सिंधुदुर्ग : मालवण आणि कणकवली येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • सर्वत्र भगवे वातावरण

  • घोषणांनी दुमदुमला परिसर

सिंधुदुर्ग – ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष, तसेच ढोल-ताशे, भगवे झेंडे, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘मी सावरकर’ लिहिलेल्या भगव्या टोप्या आणि ‘आम्ही सर्व सावरकर’, असे फलक हाती घेतलेले सहस्रो सावरकरप्रेमी मालवण आणि कणकवली शहरांत झालेल्या ‘स्वा. सावरकर गौरव यात्रे’त सहभागी झाले होते. शिवसेना आणि भाजप यांच्यावतीने जिल्ह्यात या यात्रा काढण्यात आल्या.

मालवण येथील ‘स्वा. सावरकर गौरव यात्रा’

४ एप्रिल या दिवशी मालवण शहरातील भरड नाका येथे यात्रेचा प्रारंभ झाला. तेथून सोमवार पेठमार्गे बंदर जेटीपर्यंत यात्रा काढण्यात आली. बंदर जेटी येथे यात्रेच्या सांगतेच्या वेळी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते पवित्र सागराचे पूजन करण्यात आले. भाजपचे अशोक सावंत, शिवसेनेचे कुडाळ-मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गांवकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ, समविचारी संघटना, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते.

येथील मामा वरेरकर नाट्यगृहात विश्व हिंदु परिषद मालवण यांच्या वतीने आयोजित प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन चरित्रावरील व्याख्यानाने गौरव यात्रेची सांगता झाली.

कणकवली येथील ‘स्वा. सावरकर गौरव यात्रा’

कणकवली येथे ५ एप्रिल या दिवशी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही गौरव यात्रा काढण्यात आली. शहरातील पटकीदेवी मंदिराकडून यात्रेला प्रारंभ होऊन मुख्य चौक, एस्.टी. बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी चौक येथे आल्यावर यात्रेची सांगता झाली. यानिमित्त भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघात सर्वत्र भगवे झेंडे आणि वीर सावरकर यांचे ‘बॅनर’ लावण्यात आले होते. या वेळी सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या सहकार्याने वीर सावरकर लिखित पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती, क्रांतीगीते, हिंदु गौरव गीते यांवर आधारित ‘सावरकर गौरव’ हा कार्यक्रम शहरातील शिवाजी चौक येथे सादर करण्यात आला.

कणकवली येथील ‘स्वा. सावरकर गौरव यात्रे’चे ड्रोनमधून काढलेले छायाचित्र – छाया, परेश कांबळी
दोन्ही ठिकाणच्या यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तीरेखा साकारलेल्या सावरकरप्रेमीने फेरीत सहभाग घेतला होता.