पुणे – पूर्वग्रहामुळे आधीच निश्चित केलेले खुनी, त्या दृष्टीने जुळवलेले सर्व पुरावे, प्रत्येक आरोपपत्रात नवे आरोपी, बेपत्ता असलेले संशयित यांमुळे दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्याकांडांच्या अन्वेषणातील सावळा गोंधळ सर्वांपर्यंत पोचायला हवा, असे मत ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले. ५ मे या दिवशी येथील अंबर कार्यालयात ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रसिद्धीमाध्यमांमुळेच हे अन्वेषण भरकटले, कारण प्रसिद्धीमाध्यमेच न्यायाधिशांची भूमिका बजावतात, असेही त्या या वेळी म्हणाल्या.
अन्वेषणामधील सावळ्या गोंधळाची पोलखेल या पुस्तकांमध्ये केली असून अन्वेषणातील त्रुटीही पुस्तकांमध्ये सविस्तर सांगितल्या आहेत. जनमत तापवण्यामध्ये माध्यमांनी भरपूर कार्य केले आहे, जे अतिशय चुकीचे आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी डॉ. थडानी यांनी घेतलेल्या परिश्रमाला तोड नाही. त्यांनी न्यायालयाची सर्व कागदपत्रे वाचून, सविस्तर अभ्यास केला; मात्र अन्वेषण यंत्रणांनी खुनी आधीच निश्चित करून, त्यांना दोषी ठरवून, उलट्या दिशेने अन्वेषण केले. हत्या झालेल्या चारही जणांना त्यांच्या क्षेत्रात कार्य करण्याचा अधिकार आहे, तर सनातन संस्थेला तिथे कार्य करण्याचा अधिकार नाही का ? सनातन संस्था हे हिंदु धर्माच्या प्रसाराचे कार्य करते, तर त्यांच्याकडे संशयाची सुई का ?
राजकीय स्वार्थासाठीच अन्वेषणाचा घाट ! – डॉ. अमित थडानी, पुस्तकाचे लेखक
गौरी लंकेश हत्या प्रकरणात १८ पैकी १५ लोकांनी बळजोरीने त्यांचे जबाब नोंदवल्याचे सांगितले. यंत्रणांनी राजकीय स्वार्थासाठीच हे अन्वेषण भरकटवले. प्रत्येक आरोपपत्रातील आरोपी पालटत असून संशयितांचे केलेले रेखाटनही संशयास्पद आहे. हत्या झालेल्या घटनेचे कथानकही प्रत्येक वेळी पालटत आहे. अन्वेषण यंत्रणा स्वतःचे कथानक सिद्ध करून, आरोपी निश्चित करून त्या आधारे अन्वेषण करत आहेत. गौरी लंकेश हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले, आरोपींचे केलेले रेखाटनही जुळत नाही. सरकारी कागदपत्रे, न्यायालयीन कागदपत्रे आणि या हत्येतील युक्तिवाद पाहिले, तर संपूर्ण तपास प्रक्रियेतच गोंधळ आहे. या चारही जणांची हत्या एकाच बंदुकीच्या गोळीने झाल्याचे अजब तर्कही अन्वेषणामध्ये निघाला आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात रात्री अंधारात शिरस्त्राण घालून हत्या करणार्या आरोपीचेही रेखाटन सिद्ध होते, ही अजब आणि अनाकलनीय गोष्ट आहे. अन्वेषणाआधीच आरोपपत्र कसे सिद्ध होते ? असा प्रश्नही डॉ. थडानी या वेळी उपस्थित केला. सर्वांत अजब गोष्ट म्हणजे या हत्यांमध्ये ज्या व्यक्तींनी अन्वेषण केले, अशांचा ‘सर्वोत्कृष्ट तपास’ अशा गोंडस नावाखाली सत्कार होतो, तसेच त्यांना बक्षीसही दिले जाते.
क्षणचित्रे
१. ज्येष्ठ लेखिका शेफाली वैद्य कार्यक्रमासाठी व्यासपिठावर जाताना पादत्राणे काढून गेल्या.
२. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने कार्यक्रमाचे पूर्ण ध्वनीचित्रीकरण केले.
३. पाऊस असूनही मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितलेली सूत्रे आणि उपस्थित केलेले प्रश्न
१. गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते हे सर्वश्रुत असतांनाही त्यांच्या हत्येबद्दल सगळीकडे चर्चा होते; मात्र त्याच नक्षलवाद्यांनी आतापर्यंत १४ सहस्र माणसे मारली आहेत. त्यामध्ये विचारवंत, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते, पोलीस, सर्वसामान्य माणसे यांचा समावेश आहे; मात्र त्याबद्दल कुठेही अवाक्षरही उच्चारले जात नाही.
२. आज सगळीकडे भगवा दहशतवाद, हिरवा दहशतवाद असल्याचे बोलले जाते; मात्र पांढर्या दहशतवादाबद्दल कुणीही काही म्हणत नाही.
३. माध्यमे जेवढे म्हणतात, तेवढेच बघा आणि तेवढेच ऐका, अशी मानसिकताच निर्माण केली जात आहे. सर्वसामान्यांच्या संवेदना माध्यमांच्याच इशार्यावर चालतील, अशी यंत्रणा प्रस्थापित करण्याचा कटच रचला जात आहे.