एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला ! |
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
प्रतिनिधी : श्री. दिनेश कडव, दापोली
दापोली, ११ एप्रिल (वार्ता.) – पडलेली भिंत, प्रवाशांना बसण्यासाठी बांधलेल्या कठड्यांचे निखळलेले दगड आणि कडप्पे अन् तुटलेली बाकडी अशा प्रकारे दापोली बसस्थानकाची अवस्था आहे. मागील अनेक वर्षांपासून बसस्थानकाची पडझड चालू आहे. इमारतीचे बांधकाम तर दूर राहिले; परंतु प्रवाशांच्या बसण्याची आसनेही अक्षरश: निखळली आहेत. त्यांच्या दुरुस्तीविषयीही बसस्थानकाच्या प्रशासनामध्ये अनास्था आहे.
१. दापोली बसस्थानकाची एक भिंत पूर्णत: कोसळली आहे. ही बाजू तात्पुरती झाकण्यासाठी पत्रे उभे करण्यात आलेले आहेत; मात्र तेही व्यवस्थित न लावता नुसते उभे करून ठेवण्यात आले आहेत.
२. बसस्थानकाच्या भिंतीवरील टाईल्स तुटल्या आहेत. भिंतींचेही बांधकाम ढासळले आहे. सिमेंट निखळल्यामुळे काही ठिकाणी भिंतीमधील विटा दिसत आहेत.
३. बसस्थानकांच्या भितींवर सर्वत्र लावलेल्या भित्तीपत्रकांमुळे सर्व भिंती विद्रूप झाल्या आहेत.
४. भिंतींवर लावलेले सूचनाफलक वाकडेतिकडे झाले आहेत. ते व्यवस्थित करण्याविषयीही बसस्थानकाचे अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यामध्ये उदासिनता आहे. यावरून बसस्थानकाच्या स्वच्छतेविषयीची काय स्थिती असेल ? याची कल्पना येते.
५. बसस्थानकाच्या आवारात काही ठिकाणी कचरा, प्लास्टिक इतरत्र टाकण्यात आले आहे. त्याकडे एस्.टी. प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्विटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |