस्त होऊन जेव्हा यशोदामातेने त्याला उखळाला बांधले, तेव्हा उखळाला बांधलेल्या बाळकृष्णाने यमलार्जुन वृक्षांना धडक देऊन त्यांना मुळासहित उपटून पाडले. त्यानंतर मणिग्रीव आणि नलकुबेर यांची शापातून मुक्तता होऊन ते  वृक्षयोनीतून मुक्त झाले. त्यानंतर त्यांना त्यांचे यक्षस्वरूप प्राप्त झाले आणि मुक्तता होऊन ते स्वलोकी, म्हणजे ‘यक्षलोकाची राजधानी ‘अलकापुरी’ येथे परतले.
टीप ४ आ. तुंबरूचे तारक-मारक कार्य : जेव्हा तुंबरु गायन आणि वादन करत असतो, तेव्हा त्याच्याकडून तारक स्वरूपाचे कार्य होत असते. जेव्हा तो देवसेनेसह रथावर आरूढ होऊन असुरांशी लढत असतो, तेव्हा त्याचे मारक स्वरूपाचे कार्य होत असते.
टीप ५ – कार्यरत बुद्धी : बुद्धीच्या चार अवस्था पुढील प्रमाणे आहेत.
टीप ५ अ. प्रतिभा :  जेव्हा बुद्धी रज-सत्त्वप्रधान असते, तेव्हा जिवाला नवनवीन विचार स्फुरू लागतात. त्यामुळे त्याला नवनवीन विषयांवर लेख लिहिणे किंवा काव्य स्फुरणे अशा अनुभूती येतात. यालाच बुद्धीची ‘प्रतिभा जागृत होणे’, असे म्हणतात.
टीप ५ आ. प्रज्ञा : जेव्हा जिवाची बुद्धी अधिक सात्त्विक होऊन ती सत्त्व-रज प्रधान होतो, तेव्हा तिला अध्यात्मातील धर्मशास्त्र, सूक्ष्म-जगत इत्यादींविषयी नाविन्यपूर्ण ज्ञान मिळू लागते. जी बुद्धी सात्त्विक आणि सूक्ष्म ज्ञानाची प्राप्ती करून देते तिला ‘प्रज्ञा’ असे संबोधले आहे.
टीप ५ इ. प्रकाम्य : ज्या सात्त्विक बुद्धीच्या उदयामुळे मनातील सर्व कामना ‘प्राप्ती’,  म्हणजे इच्छा नष्ट होऊन मन निष्काम स्थितीला पोचते त्या सात्त्विक बुद्धीला ‘प्रकाम्य’, असे संबोधले आहे.
टीप ५ ई. प्राप्ती :  ज्या सात्त्विक बुद्धीच्या उदयामुळे मनाचा केवळ ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हा ठाम निर्धार होऊन त्या बुद्धीला ‘प्राप्ती’, असे म्हणतात. ही बुद्धी कार्यरत झाल्यामुळे जीव मायेतील सर्व बंधनांतून मुक्त होऊन त्याला सगुण स्तरावरील व्यष्टी साधनेमुळे मुक्ती आणि निर्गुण स्तरावरील समष्टी साधनेमुळे मोक्ष यांची प्राप्ती होते.
अशाप्रकारे बुद्धीच्या चार अवस्था असतात. ‘प्रतिभा’ सूक्ष्म, ‘प्रज्ञा’ सूक्ष्मतर, ‘प्रकाम्य’ सूक्ष्मतम आणि ‘प्राप्ती’ सूक्ष्मातिसूक्ष्म असते.
कु. मधुरा भोसले

१२. तात्पर्य

नारदाला जन्मत:च ‘देवर्षी’ हे पद प्राप्त झाले होते; परंतु ‘तुंबरूचे’ तसे नव्हते. तो मुळात गंधर्व असून त्याने त्याच्या भाग्याला दोष न देता घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेव आणि शिव यांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्या कृपाशीर्वादाने त्याला ‘महामुनी’ हे पद प्राप्त झाले. या प्रसंगातून ‘कठोर साधना केली, तर जिवाला अध्यात्मातील श्रेष्ठतम अवस्था प्राप्त होऊन त्याचा उद्धार होतो’, हे सूत्र अधोरेखित होते. महामुनी तुंबरूच्या उदाहरणावरून ‘भाग्यापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे’, हे सूत्र अधोरेखित होते. त्यामुळे मनुष्याने कर्मप्रधान राहून प्रारब्धाला दोष न देता क्रियमाण कर्माचा योग्य वापर केला, तर त्याची मनुष्यत्वाकडून दिव्यत्वाकडे वाटचाल होऊ शकतो’, हे प्रेरणादायी सूत्र शिकायला मिळाले.

१३. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘महामुनी तुंबरूप्रमाणे आमच्यात तीव्र साधना करण्याची तळमळ जागृत होऊन आमच्यातील भक्तीभाव वाढू दे’, अशी भगवंताच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करते. त्याचप्रमाणे भगवंताने महामुनी तुंबरूविषयी आध्यात्मिक ज्ञान दिल्याबद्दल मी भगवंताच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०२३)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक