‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या भीषणतेविषयी समाजात जागृती करण्यासाठी प्रयत्न करू ! – खासदार संजय सेठ, भाजप, रांची

डावीकडून श्री. शंभू गवारे, सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, खासदार श्री. संजय सेठ आणि श्री. चंद्रकांत रायपत

रांची (झारखंड) – हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथील भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या भीषणतेविषयी अवगत केले. या वेळी खासदार श्री. सेठ यांनी समितीच्या धर्मकार्याचे कौतुक केले. ‘यासंदर्भात केंद्र सरकारला निवेदन पाठवून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करू, तसेच समाजात मोठ्या प्रमाणात जागृती करण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू’, असे आश्वासन खासदार श्री. सेठ यांनी दिले. या वेळी येथील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘एकल ग्रामोत्थान फाऊंडेशन, ग्रामविकास योजने’चे विश्वस्त आणि अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत, तसेच समितीचे पूर्व अन् पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे उपस्थित होते.

सद्गुरु सिंगबाळ खासदार श्री. सेठ यांना म्हणाले, ‘‘हलाल अर्थव्यवस्थेला धर्माचा आधार असतांनाही त्याला अतिशय चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात येत आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण आहे. त्यामुळे हा धोका समजून घेऊन त्याला विरोध करणे आणि देशाचे भविष्य सुरक्षित बनवण्यासाठी प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाने योगदान द्यायला हवे.’’