कोल्‍हापूर बसस्‍थानकातील नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर करा ! – सुराज्‍य अभियानाचे निवेदन

शहर बसस्‍थानकातील पिण्‍याचे पाण्‍याचे तुटलेले नळ आणि तेथील अस्‍वच्‍छता दाखवतांना पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्‍हापूर, १८ एप्रिल (वार्ता.) – कोल्‍हापूर शहरातील बसस्‍थानकातील पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नळ तुटलेल्‍या अवस्‍थेत आहेत, तसेच तेथील जागा अत्‍यंत अस्‍वच्‍छ आहे. पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी या ठिकाणी भांडे अथवा अन्‍य काही उपलब्‍ध नाही. सध्‍या उन्‍हाळ्‍याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्‍वच्‍छ पाणी न मिळणे, हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. तरी कोल्‍हापूर बसस्‍थानकातील नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर कराव्‍यात, या मागणीचे निवेदन राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कोल्‍हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्‍के यांना हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘सुराज्‍य अभियाना’च्‍या वतीने देण्‍यात आले. ‘निवेदनाची नोंद घेऊन योग्‍य ती कृती करू’, असे आश्‍वासन विभाग नियंत्रकांनी दिले.

 निवेदन स्वीकारताना अनघा बारटक्‍के (डावीकडे) 

या प्रसंगी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोहर सोरप, भ्र्रष्‍टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रदेश उपाध्‍यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. शरद माळी, सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब खोतलांडे, सुराज्‍य अभियानाचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्‍वामी, दीपक कातवरे, जोतिबा बाळेकुंद्री, मधुकर नाझरे उपस्‍थित होते.

‘सुराज्‍य अभियाना’च्‍या वतीने देण्‍यात आलेल्‍या निवेदनात अन्‍य पुढील मागण्‍या करण्‍यात आल्‍या आहेत.

१. मुख्‍य बससस्‍थानकात प्रवाशांना पिण्‍यासाठी ‘कुलर’ उपलब्‍ध आहे; मात्र तो आता लांब असल्‍याने प्रवाशांना पटकन् लक्षात येत नाही. तरी ‘कुलर’ सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावा.

२. शौचालय अस्‍वच्‍छ असून आतील सर्व नळ चालू अवस्‍थेत नाहीत. तेथेही अस्‍वच्‍छता, तसेच दुर्गंधी आहे. तरी याकडे लक्ष द्यावे.

३. रंकाळा बसस्‍थानकात फलाटांवर जेथे बस लागतात, तेथे वरती स्‍थानकांची नावे नाहीत. त्‍यामुळे नवीन प्रवाशांना गाडी कोणती लागते ? ते कळण्‍यास वाव नाही. तरी तेथील फलक तातडीने रंगवण्‍यात यावेत.